नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आले तुमच्या भेटीला!
शिस्त म्हणजे शिस्त… हे आपण लहानपणापासूनच ऐकत मोठे झालो. ‘खाण्यापिण्याचे लाड, पण बाकी ऐकलं नाही तर फटके मिळतील…’, लहानपणी सगळ्यांनीच हे ऐकले असेल.
हळूहळू मोठे होताना ही शिस्त आणखी कडक होत गेली. जसं की संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत घरात… हात, पाय, तोंड धुणं… शुभंकरोती म्हणून झाल्यावर 30 पर्यंतचे पाढे घडाघड म्हणायचे… मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा… आणि मग अभ्यासाला बसायचं. अभ्यास नसेल तर आईला कामात मदत करायची. हाही शिस्तीचाच एक भाग!
सकाळी उठल्यावर बसल्या जागी देवाचे आभार मानून नमस्कार करायचा. आपल्या पांघरुणाची आपणच घडी घालायची. आन्हिक उरकून शाळेची तयारी स्वत:च करायची. फक्त केस खूप लांब होते म्हणून वेण्या तेवढ्या आईने घालून द्यायच्या… ही झाली घरातली शिस्त किंवा संस्कार म्हणा!
बाहेर गेल्यावर आई जरा जास्तच कडक व्हायची. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर कशालाही हात लावायचा नाही… कुठेही चढायचं नाही… वरच्या मजल्यावरून कुठेही वाकायचं नाही… बरं, मी भयंकर आचरट. त्यामुळे आई अगदी डोळ्यात तेल घालून असायची.
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे गेल्यावर वातावरण जरा वेगळंच असायचं. मोठे मामा फारच स्ट्रिक्ट होते. एके दिवशी ते ऑफिसमधून घरी आले आणि मला काही कळायच्या आतच फाडकन मुस्कटात लगावून दिली. मला काही कळेच ना! सकाळी आलेल्या पेपरची घडी फारच अस्ताव्यस्त होती. त्यांना वाटलं की, मीच अशी घडी घातली… नि दिली मला एक लगावून!
नंतर त्यांना कळलं की, ती घडी मी नव्हती घातलेली.. पण त्यामुळे पेपर वाचन हे आता अधिक सक्तीचं झालं. पेपर तर वाचायचाच, पण त्याचबरोबर त्याची घडी नीट जुळवून घालायची, हेही होतंच.
लहानपणी चुकून मिळालेली मुस्कटात आजही लक्षात आहे. आज मामा हयात नाहीत, पण त्यांनी लावलेली शिस्त मात्र अजूनही अंगिकारली जाते. चादरी, साड्या, कपडे, पुस्तकं, किचन सर्व अगदी व्यवस्थित जागेवर असतं. घरून जर का कॉल आला आणि एखाद्या वस्तूबद्दल विचारलं तर, मी जिथे असते तिथून सहजपणे ती कुठे आहे, ते सांगू शकते. त्याचं कारण वागण्यातील शिस्त. शिस्त असली की, वळण आपोआपच लागतं. त्यासाठी मुलांवर हात उचलायची गरज लागत नाही. मागच्या पिढीची शिस्त वेगळी आणि आता आमच्या मुलांना लावलेल्या शिस्तीचा प्रकार वेगळा. पण शिस्त तर हवीच.
हेही वाचा – गुरू अन् शिष्याची घट्ट ‘वीण’