Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    Recipe : आजचा मेन्यू सामोसे!

    November 27, 2026

    विवाह योगाचा अभाव की ग्रहांचा प्रभाव?

    November 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…
    ललित

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरNovember 27, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, मराठी साहित्य, मराठी लेख, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी, लेखिका माधवी माहुलकर, तुळशी विवाह, अभिजात मराठी, त्रिपुरारी पौर्णिमा,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आमच्या घरी ज्या ताई घरकाम करतात, त्यांनी मला त्यांच्या वस्तीमध्ये तुळशी विवाह सामुदायिकरित्या कसा धुमधडाक्याने साजरा केला जातो ते सांगितले. त्यांच्या मुलीने मला त्या तुळशी विवाहाचे फोटो पण पाठवले. ते सर्व पाहून मला खूप छान वाटले. शहरांमधून हळूहळू नाहीशी होत चाललेली ही पवित्र परंपरा या काळात वस्तीतील लोकांनी इतक्या सहजतेने जपून ठेवली आहे याचे जास्त कौतुक वाटले. या लोकांनी ही परंपरा फक्त जपून ठेवली नाही तर सामुदायिक पद्धतीने हा उत्सव साजरा करुन ही प्रथा भावी पिढीमध्ये रुजवत आहेत असं मला वाटतं. या कारणांमुळे मला याबद्दल उत्सुकता वाटली म्हणून मी हा धागा पकडून हा लेख लिहिला.

    तुळशीचे लग्न हा आपल्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात—विशेषतः कार्तिक एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा घरोघरी मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने केला जातो. लहानपणी घरोघरी होणारे तुळशीचे लग्न आजही मनात घर करून आहेत. तेव्हा दिवाळी संपली तुळशीच्या लग्नाची गडबड सुरु व्हायची. कार्तिक एकादशीला संध्याकाळी अंगणात उसाचा मांडव घातला जायचा; त्याखाली गेरूच्या रंगाने रंगवलेली तुळशी वृंदावने किंवा तुळशीच्या कुंड्या सजवल्या जायच्या. तुळशी वृंदावनाला गेरुच्या रंगाने रंगवल्यावर त्यावर पांढऱ्या चुन्याच्या रंगाचे नक्षीकाम केले जायचे त्यामुळे ते तुळशी वृंदावन आकर्षक दिसायचे. त्यावर ‘बोर भाजी आवळा, कृष्ण देव सावळा’ असे बोरुने लिहीले जायचे, त्याची मोठी गंमत वाटायची! ते वाक्य घोषवाक्यासारखं घोकत सर्व कच्चेबच्चे मंडळी अंगणामध्ये धावत असायची.

    अंगणामध्ये विवाहाकरता आलेल्या मंडळींना बसण्याकरता सतरंज्या, गालिचे अंथरले जायचे. झेंडूच्या माळा, आंब्याच्या पानांची तोरणे आणि विद्युत रोषणाई करुन घरदार सजवले जायचे. ऋुतुनुसार उपलब्ध असलेली बोरं, भाजी, आवळा, शिंगाडे, लाह्या बत्तासे आणि साखरफुटाण्यांसह पूजेच्या ताटात दिसायचे. तुळशी वृंदावनाच्या सभोवती पणत्या आणि धूप, अगरबत्त्या लावल्या जायच्या.

    हेही वाचा – Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    संध्याकाळी तुळशीला कापसाचे हळद-कुंकवाचे वस्त्र, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या अर्पण करून अगदी आपुलकीने सजवले जायचे. साध्या सुती कपड्याच्या उपरण्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढून अंतरपाट धरला जायचा. त्यापलीकडे गोपाळकृष्णाची पितळी मूर्ती ठेवली जायची, मग घरातील पुरुष मंडळींच्या खड्या आवाजातील मंगलाष्टकांच्या स्वरात तुळशीचे लग्न लावले जायचे. सर्वात शेवटी तुळशी लग्नाची कथा वाचली जाऊन आरती व्हायची. अंगणात जमलेल्या मंडळींकरता दिवाळीतील फराळाचे पदार्थ, दूध-पोहे, कच्चा चिवडा आणि शेंगदाणा लाडू असा प्रसाद वाटला जायचा; त्यानंतर लग्नाकरता आलेली मंडळी आपापल्या घरी रवाना व्हायची; त्या साधेपणात आणि आपुलकीत एक वेगळाच गोडवा असायचा.

    तुळशी विवाह उत्सव केवळ आपल्या शहरापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांत तो साजरा होतो. कोकणात अंगणातील तुळशी वृंदावन सारवून, गेरू-चुन्याने सजवून आणि गावकीच्या एकोप्याने हा सोहळा निसर्गाच्या सान्निध्यात रंगतो. उत्तर भारतात याला ‘देवुत्थान एकादशी’ किंवा ‘तुलसी-शालिग्राम विवाह’ म्हणून साजरे केले जाते; गुजरातमध्ये बाळकृष्णाची वरात काढली जाते, तर दक्षिण भारतात ‘क्षीराब्धी द्वादशी’च्या निमित्ताने आवळ्याच्या फांदीसह तुळशी वृंदावनाची दीपपूजा केली जाते. प्रांत, भाषा आणि पद्धती बदलल्या तरी तुळशीप्रती असलेली कृतज्ञता आणि मांगलिक भावना संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधून ठेवते.

    काळ बदलत गेला, पण सणामागची ही भावना आजही अनेक रूपांत जिवंत आहे. प्रत्येकाच्या दारात स्वतंत्रपणे लागणारी तुळस असली तरी कार्तिक एकादशीला एकाच अंगणात सामुदायिक तुळशी विवाहाचे निमित्त साधून जेव्हा वस्तीतल्या सगळ्याच तुळशी एकत्र येतात, तेव्हा त्या सोहळ्याला एक वेगळाच साज चढतो. आमच्या घराजवळच्या वस्तीत रंगणारा हा सामुदायिक तुळशी विवाह पाहिला की आपले विविध सण साजरा करण्याचा खरा आनंद ‘एकत्र’ येण्यातच असतो, याची प्रचिती येते. हा केवळ एका घरापुरता मर्यादित राहिलेला उत्सव नसून, संपूर्ण वस्तीला एका धाग्यात बांधून ठेवणारा एक जिवंत अनुभव आहे.

    संध्याकाळच्या वेळी अंगणात उभी केलेली ती उसांची रांग, खाली मांडलेल्या सजवलेल्या तुळशी, चिंच-आवळ्याची आरास आणि पणत्यांचा लखलखाट आजूबाजूचे सगळं वातावरणच मंगलमय झालेलं असतं. आपल्या घरातील एखाद्या लेकीबाळीचे लग्न असल्यासारखे वाटून त्या वस्तीतली मंडळी आवर्जून सजून-धजून तयार होतात; बायका छान जरीच्या साड्या नेसून, दागिने घालून, पुरुष मंडळी रेशमी कुर्ते पायजामे घालून तर लहान मुलंही आपले नवीन कपडे घालून त्या उत्साहात सामील होतात. हा सामुदायिक विवाह सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. जमिनीवर काढलेली रांगोळीची नक्षी, मांडलेली पूजेची ताटं, कलश आणि एकाच रांगेत सजवून ठेवलेल्या तुळशींमुळे या सोहळ्याला एक वेगळाच जिव्हाळा येतो. पूजा करताना बसलेल्या महिलांची ती शांत, भक्तिमय मुद्रा आणि सभोवतालची लगबग पाहताना हा क्षण केवळ डोळ्यांतच नाही तर मनातही घर करतो.

    काही ठिकाणी तर तुळशीला अगदी पारंपरिक नवरीचा थाट दिला जातो. तुळशीच्या वरच्या भागावर देवीचा मुखवटा चढवून त्यावर मुकुट घातला जातो, व एखादी सुंदर साडीपण तिला नेसवली जाते. लाल-केशरी वस्त्र, मोत्यांचे हार, हातातील हिरव्या बांगड्या, झेंडू आणि निशिगंधाच्या पांढऱ्या फुलांची माळ यामुळे ती सजलेली तुळस या सोहळ्याची शोभाच खुलवून टाकते. खाली काढलेली ‘शुभ विवाह’ची रांगोळी, लाल कुंकवांचे स्वस्तिक, तेवणाऱ्या पणत्या, फुलांची ताटं आणि पूजेचे साहित्य यांमुळे संपूर्ण मांडवात एक वेगळीच मंगलता भरून राहिलेली असते. प्रत्येक घरातील आपुलकी आणि कलात्मकता या सजावटीतून सहज डोकावते.

    हेही वाचा – गणपत वाणी… काल आणि आज!

    आपल्या संस्कृतीत अशी एक मान्यता आहे की तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कुटुंबातील विवाह सोहळ्यांना सुरुवात होत नाही. तसेच, घरात कन्या उपवर झाल्यावर तुळशीचे लग्न करणे अनिवार्य मानले जाते. यामागे एक सुंदर आणि खोलवर रुजलेला प्रतीकात्मक व कौटुंबिक अर्थ आहे. तुळस ही पवित्रतेचं, मांगलिकतेचं आणि वात्सल्याचं प्रतीक मानली जाते; तिच्या विवाहातून जणू घरातील मंगलकार्यांची आणि कन्येच्या भावी आयुष्याच्या शुभसंकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जाते, असा त्यामागचा भाव आहे. कार्तिक महिन्यात चातुर्मासाची सांगता होत असताना हा सोहळा होतो आणि सामुदायिक उत्सवात जेव्हा अनेक तुळशी एकत्र येतात, तेव्हा हा मंगलतेचा विचार आणखी व्यापक होतो.

    या सोहळ्याचा कळस गाठणारी गोष्ट म्हणजे विधींनंतरचा एकत्रित जेवणाचा आखला जाणारा बेत. गोडाधोडाचा स्वयंपाक आणि सगळ्यांनी मिळून केलेलं एकत्र जेवण अधिकच रुचकर होतं. त्या गोड पदार्थांपेक्षाही त्या एकत्र बसण्यात, गप्पांमध्ये, हास्यात आणि आपलेपणात एक वेगळीच गोडी असते. एकत्र जेवणाचा आनंद घेऊन झाला की लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, स्त्रियांचे, मुलामुलींचे विविध प्रकारचे खेळ आयोजित केले जातात, साधारणपणे बारा साडेबारापर्यंत हे सर्व मनोरंजनचे कार्यक्रम होतात आणि नंतरच सर्वजण आपापल्या घरी जातात. अशा प्रकारे दरवर्षी या वस्तीतील हा तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. एखाद्या सणाचा खरा स्वाद ताटातील गोडाधोडाबरोबरच शेजारच्या माणसांच्या सोबतीनेही खुलतो हे अगदी खरं आहे.

    आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक सण-परंपरेबद्दल ‘हे करावं की नाही?’ असे प्रश्न सहज विचारले जातात. तुळशीच्या लग्नामागची पवित्र भावना, कन्येच्या मंगल कार्याच्या संकल्पनेशी, ऋतूचक्राशी आणि शुभ कार्यांच्या सुरुवातीशी असलेलं नातं समजून न घेताच अनेकदा त्याकडे संशयाच्या किंवा वादाच्या नजरेतून पाहिलं जातं. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष अशा सामूहिक सोहळ्याकडे पाहतो, तेव्हा जाणवतं की हा केवळ एका पूजाविधीचा भाग नाही तर निसर्गातील बदलत्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध व्हायला सांगणारा हा एक प्रकार असावा असं वाटतं. थंडीची चाहूल लागत असतांना ऊस, बोर, चिंच व आवळ्यासारखे ऋतूमानानुसार येणारे घटक म्हणजेचं आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्याचे सेवन या निमित्ताने व्हायला हवे असाही संदेश अशा प्रकारच्या पूजा विधींमधून किंवा सण समारंभाततून दिला जातो व तोच विचार करून अशा प्रकारच्या पूजेची मांडणी केली जाते; आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकांना एकत्र आणणारा हा एक सुंदर निमित्तमात्र सोहळा या परंपरेतून जपला जातो. ज्या परंपरेतून लोकांमध्ये प्रेम, सहकार्य आणि एकत्र येण्याची भावना रुजते, तिचा मूळ हेतू समजून न घेता केवळ शंका उपस्थित करणं हेच अनेकदा त्यामागचा खरा गाभा न समजता ते चुकीचे ठरवलं जात.

    हल्ली प्रत्येकाचं जगणं आपापल्या चौकटीत आणि चार भिंतींत विभागलं गेलेलं असताना, हा सामुदायिक तुळशी विवाह खूप काही सांगून जातो. हा केवळ एक पारंपरिक विधी न राहता नात्यांपेक्षाही मोठा असा सामाजिक एकोपा टिकवून ठेवणारा जिवंत उत्सव ठरतो. वैयक्तिक आनंदापलीकडे जाऊन, आपापसातील हेवेदावे सोडून जेव्हा सारा समाज एका शुभ कार्यासाठी एकाच मांडवाखाली एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने सणाची मंगलता फुलते आणि तिथे कोणताही प्रश्न किंवा भेदाभेद उरत नाही, तिथे फक्त आपलेपणाच उरतो.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026 ललित

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026 ललित

    साडी अन् तीन पिढ्या…

    November 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उशिरा उजाडलेली पहाट

    By ॲड. कृष्णा पाटीलNovember 26, 2026

    “दादा प्राध्यापक झाला!” बातमी घराच्या अंगणातून बाहेर पडून गावाच्या पारावर पोहोचली. गावातल्या चौकाचौकात चर्चा सुरू…

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026

    साडी अन् तीन पिढ्या…

    November 25, 2026

    भूतकाळाच्या आठवणी

    November 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    Recipe : आजचा मेन्यू सामोसे!

    November 27, 2026

    विवाह योगाचा अभाव की ग्रहांचा प्रभाव?

    November 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां, पडती वस्तूच्या प्रकाशा

    November 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026

    November 27, 2026

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    Recipe : आजचा मेन्यू सामोसे!

    November 27, 2026

    विवाह योगाचा अभाव की ग्रहांचा प्रभाव?

    November 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.