“अमु, मी बाजारात जाऊन येते. तुझा आणि निलूचा नास्ता बनवून टेबलावर ठेवला आहॆ. तुमचं काम आटोपलं की नास्ता ओव्हनमध्ये गरम करून दोघींनी खाऊन घ्या बरं. तोपर्यंत मी जाऊन येते.”
दोघींचे पेपर सुरू होते, म्हणून त्यांना बाजारात नव्हतं पाठवायचं आईला, आणि त्यात बाबा पण दोन दिवस घराच्या बाहेर. मग घरातली सगळी धावपळ आईलाच करावी लागत होती.
“होय,” असं म्हणत दोघी अभ्यासाला लागल्या. आई पण घाईघाईत पिशवी आणि मोबाईल घेऊन बाहेर निघून गेली. जवळच तर आहे बाजार…
तेवढ्यात काही कामाकरता अमु बाहेर आली, पाहते तर काय? आई पर्स इथेच विसरली. आई पण किती गोंधळ करते आणि किती घाई करते. किती वेळा सांगितलं ऑनलाइन व्यवहार शिक.
हेही वाचा – आठवणींची छोटी वाटी
तिकडे आई बाजारात पोहचली. आईने भाजी विकत घेतली आणि पाहते तर काय हातात पर्सच नाही.
दरम्यानच्या काळात अमुनी आईला फोन केला. आईने फोन उचलला “आई, काय करतेस अगं, तू एक नंबरची वेंधळीच आहे, तुझी पर्स तर घरीच विसरून गेली.”
तेवढ्यात आई म्हणाली, “थांब, मी घरी येते.” अमु आईला म्हणाली, “आई भाजीवाल्याचा नंबर दे मला आणि किती पैसे झाले सांग. मी ऑनलाइन पेमेंट करते. परत घरी येशील, परत पैसे त्याला दयायला जाशील का?”
आईने भाजीवाल्याचा नंबर घेतला, अमुला पाठवलं आणि ऑनलाइन पेमेंट झाल्यानंतर आई घरी आली. आल्या आल्या अमुनी आईला सांगितलं “अगं, शिकून घे सगळं. ऑनलाइन पेमेंट करणं खूप सोपं आहे गं ते.”
आई पण लगेच म्हणाली, “नको गं, मला नाही जमणार ते. मी कॅश घेऊन जाते आणि कॅशने व्यवहार करते.”
“आई? अगं कधी तरी तुला बदलावं लागेल गं… आणि नवीन तांत्रिक जगातील काही गोष्टी शिकाव्याच लागतील. तुला नाही माहिती हे सगळे ऑनलाइनचे फायदे. कधीही सोबत कॅश ठेवायची गरज नाही आणि भीती पण नाही. केव्हाही कुठेही गेलीस तरी पटकन पैसे ट्रान्सफर करता येतात.”
“मला शिकायला वेळ लागेल. इतक्या पटकन नाही शिकता येणार,” असं म्हणत आई परत कामाला लागली.
आपला काळ वेगळाच होता. सगळे व्यवहार कॅशमध्ये व्हायचे. मग तो व्यवहार कितीही मोठा असो. लग्नकार्याची खरेदी असो की, किराणा बाजाराची. प्रत्येक व्यवहार कॅशनेच व्हायचा. भले त्यावेळेस स्मार्टफोन नव्हता, पण आपण स्मार्ट होतो व्यवहारात! त्यावेळेस पैशांचा हिशोब ठेवावा लागायचा, घराच्या बाहेर गेलं की पैसे सांभाळावे लागायचे. सोपं नव्हतं. कोणाला किती पैसे दिले आणि घेतले. सगळे व्यवहार वहीत लिहून ठेवावे लागायचे. नंतर हिशोबच्या वेळेस गडबड नको व्हायला म्हणून… आतासारखं थोडंच होतं.
तेव्हा कितीचं सामान घेतलं,.. किती पैसे खर्च झाले… किती पैसे मोजले… आणि मग घरी येऊन एक छोटासा कॅलक्युलेटरने हिशोब करायला लागायचा… आणि आता तर प्रत्येक गोष्ट ऑनलाइनच पे होते. सगळे व्यवहार मोबाईलमध्येच. आठवायची गरजच पडत नाही… कोणाला जवळ पैसे बाळगायची आवश्यकताच भासत नाही. अगदी औषधालासुद्धा कधी कधी रोख पैसे नसतात!
हेही वाचा – महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!
पूर्वी कोणाकडे गेलं की, जवळ चिल्लर ठेवायचो. निघताना घरातल्या लहान मुलांच्या हातात द्यायला पाच-पन्नास रुपये ठेवायला लागायचे खाऊसाठी…
आई विचारांच्या तंद्रीत होती आणि तेवढ्यात दारावरती एक कुरियरवाला आला. “मॅडम हे कुरिअर. पण आधी तीनशे रुपये पेमेंट करा. मग घ्या.”
आई पर्समधले पैसे मोजून त्याला देत होती तेवढ्यात, “आई, तुझ्याजवळचे पैसे राहू दे. मी करते त्याला पेमेंट.” अमुने लगेच मोबाईलने पैसे सेंड केले… कारण आता स्मार्टफोनचा काळ आहे!
अमुचा जास्त भरोसा ऑनलाइनवर! कोणतेही काम असो गुगल इंटरनेटशिवाय अपूर्णच…
0000
अमुची परीक्षा झाल्यावर तिला तिच्या मैत्रिणीकडे फिरायला जायचं होतं. तिने तशी तयारी पण केली होती. तिला फोन करून कळवलं होतं, येण्याची तारीख सांगितली होती. तिने जाण्याचे तिकीट ऑनलाइन बुक केलं आणि तीन-चार दिवसांनी ती प्रवासाला निघाली.
तरी तिला आईने म्हटलं होतं की, सगळ्यांचे नंबर मोबाईलबरोबरच एका डायरीमध्ये लिहून ठेव. तिला काही कॅशही दिली होती. पण त्याची काहीच गरज नाही, असं म्हणत तिने ते बाजूला ठेवले.
“ज्याच्याकडे “स्मार्टफोन” आहे त्याला कोणाचीच गरज पडत नाही,” असं म्हणून अमुनी आईची मदत नाकारली… आणि चार तासानंतर ती तिच्या मैत्रिणीच्या गावी पोहोचली.
मैत्रिणीला फोन केला, पण ती फोनच उचलतच नव्हती. चहा-नाश्ता करू तोपर्यत… मैत्रीण घ्यायला येईलच… याविचाराने अमु हॉटेलमध्ये गेली. चहा घेतला आणि ऑनलाइन पेमेंट करायला गेली, तर पेमेंटच होईना! तिने चौकशी केली की, नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे? सगळीकडे सर्वर डाऊन आहे, असं उत्तर तिला मिळालं. म्हणून पेमेंटच होत नव्हतं. तिने आपल्या पर्समध्ये इकडे तिकडे पाहिलं काही चिल्लर आहे का? काही पैसे आहेत का? आपलं एटीएम कार्ड पण शोधत होती, पण घाई गडबडीत ते कार्ड घरीच राहून गेलं होतं.
आणि त्यात मैत्रिणही फोन नव्हती उचलत. अमुला काय करावं कळतच नव्हतं. एवढ्यात समोर ऑटोवाला येऊन उभा राहिला, तिला विचारता होता मॅडम, कुठे जायचं आहे? म्हणून. पण ती पेमेंट कशी करणार होती?
शेवटी तिला आईला फोन करून इथली परिस्थिती सांगावीच लागली. आईने तिला सांगितलं, “तुझ्या पर्समध्ये जिथे कॉस्मेटिक ठेवले त्या कप्प्यात बघ, काही कॅश ठेवली आहे मी आणि एक लहानशा डब्यात सुका नाश्ताही ठेवला आहे, तुझ्या कपड्यांच्या बॅगमध्ये” आणि तिला शोधायला लावला.
तिला कॅश मिळाली जी आईनी आधीच पर्समध्ये ठेवली होती. सुका नाश्ताही मिळाला.
आईने तिला विचारलं “अगं तुझा तो गुगल बाबाचा “जादुई चिराग” ऑनलाइन, आता काहीच काम करत नाही नं? जवळ असलेली कॅशच मदतीला आली आहे आणि तू मला खूप नावं ठेवायची, राहू दे तुझी कॅश… राहू दे तुझी कॅश… आधुनिक तंत्रज्ञान शिकून घे, पैसे हरवण्याची भीती नसते आणि बाळगायची पण, शेवटी माझंच तंत्रज्ञान इमर्जन्सीमध्ये कामाला आलं… शेवटी आई नावाचा जीनच धावून आला की!”
अमुला आईच्या अनुभवाची कमालच वाटली. कधी स्मार्टफोन नाही वापरला पण तिचा व्यवहार स्मार्टफोनपेक्षा कमी नाही हे एव्हाना तिच्या लक्षात आलं


