तिसरा आणि शेवटचा भाग
सहामाहीचा रिझल्ट लागला. मानसच्या अपेक्षेप्रमाणे त्याला 75 टक्के मिळाले. पण सुभाष-सुनीताला जबरदस्त धक्का बसला. सुनीताच्या आजारपणामुळे त्याला कमी मार्क्स मिळतील, याची त्यांना कल्पना होतीच, पण रिझल्ट इतका खाली येईल, असं त्यांना वाटलं नव्हतं. त्याला वाईट वाटेल म्हणून ते त्याला चकार शब्द बोलले नाहीत.
एक दिवस मानस घरी नसताना सुभाष सुनीताला उद्वेगाने म्हणाला, “मला वाटतं आपण आता मानसकडून अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे.”
“करतोय हो तो प्रयत्न… मधेमधे अडचणीच अशा आल्या की, त्याचाही नाईलाज होता.”
“त्याने तो क्लास सोडायचा मूर्खपणा करायला नको होता. घरी अभ्यास झाला नाही, तर तिथे तरी होऊ शकला असता…” सुभाष नाराजीने म्हणाला.
“हो, ते तर खरंच आहे. मलाही त्याचा तो निर्णय पटलेला नाही… पण जाऊद्या आपण त्याला काही बोलायचं नाही. बघताय ना आजकाल मुलं थोडंसं कुणी वाईट बोललं की, लगेच जीवाचं बरंवाईट करून घेतात. जाऊ द्या नाही डॉक्टर झाला तर इंजिनीअर तर नक्कीच होईल!”
“आजकाल इंजिनीअर तर कुणीही होतंय गं! बघितलं ना कसा बाजार मांडून ठेवलाय राजकारण्यांनी इंजिनीअरींगचा. दरवर्षी लाखो इंजिनीअर्सचं प्रॉडक्शन होतंय. नोकऱ्या कुठे आहेत या इंजिनीअर्सना?”
“पण मेडिकलमध्येही तर सगळी अनिश्चितता आहे. अगोदर एम.बी.बी.एस.करायचं. मग एम.डी. त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करुन दवाखाना टाकायचा. तो चालला तर ठीक आहे नाही तर, एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला नोकरी करायची. मॅनेजमेंटच्या हुकमानुसार पेशंटच्या जीवाशी खेळायचं. सगळा जीवघेणा प्रचंड पैशाचा खेळ. आपल्याला जमेल असं वाटतंय तुम्हांला? आपण अशी मध्यमवर्गीय माणसं. ना कुठलं रिझर्व्हेशन ना कुठल्या सवलती”
सुभाषने एक निश्वास सोडला.
“खरंय तुझं म्हणणं. मानसची परीक्षा झाली की आपली परीक्षा सुरु होणार आहे. कधीकधी विचारांनी झोप लागत नाही.”
“म्हणूनच तर म्हणतेय, नको आपण मानसवर प्रेशर आणायला. आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादायला. नाही मेडिकल तर इंजीनियरींग करेल”
“आपल्यावेळी किती छान होतं ना सुनीता! अभ्यासाचं, अपेक्षांचं कोणतंच ओझं नसायचं. साधं ग्रँज्युएट झालं तरी नोकऱ्या लागायच्या. पगार कमी असला तरी आपण समाधानी होतो.”
“तसं आताही आपण समाधानी आहोत. फक्त मानसच्या भवितव्यासाठी आपण बैचेन झालोय. त्या बिचाऱ्याची एकच चूक आहे की तो एकुलता एक आहे. त्यामुळे आपल्या आशा-अपेक्षांचा केंद्रबिंदू तोच आहे. ही त्यालाही जाणीव आहे. म्हणून त्याच्यात अकाली प्रौढत्व आलंय. भाऊबहीण कुणी असतं तर त्याला मन तरी मोकळं करता आलं असतं. आपल्याजवळ तो खुलत नाही. त्याचा ताण त्याच्या चेहऱ्यावर आजकाल दिसू लागलाय.”
“ठीक आहे, यापुढे आपण त्याला अभ्यासाबद्दल काही विचारायचं नाही. जसं होईल तसं.”
“तो तसाही सिन्सीयर आहे” सुनीता म्हणाली “मग आपण उगीचच त्रास का द्यायचा”
तेवढ्यात मानस आला आणि त्यांचं बोलणं खुंटलं.
0000
हेही वाचा – मानसची सहामाही आणि आईचे आजारपण…
परीक्षा जवळ आली तसा मानस अभ्यासात गुरफटून गेला. त्याच्या मित्रांचे आता क्रँश कोर्सेस सुरु झाले होते. या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं याबद्दल मानसला उत्सुकता होती. पण प्रचंड फी देऊन हे क्लास लावणाऱ्या मित्रांना विचारणंही त्याला योग्य वाटत नव्हतं. इंटरनेटवरुन तो जमेल तितकी माहिती घेत होता, पण त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. आजकाल त्याचा आत्मविश्वासही डळमळीत होत चालला होता.
एके रात्री 12 वाजता सुनीता पाणी प्यायला उठली. मानसच्या खोलीत उजेड पाहून तिने खोलीचं दार सहज ढकलून पाहिलं. मानस टेबलवर डोकं ठेवून रडत होता. सुनीता लगेच त्याच्याजवळ गेली.
“मानस, काय झालं? का रडतो आहेस?” तिने चिंतातूर होऊन विचारलं. त्याने आईकडे पाहून डोळे पुसले. सुनीताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तसा रडवेल्या स्वरात तो म्हणाला,
“खूप टेंशन आलंय आई. खूप भीती वाटतेय परीक्षेची.”
“बेटा असं घाबरुन कसं चालेल परीक्षेला? ही तर फक्त बारावीची परीक्षा आहे. अजून पुढे कितीतरी परीक्षा द्यायच्या आहेत तुला. तुला सांगू माणसाचं आयुष्य हीच एक परीक्षा आहे. शैक्षणिक परीक्षा आटोपल्या की माणसाची जीवनाची परीक्षा सुरु होते. नोकरीसाठी लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू सुरु होतात. नोकरी लागेपर्यंत बेरोजगारीचा काळ सहन करणे हीसुद्धा एक परीक्षाच असते. नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवणं, त्यात बढती मिळवणं, ही परीक्षाच असते. नोकरीत बस्तान बसल्यावर चांगली बायको किंवा नवरा मिळवणं, लग्नानंतर एकमेकांशी जमवून घेणं हीही एक परीक्षाच. मग मुलं होतात. त्याचा सांभाळ करणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, ती सगळ्या क्षेत्रात पुढे जातील, त्यांची प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणं, शिक्षण झालं की त्यांच्या नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करणं या सगळ्या परीक्षाच तर आहेत बेटा”
मानस काही बोलला नाही. पण कुठेतरी त्याच्या काळजात ते भिडत होतं.
“इतकं आयुष्य कठीण असतं आई?” त्याने विचारलं .सुनीता हसली.
“नाही रे बाळा. एकदा या परीक्षांची सवय झाली की त्यांचं काही वाटेनासं होतं. म्हणूनच म्हणते टेंशन घेऊ नकोस. मी आणि तुझ्या बाबांनी मेडिकलचा हट्ट सोडलाय. नाही जमलं मेडिकलचं तर इंजीनियरींगला ॲडमिशन घ्यायची.आता रिलॅक्स हो. झेपेल तेवढाच अभ्यास कर. अभ्यास करुनकरुन आजारी पडलास तर ते जास्त महागात पडेल. चल झोप आता.”
मानसला एकदम हलकंहलकं वाटू लागलं. मनावर आलेलं मळभ नाहीसं झालं. एक नवीन उत्साह, उमेद जागृत झाली.
“आई मलाही इंजीनियरींगपेक्षा मेडिकल आवडतं. मी प्रयत्न करणार आहेच. पण नाही जमलं तर प्लीज नाराज होऊ नका”
“नाही होणार. चल पुरे कर अभ्यास”
मानस प्रसन्न मनाने झोपायला गेला.
0000
हेही वाचा – मानसची क्लास ॲडमिशन
परीक्षा सुरु झाली. मानसच्या मनावरचं अपेक्षांचं ओझं उतरल्यामुळे त्याचं डोकं उत्तमरित्या काम करत होतं. परीक्षेची भीती नाहीशी झाली होती, त्यामुळे प्रत्येक पेपर त्याला सोपा वाटत होता.
परीक्षा संपल्यावर सुभाषने त्याला विचारलं.
“किती मिळतील असं वाटतंय तुला?”
“इंजीनियरींगला ॲडमिशन मिळेल एवढे नक्की मिळतील.”
सुभाष काही बोलला नाही पण मनातून तो नाराज झाला. मानसने मेडिकलसाठीच प्रयत्न करावे असं त्याला अजूनही वाटत होतं पण सुनीता आणि त्याचं ठरल्याप्रमाणे त्याने शांत रहाणंच पसंत केलं.
रिझल्टचा दिवस उजाडला. सुनीताच्या उरात धडधड होऊ लागली. आपला अपेक्षाभंगच होणार आणि तसा झाला तर आपण मानसला काहीतरी बोलून बसू या भीतीने सुभाष कामावर निघून गेला. अकरा वाजता घरातलं नेट व्यवस्थित चालत नाही म्हणून मानस सायबर कॅफेत निघून गेला. सुनीता घरातच थांबली. विपरीत रिझल्ट लागला तरी तिने मनाची तयारी करुन ठेवली होती. पण मानस आणि सुभाषच्या प्रतिक्रिया कशा असतील या कल्पनेने तिचा थरकाप उडत होता.
बारा वाजले. अजून काहीच कळत नव्हतं. सुनीता बैचेन झाली. मानसला फोन करण्यासाठी तिने मोबाईल उचलला. तेवढ्यात मोबाईलच वाजला. अपरिचित नंबर होता. तिने धडधडत्या काळजाने तो उचलला.
“काकू मी मानसचा मित्र बोलतोय. मानस कुठेय?”
“अरे तो सायबर कॅफेच गेला आहे रिझल्ट बघायला. का काय झालं?”
“अहो काकू, तुम्हांला कळलं नाही?”
“का…काय कळलं नाही?” सुनीताने अधीरतेने विचारलं.
“अहो काकू मानस पूर्ण जिल्ह्यातून पहिला आलाय आणि महाराष्ट्रातून दुसरा. पार्टी पाहिजे हं काकू”
“काय म्हणाला तू? परत एकदा सांग” सुनीताच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले.
“काकू, मानस महाराष्ट्रातून दुसरा आणि जिल्ह्यातून पहिला…..”
सुनीताने पुढचं ऐकलंच नाही. मोबाईल तसाच ठेवून ती मोठमोठ्याने रडू लागली. तेवढ्यात फाटक वाजलं. तसंच रडत रडत तिने दार उघडलं. मानस बाहेर उभा होता. त्याचे डोळे रडवेले दिसत होते. आईला रडतांना पाहून त्याने तिला “आई” म्हणून मिठी मारली आणि तोही रडू लागला.
” तुला कळलं ना आई?” त्याने रडतरडत विचारलं.
“हो बाळा, कळलं मला! खूप खूप अभिनंदन बेटा”
फोन वाजला. सुनीताने तो घेतला. सुभाष बोलत होता.”सुनीता मला आताच कळलं मानसबद्दल. पोराने स्वप्न पूर्ण केलं आपलं…” पुढे त्याला बोलता येईना.
“बोलताय त्याच्याशी?”
“नाही मी घरी यायला निघालोय. कधी एकदा त्याला भेटतोय असं झालंय. आल्यावरच बोलतो त्याच्याशी”
सुनीताने फोन ठेवला. पण नंतर फोन सातत्याने वाजू लागला. मानसचे मित्र, नातेवाईक, परिचित आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर सर्वांना मानसशी बोलायचं होतं. कोणताही क्लास न लावता त्याने इतकी उत्तुंग भरारी घेतलीच कशी हे सर्वांना जाणू घ्यायचं होतं.
थोड्या वेळाने सुभाष आला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानसला जवळ घेतलं.
“बारावी तर झाली. आता “नीट” राहिलीये. एक टेन्शन अजून बाकीच आहे” सुभाष म्हणाला.
“काही काळजी करु नका बाबा. माझी “नीट”ची तयारी झालीय. उद्यासुध्दा मी परीक्षा देऊ शकतो आणि नक्कीच चांगला स्कोअर करु शकतो” मानस आत्मविश्वासाने म्हणाला.
प्रेस फोटोग्राफर आले. मानसला पेढा भरवतांना सुनीता-सुभाषचे फोटो निघू लागले. मागच्या वर्षभरातील घटना मानसच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या आणि आयुष्यातली एक अवघड परीक्षा उत्तीर्ण केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं.
समाप्त


