अध्याय पंधरावा
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें । आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥272॥ कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥273॥ आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥274॥ जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥275॥ तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उधविती जिभा । मग नामरूपाचा बडंबा । करिती वायां ॥276॥ पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥277॥ संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥278॥ अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥279॥ जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥280॥ पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥281॥ पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें पैं आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥282॥ आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥283॥ परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥284॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-
अर्थ
जिभेने जशी आपली चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पाहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहाणे आहे. ॥272॥ अथवा तेज जसे तेजास मिळावे, अथवा आकाशाने जसे आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे ॥273॥ आपणच आपल्याला अद्वैतभावाने जे पाहावयाचे ते असे आहे, हे मी खरे सांगतो. ॥274॥ जे आत्मस्वरूप पाहाणेपणा घेतल्याशिवाय पाहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पाहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य पुरुष असे म्हणतात. ॥275॥ त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन वेस आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ्य गलबला करतात. ॥276॥ संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व अष्टांग योग व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाहीत, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले ॥277॥ वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे सत्यलोक हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात, ॥278॥ आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपरूपी घरात जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात. ॥279॥ ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मी-तूपण जगात प्रचारात आणले. ॥280॥ ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते. ॥281॥ अर्जुना, ते आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पाहावे. ते कसे तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात दृश्य, द्रष्टा व दर्शन ही त्रिपुटी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहाणे होय). ॥282॥ अर्जुना, आत्मस्वरूपाला ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की, ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही. ॥283॥ परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याचे जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो, असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात. ॥284॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हें पाहाणें ऐसें असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा


