अध्याय पंधरावा
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्ने परते । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥22॥ आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । जगन्नाथु ॥23॥ तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥24॥ पाहा पां काई नारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ॥25॥ तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥26॥ परि हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ॥27॥ आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥28॥ तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥29॥ जें ज्ञान जयाचां हातीं । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥30॥ कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥31॥ नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु । तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥32॥ तरी तया ज्ञानालागीं । कवणा पा योग्यता आंगीं । हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥33॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ऐक्यभावाची अंजुळी, सर्वेंद्रियकुड्मुळी
अर्थ
दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. ॥22॥ श्री जगन्नाथाच्या मनांतून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले, तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. ॥23॥ त्याप्रमाणे श्रीगुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते. ॥24॥ असे पहा की, त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्याची (त्या पांडवांच्या वैगुण्यांची) पुराणे श्रीकृष्णांनी करून टाकली नाहीत काय? ॥25॥ त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. ॥26॥ पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की, त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूंचे महत्त्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे? ॥27॥ आता त्याच श्रीगुरूंच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगण्याच्या साधनाने, मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन. ॥28॥ तर आता तोच अभिप्राय (ऐका) की, मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्णपरमात्मा, त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला ॥29॥ की, ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळविण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळविण्य़ास समर्थ होतो. ॥30॥ अथवा, लागोपाठ शंभर ब्राह्मणजन्म प्राप्त होऊन त्या त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो, तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. ॥31॥ अथवा ज्याप्रमाणे डोळ्यालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच (ज्ञानी पुरुषाला) मोक्षाची योग्यता प्राप्त होते. ॥32॥ तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे, याचा विचार करता, तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. ॥33॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग


