रविंद्र परांजपे
आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या.
शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या भाषेत सहज समजतील अशी वैशिष्ट्ये म्हणजे – जेवणाच्या वेळेस कडकडून भूक लागणे, अन्न व्यवस्थित पचणे, मलक्रिया व्यवस्थित असून नैसर्गिकरीत्या कार्य करणे म्हणजे मलविसर्जनानंतर पोट हलके वाटणे, रात्री शांत आणि गाढ झोप लागणे, शरीरात कोणतेही दुखणे अथवा कुठलाही विकार नसणे आणि मन प्रसन्न तसेच आनंदी असणे.
थोडक्यात, निरामय आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोल असलेली स्वस्थ आणि रोगमुक्त अवस्था होय. सोप्या भाषेत, ‘शरीराने आणि मनाने स्वस्थ’ अशी अवस्था म्हणजे आरोग्य होय. ‘निरामय’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ निरोगी असा आहे. निरामय म्हणजे सात्त्विक आणि सकारात्मक असेही म्हणता येईल.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
निसर्गातील पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि आत्मा म्हणजे मन यांचा एकत्र उचित योग झाला म्हणजे त्याला शरीर म्हणतात. शारीरिक आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य म्हणजे मनाचे आरोग्य या ‘आरोग्य’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडक्यात, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य एकमेकांशी गुंफलेले आहे.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
मन आणि शरीर अभिन्न असून यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी आपण यथायोग्य प्रयत्न केल्यास निरामय आरोग्य प्राप्ती आणि संवर्धन निश्चित होईल आणि परिणामी आपले जीवन खचितच अधिक सक्षम, सफल आणि समृद्ध म्हणजेच निरामय होईल.
क्रमश:
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांनी निरामय आरोग्य संकल्पना घेऊन योगाभ्यास, आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या विषयांवर माहितीपूर्ण मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकांसाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करता येईल.)
मोबाइल – 9850856774
khup sundar article…👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद