नोव्हेंबर महिना उजाडला आहे. सकाळच्या हवेत आता हळूहळू गारवा जाणवू लागला आहे. मात्र दुपारचं ऊन अजूनही आपला हिसका दाखवतंच असतं. अकोल्याच्या उन्हाची तऱ्हाच न्यारी! इतकं कोरडं, शुष्क आमचं अकोला शहर! उन्हाच्या झळांनी रापलेली जमीन, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा, पाण्यासाठी आसुसलेली धरती… पण याच अकोल्याच्या मातीत माणसांच्या मनात मात्र कवितेचा झरा कसा काय फुटतो देव जाणे? जिथे निसर्गाने कोरडेपणाची चादर पांघरली आहे, तिथे माणसांच्या मनात शब्दांचे इतके ओलावे कसे निर्माण होतात? हा एक मोठा प्रश्नच आहे.
लहानपणी टीव्हीवर ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गाणं लागायचं आणि मोठी माणसं सांगायची की हे गाणं आपल्या गावच्या विठ्ठल वाघ यांनी लिहिलंय. हे ऐकून फार भारी वाटायचं. त्यानंतर ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ लिहिणारे अनंत राऊत, ‘अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना’ लिहिणारे कवी अनिल म्हणजेच आ. रा. देशपांडे सुद्धा अकोला जिल्ह्यातलेच. ‘अंगावरती कापड दे, अन् डोक्यावरती छप्पर दे’ अशी प्रार्थना लिहिणारे किशोर बळी..अशी कितीतरी नावं घ्यावीत!
या प्रतिभावान कवींच्या मांदियाळीत बसणारे प्रशांत असनारे लिहितात…
मुलगा म्हणाला, आई, दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही,
वडील म्हणाले, अगं, दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही,
आई रात्रभर दिव्याची वात कमी-जास्त करत राहिली,
आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली.
काळानुसार बदलत जाणारे पितृत्व, मुलगा आणि वडील यांच्यातील संबंध, आईची वडील आणि मुलगा यांच्यातील दुव्याची भूमिका अशा कितीतरी विषयांवर पानच्या पानं भरून जे लिहिता येणार नाही, ते या काही ओळींत कवी प्रशांत असनारे यांनी लिहिलं आहे.
हेही वाचा – प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!
या कवितेत मला आईच्या त्यागाचं वर्णन करण्यापेक्षा तिची दोन पिढ्यांमध्ये समतोल साधताना होणारी ओढाताण अधिक जाणवते. मुलाला उजेड हवा आहे, वडिलांना शांतता हवी आहे. दोघांच्याही गरजा रास्त आहेत; पण त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या झोपेचा, विश्रांतीचा विचार न करता रात्रभर दिव्याची वात कमी-जास्त करणारी आई मात्र कुणाच्याच लक्षात येत नाही. खरं तर अनेक घरांमध्ये आईचं आयुष्य असंच जातं. नवरा आणि मुलगा यांच्या आवडीनिवडी, गरजा, अपेक्षा सांभाळताना ती स्वतःच्या इच्छांना मात्र मागे ठेवते. परंतु तिच्या वातीसारख्या जळण्यामुळेच तर घरात उजेड असतो, हे आपण विसरतो.
परंतु ही कविता जरी ‘आई’ या शीर्षकाखाली दिली गेली असली, तरी मला ही मुलगा आणि वडील यांच्या नात्यावर भाष्य करणारी कविता वाटते.
आता ‘अहो बाबा’वरून ही पिढी ‘ए बाबा’वर आली आहे. इथे प्रश्न संबोधनाचा नाही. परंतु काही वर्षांपूर्वी वडील आणि मुलं यांच्या नात्यात प्रेम कमी होतं असं नाही; पण वडिलांबद्दल भीतीयुक्त आदर होता, हे मान्य करावंच लागेल. कदाचित त्यामुळेच वडील आणि मुलगा यांच्यात संवादाची कमतरता होती. वडिलांना काही सांगायचं असेल तर आईचा दुवा वापरावा लागायचा. बऱ्याच घरांमध्ये आईचं आयुष्य नवरा आणि मुलगा यांची मर्जी राखण्यात जायचं. अर्थात, हे प्रत्येक घराचं चित्र नव्हतं; पण बहुतांश घरांमध्ये ते दिसायचं.
या कवितेमुळे मला आणखी एक विचार सुचला. तो म्हणजे मातृत्व आणि पितृत्व यांच्यातील फरक.
एखादी स्त्री जेव्हा आई होते, तेव्हा तिच्या शरीरात अनेक जैविक आणि हार्मोनल बदल घडतात. तिच्या उदरात एक जीव वाढत असतो. प्रसूतीच्या वेदना, बाळाला जन्म देणं, त्यानंतर पान्हा फुटणं या सगळ्या अनुभवांतून तिचं मातृत्व आकार घेतं. या प्रक्रियेत शरीर आणि मन यांचं एक विलक्षण नातं तयार होतं. निसर्गानेच जणू मातृत्वासाठी तिच्या शरीराची आणि मनाची एक विशिष्ट पातळीवर तयारी केलेली असते. त्यामुळे मुलाबद्दलची ओढ, काळजी आणि माया तिच्या रोजच्या जगण्याचा सहज भाग बनत जातात.
पण पुरुष जेव्हा वडील होतो, तेव्हा त्याच्या शरीरात स्त्रीप्रमाणे असे बदल घडत नाहीत. अर्थात, पितृत्वानंतर पुरुषांमध्येही काही हार्मोनल बदल होतात; मात्र त्याचं पितृत्व मुलाच्या सहवासातून, स्पर्शातून, त्याच्या वाढीतील सहभागातून आणि जबाबदारीतून अधिकाधिक आकार घेतं.
मला इथे एक गोष्ट महत्त्वाची वाटते. आई मुलाच्या अस्तित्वाशी त्याच्या जन्माआधीच जोडलेली असते; तर वडील अनेकदा त्या नात्याचा अर्थ मुलाच्या सहवासातून हळूहळू अनुभवत जातात. निसर्गाने पुरुषाला मूल आपल्या शरीरातून जन्माला घालण्याचा अनुभव दिलेला नाही; पण त्या मुलाच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव त्याच्या भावविश्वात निर्माण होत जाते. आणि ही जबाबदारी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेल्या प्रेमाच्या नात्याचा भाग म्हणून तो आयुष्यभर जगत असतो.
हेही वाचा – कोऽहम्?
कदाचित इथेच पितृत्वाचं वेगळेपण आहे. आईच्या प्रेमाला जैविक प्रक्रियेची सहज जोड मिळते; तर वडिलांचं प्रेम मुलासाठी घेतलेल्या निर्णयांतून, केलेल्या तडजोडीतून, कष्टांतून आणि आयुष्यभर निभावलेल्या जबाबदारीतून व्यक्त होतं. त्याच्या प्रेमाचा पाया केवळ जैविक नसतो, तर तो जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या नात्यात असतो.
याचा अर्थ आईचं प्रेम जैविक आणि वडिलांचं केवळ भावनिक असं नाही. दोघांच्याही प्रेमामागे जैविक आणि भावनिक घटक असतात. मात्र त्या प्रेमापर्यंत पोहोचण्याचे अनुभव वेगवेगळे असतात.
कदाचित म्हणूनच ही कविता मला केवळ आईच्या त्यागाची कविता वाटत नाही. ती मातृत्व आणि पितृत्वाच्या दोन वेगळ्या भावविश्वांची जाणीव करून देते. आई आणि वडील दोघेही मुलाच्या आयुष्यात तितकेच महत्त्वाचे असतात; फक्त त्यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती वेगवेगळी असते.


