अचानकपणे मित्रासोबत कोकणात जायचा योग आला. प्रवासात एके ठिकाणी हिरवीगार जमीन बघून आमच्या दोघांची मनं हरखून गेली.
“थांबू या का इथे थोडावेळ?”
आम्ही दोघांनीही एकमेकांना एकदम विचारले आणि आम्हाला हसू आलं. मित्राने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडी लॉक करून पाय मोकळे करायला म्हणून आम्ही शांतपणे रमतगमत चालायला सुरुवात केली. थोड्याच अंतरावर त्या हिरव्यागार जमिनीच्या एका तुकड्यावर एके ठिकाणी लहान-मोठी अशी 7-8 जण काम करताना दिसली. लांबूनच त्यातील एकाने आम्हाला बघितले आणि शेताच्या बांधावरून झपझप पावले टाकत तो आमच्या जवळ आला आणि म्हणाला,
“दादा गाडी बंद पडली असली तरी काळजी नका करू. शेतावरच्या बाकड्यावर बसा. इथून जवळच दुरूस्ती करणारा आहे. फोन केला की येईल लगेच…”
खरं तर ओळख ना पाळख. पण त्याने दाखवलेली माणुसकी आणि आपुलकी दोन्ही बघून आमचे डोळे पाणावले.
“अरे, नाही नाही. गाडी बंद पडलेली नाही. पण इथला हिरवागार निसर्ग बघून आम्हाला थांबावसं वाटलं म्हणून थांबलोय आम्ही…” मी त्याला म्हणालो.
“असं होय. हरकत नाही. मग चला की शेताकडे. चहा देतो मस्त आलं ठेचून टाकलेला. थोडा वेळ डोळे मिटून बसा शांतपणे आणि आनंद घ्या निसर्गाचा.”
आम्ही ‘हो’ ‘नाही’ म्हणायच्या आत त्याने माझा हात धरला आणि माझ्या मित्राकडे बोट दाखवत म्हणाला, “त्या दादांना जमंल, तुम्हाला कदाचित बांधावरून चालायला जमणार नाही म्हणून मी तुमचा हात धरलाय.” तो म्हणाला ते खरंच होतं. नुकताच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे सगळीकडे बऱ्यापैकी चिखल झाला होता. सावकाश पावलं टाकत आम्ही दोघेही त्या शेतावर पोहोचलो.
हेही वाचा – आशेचे कंदील आणि जगण्याची दिवाळी!
जेमतेम 3-4 माणसं बसतील असं एक बाकडं तिथे होते. त्यावरच आम्ही टेकलो. इतक्यात एक म्हातारे गृहस्थ समोरच्या शेतातून आमच्याकडे चालत आले.
“बा, तू म्हणालास म्हणून गेलो यांच्याकडे विचारायला, पण हे म्हणाले गाडी व्यवस्थित आहे. म्हणून त्यांना म्हटलं की, आता थांबलाच आहात तर चहा पिऊन जा…” आम्हाला भेटलेल्या मुलाने त्याच्या वडिलांना आमची ओळख करून दिली.
“बसा बसा. हे बाकडं तुमचं डायनिंग टेबल आहे, असं समजा बरं का. पेरणी सुरू आहे तिथे,” असं म्हणत त्या म्हातारबुवाने बोट दाखवलं तिथे आम्ही बघितले. 5-6 माणसं पेरणीचं काम करताना दिसली.
थोड्या वेळाने एक मुलगा छोट्या कपातून चहा घेऊन आला. सोबत चार बिस्कीटं देखील होती.
“हा माझा नातू बरं का. त्यालाच शिकवतोय सध्या पेरणी कशी करायची ते. ही आमची काळी आई पिढीजात आमच्याकडे आहे. माझ्या बाच्या आजोबापासून आम्ही कसतोय ही जमीन. सगळी भात शेती आहे. घराला पुरेसे ठेवून बाकी विकून टाकतो. त्यातून चालतं आमचं घर. आमचा मुलगा मोबाइलवरून आता शिकला आहे, नवीन पद्धतीने शेती करायला. गेल्या वर्षीपासून थोड्या भाज्या पण लावायला सुरुवात केली आहे त्याने. आधी पोराला आणि आता नातवाला एक गोष्ट कायमची शिकवली आहे, ती म्हणजे जसं पेरणार तसंच उगवणार. मग ते शेतातलं धान असो की, मनातले चांगले विचार असो! चांगले विचार, चांगलं वागणं आणि माणुसकीची बारमाही पेरणी केलीत तुमच्या मनाच्या शेतात, तर तो वरचा देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. माणूस म्हणून जन्माला आला आहात, तेव्हा माणूस म्हणूनच जगा शेवटपर्यंत. एकदा का तुम्ही नको त्या वाटेने पुढे जायला लागलात की, तुम्हाला माणुसकीचं पिक घेणं जमणार नाही आणि पुढे फक्त बरबादी असेल.
पोरगा माझा समजूतदार निघाला. माझं बोलणं ऐकून आजवर जमेल तेवढे चांगलं जगण्याचा प्रयत्न करतोय. आता तीच परंपरा नातवाने पुढे न्यावी म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही आले, तेव्हा त्यालाच शिकवत होतो पेरणी कशी करायची ते. जमिनीत पेरणी करताना त्याच्या मनात सुद्धा चांगल्या गोष्टींची पेरणी करत असतो मी.”
म्हातारबुवांचे विचार आणि प्रामाणिक तळमळ बघून आम्ही दोघेही थक्क झालो. चहा प्यायचं निमित्त झालं पण सोबत अमूल्य अशी वैचारिक धान्यांची पोती जणू आम्ही सोबत घेऊन निघालोय, असा भास मला झाला.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
आम्ही परत मुख्य रस्त्यावर गाडी जवळ आलो ते भारावलेल्या अवस्थेत. गाडीत बसलो. मित्राने गाडी सुरू केली आणि आमच्या गप्पांमध्ये सहज विषय सुरू झाला शहरात रहाणाऱ्या आमच्याच सारख्या कित्येकांचा. जे सुखाच्या न संपणाऱ्या शोधात आयुष्याला नुसते वेगाने पळवत नसून माणसाला यंत्रात बदलवून टाकत आहेत. इन्क्रिमेंट, प्रमोशन आणि सुखाच्या बेगडी संकल्पनांचा अविरतपणे पाठलाग करत त्या जीवघेण्या खेळात मानसिक संतुलन आणि स्वास्थ्य गमावून बसत आहेत… नकळत या शेतकरी कुटुंबाचा विचार मनात आला आणि जगण्याचा त्यांनी अंगिकारलेला सोपा मार्ग बघून त्यांचा हेवा वाटला मला.
गाडी चालवता चालवता माझा तरूण मित्र मला म्हणाला, “काका आज या चहाच्या निमित्ताने साधं, सोपं, सरळ, तरीही सुखाचं असं आयुष्य कसं जगायचं, याची पेरणी त्या आजोबांनी माझ्या मनात केली आहे.”
हे ऐकून मी कौतुकाने माझ्या तरूण मित्राची पाठ थोपटली. मघाशी प्यायलेल्या चहाची चव मला आता आणखी गोड वाटली.


