अध्याय पंधरावा
तरी महानंदसमुद्र । जो पूर्णपूर्णिमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥45॥ अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥46॥ तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । हा जाणे महातरु । थांबला असे ॥47॥ परी येरां रुखांसारिखा । तळीं मूळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणोनि लेखा । नये कवणा ॥48॥ आगी कां कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥49॥ जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥50॥ अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥51॥ जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके । संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥52॥ आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥53॥ कां रवीचां अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥54॥ यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥55॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ
अर्थ
तर ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा (राका पौर्णिमेचा) चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्णपरमात्मा तो असे म्हणाला. ॥45॥ अरे अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असतांना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते ॥46॥ ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे, असे समज. ॥47॥ परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा, हा वृक्ष नाही, म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. ॥48॥ जर (इतर वृक्षांप्रमाणे याच्या) बुडाशी अग्नि अथवा कुर्हाड यांचा प्रवेश झाला असता, तर वरचा विस्तार केवढा का असेना ॥49॥ तरी (इतर) वृक्ष जसा मुळाशी तुटला असता फांद्यासह उन्मळून पडतो, तसा हा पडला असता, पण या संसारवृक्षाची तसली गोष्ट कोठली? म्हणून हा सोपा नाही ॥50॥ अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की, या संसारवृक्षाची वाढ खाली आहे. ॥51॥ ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरणसमुदाय खाली पसरतो, तसा हा संसारवृक्ष आश्चर्यकारक आहे. ॥52॥ ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या उदकाने आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही, तेवढे या एकट्या संसारवृक्षाने अडविले (व्यापिले) आहे. ॥53॥ अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. ॥54॥ अर्जुना, या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरिता पाहू गेले, तर याला फळ नाही, व वास घेण्याकरिता फूल पाहू गेले तर याला फूल नाही, मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. ॥55॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे विषें रांधिली रससोये, जैं जेवणारा ठाउवी होये


