दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 31 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 09 कार्तिक शके 1948; तिथि : षष्ठी 16:57; नक्षत्र : आर्द्रा 07:11, पुनर्वसु 29:39;
- योग : सिद्ध 17:31; करण : विष्टि 27:51;
- सूर्य : तुळ; चंद्र : मिथुन 24:00 ; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:06;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
क्रिकेटपटू सी. के. नायडू
टीम अवांतर
भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू कोट्टारी कनकैया म्हणजेच सी. के. नायडू यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1895 रोजी नागपूर येथे झाला. सी.के. नायडू यांचे वडील सूर्य प्रकाश राव नायडू यांनी केंब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. नंतर ते नागपूरला परत आले. इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी शहरात क्रिकेट हा खेळही आणला. त्यामुळे नायडू कुटुंबाला नागपूरमधील क्रिकेटचे जनक मानले जाते. सी. के. नायडू यांनी सेंट फ्रान्सिस डी’सेल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांची शाळेच्या संघात निवड झाली. नायडू यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये क्रिकेटचे कर्णधारपद भूषवले. त्याशिवाय ते हॉकी आणि फुटबॉलही उत्कृष्ट खेळत असे. शालेय जीवनात ते मोदी क्रिकेट क्लबचे कर्णधार बनले. सुरुवातीला नायडू यांचा कल बचावात्मक फलंदाजीकडे होता. पण, त्यांच्या वडिलांनी त्यांना अधिक आक्रमकपणे फलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहित केले.
हेही वाचा – माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू
1920 आणि 1930 चे दशक म्हणजे नायडूंचा सुवर्णकाळ होता, कारण मुंबई क्वाड्रँग्युलर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे ते फलंदाज होते. त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी 1926-27 या वर्षी बघायला मिळाली, जेव्हा त्यांनी पाहुण्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) विरुद्ध 14 चौकार आणि 11 षटकारांसह 153 धावा केल्या, जो तेव्हाचा एक विश्वविक्रम होता. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताला कसोटी दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 1932 च्या इंग्लंड दौऱ्यात नायडू यांनी भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व केले. या दौऱ्यात ते भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. शिवाय गोलंदाज म्हणून त्यांनी 65 बळीही घेतले. 1933-34 मध्ये इंग्लंड संघ त्यांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी भारतात आला तेव्हाही त्यांनी आणखी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, नायडू यांनी होळकर संघाबरोबर खेळत नऊ वर्षांत आठ रणजी ट्रॉफी फायनलमध्ये संघाला नेले आणि चारवेळा विजेतेपद पटकावले. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी 200 धावांची सर्वोत्तम खेळी केली, ज्यामुळे ते 50 वर्षांनंतर प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या काही खेळाडूंपैकी एक बनले.
नायडू यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले. आंध्र क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
1923 मध्ये, होळकर संस्थानाकडून नायडू यांना इंदूरमध्ये राहण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना राज्याच्या सैन्यात कर्नल पदाचा दर्जा दिला. तेव्हापासून ते ‘कर्नल सी. के. नायडू’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
नायडू यांना ‘भारताचे पहिले क्रिकेट सुपरस्टार’ मानले जाते. 1941 मध्ये एका ब्रँडचे प्रमोशन करणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. भारत सरकारने 1956 मध्ये नायडू यांना पद्मभूषण , तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. 14 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ, बीसीसीआयने 1994 पासून ‘सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला. याशिवाय त्यांच्या सन्मानार्थ ‘सी.के. नायडू ट्रॉफी’ या 25 वर्षांखालील खेळाडूंच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे 1973-74 पासून आयोजन केले जाते. क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील एका सभागृहाला , सी.के. नायडू हॉल असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय 2014 मध्ये त्यांचे नाव ‘विस्डेन इंडिया हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात आले.
आजचे राशिभविष्य
मेष – गुरूचे गोचर भाग्यामध्ये वाढ दर्शवणारे आहे. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात असलेल्या जातकांना चांगले परिणाम बघायला मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण सुखद असेल. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल.
वृषभ – वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरूचे गोचर सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ दर्शवणारे आहे. कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या जातकांना यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबींवर काळजीपूर्वक विचार करणे फायदेशीर ठरेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी सुसंवादाचा वापर करणे आवश्यक आहे.
मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना, गुरूचे संक्रमण संवाद आणि संबंधांच्या माध्यमातून लाभ मिळवून देणारे ठरेल. तुमचे संवाद कौशल्य आणि समज कामाच्या ठिकाणी उपयोगी पडेल. नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. जवळच करावा लागणारा प्रवास फायदेशीर ठरेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. अर्थात कोणत्याही नवीन उपक्रमात घाई करणे टाळा. आर्थिक बाबींमध्ये खर्चाचे नियोजन करणे उत्तम राहील.
कर्क – कर्क राशीच्या जातकांसाठी, गुरूचे संक्रमण आर्थिक बाबतीत नवीन संधी घेऊन येणारे आहे. लोक तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने प्रभावित होतील. कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातील नफ्यात हळूहळू वाढ होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत निष्काळजीपणा टाळा.
सिंह – गुरूचे गोचर सिंह राशीच्या जातकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण तो तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढू शकतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. तुम्हाला जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. मात्र कोणताही निर्णय घेताना अहंकार मोठा ठरणार नाही याची काळजी घ्या.
कन्या – गुरूच्या गोचरामुळे कन्या राशीच्या जातकांच्या खर्च आणि परदेश प्रवासाशी संबंधित बाबींवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पडद्यामागून केलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढेल. मात्र आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोडीदाराशी योग्य विचारविनिमय केल्याशिवाय पैसे उधार देणे टाळा. तसेच, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेसा आरामही करा.
तुळ – तुळ राशीसाठी, गुरूचे संक्रमण लाभ आणि इच्छापूर्ती दर्शवते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ओळखींचा फायदा होईल. मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडून भक्कम असा पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक पावले उचला. तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबासोबत आज एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी, गुरूचे गोचर करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. नोकरदार जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसाय वाढवण्याची योजना आखत असाल, तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारू शकतात. कुटुंबात तुमचा प्रभाव वाढेल. मात्र कामाच्या दबावामुळे वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
हेही वाचा – तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख
धनु – गुरूचे गोचर धनु राशीच्या जातकांसाठी शुभ संकेत घेऊन येऊ शकते. तुमच्या राशीचा स्वामी असलेला गुरू, सिंह राशीत आहे आणि तो आपल्या राशीकडे पंचम दृष्टीने पाहत आहे. यामुळे भाग्याची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. वैवाहिक जीवनातील आनंद वाढेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढू शकतो. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.
मकर – मकर राशीच्या जातकांसाठी, गुरूचे राशीतील संक्रमण काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारे आहे. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही प्रकारचे संघर्ष टाळा. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करावा. किरकोळ बाबींमुळे कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतो. संयम आणि समजूतदारपणा परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
कुंभ – कुंभ राशीसाठी, गुरूचे गोचर अनेक शुभ संधी घेऊन येणारे आहे. सिंह राशीत स्थित असलेला गुरू, तुमच्या राशीतील सातव्या घरावर आपली दृष्टी टाकणार आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढू शकतो. भागीदारीत व्यवसाय असलेल्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखणाऱ्यांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. विवाहयोग्य जातकांसाठी अनुकूल प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
मीन – मीन राशीसाठी, गुरूचे गोचर, कार्य आणि वैयक्तिक जीवनात बदलांचे संकेत देणारे आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळही मिळू शकते. विरोधकांपासून सावध रहा आणि कोणतेही वाद टाळा. व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक असेल. नियमित दिनचर्या पाळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.


