ॲड. कृष्णा पाटील
वायरच्या पिशवीतून भीमराव पाटलांनी कोर्टातून आलेली नोटीस काढली आणि शानबाग वकिलांच्या टेबलवर ठेवली. रिकामी पिशवी बाजूला ठेवून ते समोरच्या खुर्चीवर रेलून रुबाबात बसले. शानबाग वकिलांनी भीमराव पाटलांकडे निरखून पाहिले. केसांना कलप केल्यामुळे डोक्यावरचे काळेभोर केस चकाकत होते. हातातल्या चारी बोटात सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. पान खाल्ल्यामुळे तोंड लालभडक झालेलं होतं. त्यांचा चेहरा मात्र मग्रूर दिसत होता. जणू समोरचा माणूस आपल्यापुढे झुकण्यासाठी जन्माला आला आहे, असा आविर्भाव वाटत होता.
शानबाग वकिलांनी नोटिशीवर नजर टाकली –
“शुभांगी भयंकर तापट स्वभावाची आहे. माझं तेच खरं आणि सर्वांनी त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, ही तिची धारणा आहे. थोडं जरी मनाविरुद्ध काही घडलं तर म्हणते, “मला बापानं सांगून ठेवलंय, लय डोक्यावरून जायला लागलं तर, धर झिंज्या सासूच्या, अन् वढ तिला घराबाहीर. बाकीचं मी निस्तारतू.” त्यामुळे ती कुणाच्याही अंगावर जायला कमी करत नाही. दुसरं म्हणजे, तिचा स्वभाव बापासारखाच अत्यंत हेकाड आहे. घरात तिला सासू, सासरा आणि दीर नको आहेत. तिला तिचा पती आणि ती एवढेच हवे आहेत. सासू, सासऱ्याला खर्चाला एक रुपया दिला तरी, ही दोन दिवस रुसून बसते. एकूणच तापट, हेकट, संतापी, शीघ्रकोपी, बेजबाबदार, एककल्ली अशा स्वभावाच्या पत्नीबरोबर संसार करणे अशक्य झाले आहे. सबब मला घटस्फोट हवा आहे. तो मिळावा ही विनंती.”
नोटिशीची घडी घालत शानबाग वकिलांनी विचारले, “किती मुले आहेत पाटील?”
“दोन मुली आणि एक मुलगा आहे साहेब.” “सर्वांची लग्ने झाली का?”
“नाही साहेब. शुभांगी सर्वात थोरली. तिचंच फक्त झालं आहे.”
“तुमच्या जावयाने केलेला अर्ज तुम्ही वाचलाय का?”
“होय. त्यामध्ये सगळंच खोटं लिहिलंय. मला जावाय नुसता बैलभाड्या भेटला साहेब. तो नुसतंच त्याच्या आई बापाचं ऐकतो. घर म्हटलं की, भांड्याला भांड थटणार. परंतु त्याने त्याच्या बायकोचं म्हणजे शुभांगीचं पण थोडं ऐकायला पाहिजे ना? त्याचं आणि शुभांगीचं पटण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शुभांगी सुद्धा घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत आहे.”
घडी घातलेली नोटीस शानबाग वकिलांनी बाजूला ठेवली. कोर्टातल्या कामाची दुसरी फाइल उघडून ते म्हणाले, “घटस्फोटच घ्यायचा असेल तर, दोघांच्या संमतीने घेतलेला बरा पडेल पाटील. जावयाने तुमच्या मुलीवर केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत, तरी कोर्टामध्ये कागदोपत्री ते कायमचे तसेच राहतात. तुम्ही त्यांच्यावर केलेले आरोपही कागदोपत्री तसेच राहतात. नंतर दुसऱ्या लग्नाच्या वेळी या आरोप केलेल्या पोकळ कागदांचा दोघांनाही त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा आरोप-प्रत्यारोप न करता दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतलेला बरा.”
हेही वाचा – Indra Nooyi Book : सॅनिटरी पॅड, एक प्रवास….
शानबाग वकिलांच्या ऑफिसमधून उठताना भीमराव पाटील म्हणाले, “घरी जातो. सर्वांचा विचार घेतो. शुभांगीला आपल्यापुढे आणतो. त्यानंतर आपण ठरवू.”
बाहेर वातावरण कुंद झालं होतं. रोगट पाऊस शितुडं मारल्यासारखा पडत होता. चिटचिट पडणाऱ्या पावसातच भीमराव पाटलांनी आपल्या लाल रंगाच्या बुलेटला किक मारली. रस्त्यावर चिखलाची राड पसरली होती. घरापर्यंतचा रस्ता निसरडा झाला होता. कसरत करीतच ते घरापर्यंत पोहोचले.
दारात बुलेटचा आवाज ऐकून शुभांगीने दरवाजा उघडला. भीमराव पाटील आत पाऊल टाकायच्या अगोदरच शुभांगीने विचारले, “काय म्हणाले वकील? त्याच्यावर केस करूया बोलले का?” कागदपत्रांची वायरची पिशवी तिच्या हातात देत भीमराव पाटील म्हणाले, “तू अगोदर शांत हो. अजून तुझं खूप मोठं आयुष्य पडलं आहे. आपण त्याचाही विचार करायला हवा. एकमेकांवर केलेले आरोप कागदोपत्री तसेच राहिले तर, आपल्याला दुसरे लग्न करताना फार मोठी अडचण येणार आहे. त्यापेक्षा तडजोडीने प्रकरण मिटवूया, असे वकील म्हणाले.” शुभांगीच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. दरवाजा बंद करून ती पाय आपटत तिच्या खोलीकडे निघून गेली.
बाथरूममधून बाहेर येता येता, हात पाय पुसलेला टॉवेल त्यांनी खुंटीवर टाकला आणि कावेरीला हाक मारली.
“उद्या शुभांगीला घेऊन वकिलांकडे जायचं आहे. तुला पण यायला पाहिजे.”
स्वयंपाक घरातून चहाची कपबशी घेऊन कावेरी बाहेर आली आणि भीमरावांच्या पुढे धरत म्हणाली, “शुभांगी म्हणत होती, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. शुभांगीचा पती हुंडा मागतोय, अशी उलटी खोटी केस करूया. ती पण लवकरात लवकर.”
चहा पिऊन झाल्यानंतर भीमराव थोड्या रागातच बोलले. “तिचं वय काय? तिची विचार करण्याची क्षमता किती? तिची पोच किती? आपण किती ऐकावं लहान मुलाचं? तुला तरी कळायला हवं. जावयाने कोर्टात नको तसले आरोप केले आहेत. ते आरोप सिद्ध झाले नाही तरी, आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यापेक्षा उद्या जाऊन तडजोड करू.” गप गुमान कावेरी उठली. तिने रिकामी कपबशी घेतली आणि स्वयंपाक घरात निघून गेली.
पहाटे साडेपाचला भीमराव पाटील झोपेतून उठले. घड्याळात पहात कावेरीला म्हणाले, “उठा लवकर आणि आवरून घ्या पटकन. शुभांगीला पण उठवा. आज शानबाग वकिलांच्याकडे जाऊन तो विषय संपवायचा आहे. गाडी घेऊन ड्रायव्हर येईल आता एवढ्यात.”
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
सकाळी नऊ वाजताच ड्रायव्हरने दारात गाडी उभी केली. भीमराव पाटील ड्रायव्हरला म्हणाले, “तू आम्हाला शानबाग वकिलांकडे सोड आणि नंतर बाजारात जाऊन खताची दोन पोती घे. ती घरी आणून टाक. आमचं कोर्टातलं काम झालं की, तुला फोन करतो. मग आम्हाला न्यायला ये.”
गाडी रस्त्याला लागल्यावर भीमराव पाटील शुभांगीला म्हणाले, “तुझ्या ज्या काही शंका असतील,, त्या वकिलांना विचार. पुन्हा गडबड नको.” शुभांगी खिडकीतून बाहेर पाहात होती. तिने नुकती होकारार्थी मान हलवली.
ड्रायव्हरने शानबाग वकिलांच्या ऑफिससमोर थोडा वेळ गाडी थांबवली. शुभांगी आणि सर्वजण गाडीतून उतरल्यावर तो बाजारात निघून गेला.
ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्याअगोदरच शुभांगीला उद्देशून शानबाग वकील म्हणाले, “मी विरुद्ध पार्टीशी बोलून घेतलं आहे. ते पण घटस्फोटासाठी तयार आहेत. आता तुझ्या डोक्यामध्ये जो काही राग आहे, तो थोडा शांत कर. कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. झालं ते झालं. त्यावर आता विचार करण्यात अर्थ नाही. कोण चुकीचं कोण बरोबर हे ठरवत बसू नकोस.” त्यांनी काही कागद पुढे ठेवले.
समोरच्या कागदावर खूणा केलेल्या ठिकाणी सह्या करताना शुभांगी म्हणाली, “खरं म्हणजे, मला त्याला धडा शिकवायचा होता. त्याचा खूप मोठा बदला घ्यायचा होता. परंतु तुम्ही आणि आमचे पप्पा सांगताय म्हणून मी सह्या करत आहे.”
कागदपत्रांच्या घड्या करून त्या फाइलमध्ये ठेवताना, शानबाग वकील म्हणाले, “तुम्हाला कोर्टामध्ये पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता हजर राहावे लागेल. तिथे कोर्टाने विचारले तर, आमचे पटत नाही, त्यामुळे आम्हाला घटस्फोट हवा आहे, असं म्हणायचं आहे.”
त्या दिवशी कोर्टात संपूर्ण दिवस गेला. सगळ्या अशाच तक्रारी. पतीबरोबर पटत नाही. सासू घरी नको आहे. सासू-सासऱ्याला खर्चाला पैसे द्यायचे नाहीत…
कोर्टातून बाहेर पडल्यानंतर शानबाग वकिलांनी शुभांगी, कावेरी आणि भीमराव पाटील यांना बोलवून घेतले. म्हणाले, “तुम्ही आता शुभांगीचे दुसरे लग्न करण्यास मोकळे झाला आहात. कोर्टाने सहा महिन्यांचा कालावधी रद्द करून तुमचा अर्ज मंजूर केला आहे. त्या आदेशाची कॉपी तुम्हाला दोन-तीन दिवसांनी मिळून जाईल. तुमच्या जावयाने घाणेरडे आरोप केलेला अर्ज बिनशर्त मागे घेतला आहे. त्यामुळे त्या अर्जाचे नामोनिशाण सुद्धा उरलेले नाही. आता झाले गेले विसरून आनंदाने घरी जा.”
रात्री बऱ्याच दिवसांतून सर्वजण एकत्र जेवायला बसले. भीमराव पाटील कावेरीला म्हणाले, “आज खूप मोठ्या जोखडातून मुक्त झाल्यासारखं वाटतंय. आता आपण आपल्या मार्गाला लागूया. मी आठ-पंधरा दिवसांनी शानबाग वकिलांकडे जातो. त्यांच्याकडे अशा घटस्फोटाच्या केसेस असतात. त्यापैकी चांगल्या स्थळाची मी चौकशी करतो. आदेशाची नक्कल देताना मला शानबाग वकील म्हणाले होते, माझ्याकडे अशा बऱ्याच घटस्फोटाच्या केसेस आहेत. त्यामुळे चांगले स्थळ शोधता येईल. अर्थात, आता मुलीला पहिल्यासारखा नवरा मिळणे अशक्य आहे.”
आज सुट्टीचा दिवस होता. भीमराव पाटील बऱ्याच दिवसांनी सकाळी नऊ वाजताच शानबाग वकिलांच्या ऑफिसला आले होते. थोड्याच वेळात चहा आला. “घ्या चहा”, अशी खूण करून शानबाग वकील म्हणाले, “जे स्थळ मी सुचवले आहे, त्या मुलाचा मीच घटस्फोट करून दिला आहे. मुलाची काही चूक नाही. अत्यंत शामळू असा त्याचा स्वभाव आहे. एकदम सरळमार्गी आणि निर्व्यसनी आहे. मला या सर्व गोष्टी माहीत आहेत म्हणूनच मी मध्यस्थी करत आहे. मला उद्याही सुट्टी आहे. तुम्ही म्हणत असाल तर, उद्याच जाऊया.”
“चांगल्या कामाला उशीर नको साहेब. आम्ही सकाळी दहा वाजताच तुमच्याकडे येतो.”
स्थळ पाहायला गेल्यावर गाडीतून उतरताच भीमराव पाटलांनी सभोवार नजर टाकली. सुगंधचे अलिशान, ऐसपैस घर मोठ्या जागेमध्ये बांधले होते. पोर्चमध्ये पांढरीशुभ्र एर्टिगा गाडी उभी होती. दोघा भावांत पंधरा एकर काळीभोर जमीन होती. त्याशिवाय, सुगंध हा मोठ्या आयटी कंपनीमध्ये सर्व्हिसला होता. वर्षाला चाळीस लाखांहून जास्त रुपयांचे पॅकेज होते. भीमराव पाटलांनी मनात आणले असते तरी असे स्थळ शोधून सापडले नसते.
पाहुण्यांनी पाण्याचा तांब्या दिल्यावर त्यांनी चूळ भरली. तोंड धुवून ते आत आले. उंची फर्निचर, सुंदर नक्षीकाम केलेले कोच, पुस्तकाचे शेल्फ. संपूर्ण फॅमिली सुसंसकृत आहे म्हणायची.
शानबाग वकील सुगंधच्या वडिलांना म्हणाले, “हे भीमराव पाटील. यांची मुलगी आहे. दोन्ही कुटुंबे एकत्र आली तर दुधात साखर पडणार आहे.” सुगंधकडे वळून म्हणाले, “हा सुगंध. हाच मुलगा आहे. सर्वांनी पाहून घ्या.”
टापटीप कपडे घातलेला, अत्यंत देखणा मुलगा पाहून झाल्यावर निरोप घेताना भीमराव पाटील म्हणाले, “आम्ही तुम्हाला दोन दिवसांत कळवतो.”
हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स
स्थळ पाहून आल्यावर आठवडा झाला तरी, भीमराव पाटलांनी निरोप दिला नाही म्हणून शानबाग वकिलांनीच एके दिवशी भीमराव पाटलांना फोन केला. म्हणाले, “पाटील, मुलाचे स्थळ पाहून आपणास दहा दिवस होत आले. आपण त्यांना काहीतरी निरोप द्यायला हवा.”
“मी आपल्या घरी येऊन भेट घेतो. आपण प्रत्यक्ष बोलूया.”
सकाळी साडेनऊ वाजता भीमराव पाटलांची गाडी शानबाग वकील साहेबांच्या ऑफिससमोर उभी राहिली. ऑफिसमध्ये प्रवेश करताच शानबाग वकील म्हणाले, “आपण एक नंबरचे स्थळ निवडले आहे पाटील. आता त्यांना लवकरात लवकर निरोप द्यायला हवा.”
भीमराव पाटील निर्विकार, विचारमग्न राहिले. बाजूच्या खुर्चीवर ते शांतपणे बसले. ते काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने म्हणाले, “स्थळ एक नंबर आहे साहेब. मुलाला नोकरी चांगली आहे. जमीन पण चांगली आहे. परंतु मी खोलवर चौकशी केली असता ते घर त्या गावात रयताचं आहे. रयताच्या घरात काही झालं तरी मी मुलगी देणार नाही. त्यांचा आणि आमचा पदर जुळत नाही. शेवटी आम्ही किती केलं तरी खानदानी पाटील आहोत.”
“पाटील आता त्या सर्व जुन्यापुराण्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. पहिले लग्न पदर जुळवूनच केले होते ना? मग का झाला घटस्फोट? पदर जुळत नाही, हा खालचा, तो वरचा, हे कमीतले, ते जास्तीतले, आम्ही शहाण्णव कुळी, या गोष्टी कालबाह्य झाल्या पाटील. तुमची मुलगी कोरी असती तरीसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे स्थळ मिळालं नसतं. आता तर मुलगीला बट्टा लागला आहे. कशाला उगीच नको त्या गोष्टी किवचत बसताय? घटस्फोट झाल्यापासून तुम्ही पंधरा स्थळे पाहिली. तरीही तुमचा कुठे पदर जुळला नाही. त्या बिचाऱ्या शुभांगीने करायचे तरी काय?”
“तुम्हाला या गोष्टी समजायच्या नाहीत साहेब…” भीमराव पाटील काहीसे नाराज होऊनच उठले. मागे न पाहता ते ऑफिसमधून बाहेर पडले.
वर्गमित्र असला तरी शानबाग वकिलाला आपल्या घराण्याचा इतिहास कसा माहिती असणार? पंधरा काय अजून पन्नास स्थळे पहावी लागली तरी चालतील. पण रितीरिवाज सोडून कसं चालेल? घरात येईपर्यंत भीमराव पाटील हाच विचार करत होते.
बरोबर सहा महिन्यांनी भीमराव पाटलांची गाडी पुन्हा शानबाग वकिलांच्या ऑफिसमोर उभी राहिली. आत प्रवेश करताच त्यांनी त्यांच्या पुढ्यात वर्तमान पत्र टाकले. शानबाग वकील म्हणाले, “मी सकाळीच बातमी वाचली आहे पाटील. खरं म्हणजे, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला नको पाहिजे होती. शेवटी तुमची मुलगी सज्ञान आहे.”
भीमराव पाटलांनी खिशातून एक चिठ्ठी काढली आणि शानबाग साहेबांना दिली. शानबाग साहेब चिठ्ठी वाचू लागले.
“पप्पा, मला नाईलाजास्तव हा निर्णय घेणे भाग पडले आहे. शक्य असल्यास मला माफ करा. पहिल्या स्थळाबाबतही आपण माझा विचार केला नाही. घटस्फोट झाल्यापासून सुद्धा तुम्ही पहिल्यासारखाच विचार करत राहिला. आता चाड्यावरचा पाटील, वाड्यावरचा पाटील, पाटलांचा वाडा हे सगळं नष्ट झालंय. खानदानी पाटील, शहाण्णव कुळी पाटील, वतनावर आलेला, वाडीतला, गावातला, रयताचा असणारा या बाबी आता कालबाह्य होत आल्या आहेत. जग डिजिटल झालं आहे. तुमच्या डोक्यामध्ये सोळाव्या शतकातील सगळे बुरसुटलेले विचार आहेत. ते काढून टाका म्हटलं तरी, तुम्ही ऐकत नाही. आता आमचं नवीन व्हर्जन, नवीन जनरेशन आलं आहे पप्पा. आम्हाला या जीर्ण चौकटी माहीत नाहीत. तुम्ही आणि तुमच्या पिढ्यांनी या चौकटीतच आयुष्य घालवलेलं आहे. ‘पाटील म्हणलं की, उसाचा फड, तमाशाचा फड आणि कुस्तीचा फड यापलीकडे काही माहीत नव्हतं आम्हाला, असे तुम्हीच नेहमी म्हणत असता.’ आता कुठं पहिली दुसरी पिढी शिकली आहे. या शिकलेल्या पिढ्यांमध्ये आता अमुलाग्र बदल होत आहेत. हे बदल आपण शहाणपणाने स्वीकारणे गरजेचे आहे. आता जातीपातीच्या आणि उच्चनिचतेच्या कालबाह्य कल्पना काढून टाकल्या पाहिजेत. कारण आता संपूर्ण जगच एका मुठीमध्ये आलेलं आहे. जुन्या जळमटांच्या भिंती गळून पडू लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता बदल स्वीकारणं भाग आहे. यापलीकडे दुसरा उपायच नाही. मन मोठं करून मला स्वीकारले तर आनंदच होईल…”- शुभांगी.
शुभांगीची चिठ्ठी वाचल्यावर शानबाग वकील म्हणाले, “पुढे काय करायचं ठरवलंय?”
“पोलीस स्टेशनला त्या पोराविरुद्ध मुलगी पळवून नेल्याची तक्रार करायची म्हणून तुम्हाकडे आलो होतो.”
“तुम्ही आता काही केलं तरी, मुलगी जायची ती गेलेली आहे पाटील. पाण्यावर काठी मारली तर पाणी तुटत नाही. कधी ना कधी ती तुमच्याकडे येणारच. तुम्ही तिला स्वीकारणारच. नाही स्वीकारले तरी, तुमच्यावर पडलेला शिक्का मुजणार नाही. तुम्ही सोडा, अशा कित्येक जणांच्या सोयरी या जातीबाह्य, धर्मबाह्य झालेल्या आहेत. रडत-खडत का होईना, परंतु त्यांनी त्या स्वीकारलेल्या आहेत.”
एक दीर्घ उसासा सोडून भीमराव पाटील म्हणाले, “निदान आपल्या जातीचा तरी हवा होता.”
“वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नाही पाटील. पंधरा स्थळे जातीमधलीच होती ना? त्यांना का नाकारले? आता पोलीस स्टेशन, तक्रारी वगैरे डोक्यातून काढून टाका. शांतपणे हा बदल स्वीकारा.”
भीमराव पाटील खाली मान घालून बसले होते. चुलीवर पापड तडकतो तसे ते आतल्या आत तडकत राहिले. चोळामोळा झाल्याप्रमाणे ते कसेतरी उभा राहिले. ढकलून दिल्यासारखे चालू लागले. त्यांनी हळूहळू आपले घर जवळ करण्यासाठी रस्ता धरला…!!!
अवांतर या डिजिटल पोर्टलवर माझी कथा घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
अवांतर मी वाचून पाहिले. साहित्य क्षेत्रातील उगवता सूर्य म्हणजे अवांतर पोर्टल आहे. खूप सुंदर आणि अत्यंत सकस साहित्य अवांतर वरून नेहमी प्रसिद्ध होत आहे..
अवांतरच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..