Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑक्टोबर 2026

    October 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चकवा
    ललित

    चकवा

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरOctober 27, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, देवराई क्षेत्र, चकवा, कोकणातील चकवा, दोडा मार्गावर चकवा, राजला चकवा, चकवा झोपडी, जीपीएस, गूगल मॅप्स, जीपीएस स्पुफिंग, नेव्हिगेशन डेटामध्ये छेडछाड
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राज हा पुण्यातील एक यशस्वी ठेकेदार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेवाळे गावाजवळ एका मोठ्या इको-रिसॉर्टचं बांधकाम होणार होतं. त्या कामासंबंधीची एक महत्त्वाची बैठक दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता होती. राजला सकाळी पुण्याहून निघून मीटिंगला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने आदल्या दिवशीच निघायचं ठरवलं होतं. हेवाळेजवळच्या एका छोट्याशा होम-स्टेमध्ये त्याने खोली बुक केली होती.

    संध्याकाळी सहा वाजता घरातून निघताना नेहाने त्याच्या हातात थर्मास दिला. राजने थर्मास हातात घेत विचारलं, “कशाला?”

    “चहा आहे. वाटेत उपयोगी पडेल.”

    राज हसला… “अगं, पुण्यापासून कोकणापर्यंतच्या चहाच्या टपऱ्या बंद झाल्या की काय?”

    “वाटेत उपयोगी पडेल, असू दे,” नेहा म्हणाली.

    राजने थर्मास गाडीत ठेवला. तो गाडी सुरू करणार, तेवढ्यात नेहा म्हणाली, “राज…”

    “हं?”

    “दोडामार्गच्या पुढे रात्री जपून जा.”

    “का?”

    “माझ्या मैत्रिणीकडून ऐकलंय… तिकडे एक देवराई आहे. रात्री त्या भागात चकवा लागतो म्हणे.”

    राज मोठ्याने हसला… “नेहा, माझ्याकडे 5G आहे, गुगल मॅप्स आहे, जीपीएस आहे. चकवा मला कसा लागणार?”

    नेहा हसली… “मी चकव्यावर विश्वास ठेवते, असं नाही. पण तरीही काळजी घे. रस्ता अनोळखी आहे. थकवा आला तर गाडी थांबव, फ्रेश हो आणि मग पुढे जा.”

    राजने मान डोलावली… “पोहोचलो की फोन करतो,” असं म्हणत राज निघाला. नेहा मात्र बराच वेळ गेटपाशी उभी राहून गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहात राहिली.

    हेही वाचा – प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    0000

    सातारा… कराड… कोल्हापूर… प्रवास व्यवस्थित चालला होता. रात्री साधारण साडेअकराच्या सुमारास तो दोडामार्गला पोहोचला. त्याने गूगल मॅप्सवर होमस्टेचा पत्ता टाकला. स्क्रीनवर दिसत होतं — पोहोचण्यास लागणारा वेळ : 25 मिनिटे.

    राज मनातल्या मनात म्हणाला, “नेहा उगाच काळजी करते.”

    गाडी पुढे निघाली. दोडामार्ग मागे पडताच आजूबाजूला दिसणारी कौलारू घरं कमी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडं वाढत गेली. पुढे काही अंतरानंतर दाट देवराई सुरू झाली. रस्त्यावर दिवे नव्हते. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. प्रकाश होता तो फक्त गाडीच्या हेडलाइटचा!

    राजने गाडीचा वेग थोडा कमी केला. मोबाइलला नेटवर्क होतं आणि गूगल मॅप्स व्यवस्थित चालू होतं…

    गूगल मॅप्सने सांगितलं, “पाचशे मीटर पुढे उजवीकडे वळा.”

    राजने गाडी उजवीकडे वळवली. काही मिनिटांनी पुन्हा आवाज आला, “पुढे उजवीकडे वळा.” राजने पुन्हा गाडी वळवली.

    दहा मिनिटांनी समोर एक दगडी फलक दिसला — ‘देवराई क्षेत्र’.

    राजच्या भुवया उंचावल्या. त्याने मोबाईल पाहिला. निळी रेषा व्यवस्थित पुढे जात होती. तो पुढे निघाला.

    दहा मिनिटांनी पुन्हा तोच फलक दिसला — ‘देवराई क्षेत्र’.

    राजने गाडी थांबवली. आजूबाजूला कोणीही नव्हतं. दूरवरही मानवी वस्तीची कोणतीही खूण नव्हती. गूगल मॅप्स सांगत होतं, “सरळ पुढे जा.”

    राज पुढे गेला. पण काही वेळाने पुन्हा तोच फलक दिसला — ‘देवराई क्षेत्र’.

    पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा त्याला शंका आली. तिसऱ्यांदा मात्र त्याच्या पोटात गोळा आला. त्याने गूगल मॅप्स बंद करून पुन्हा सुरू केलं. लोकेशन तपासलं… नेटवर्क होतं… जीपीएस सुरू होतं…

    तो पुन्हा निघाला.

    चौथ्यांदा… तोच फलक — ‘देवराई क्षेत्र’!

    आता राजने गाडी थांबवली. इंजिन बंद केलं. गाडीत पूर्ण शांतता पसरली. त्याने मोबाइल हातात घेतला. होम-स्टेच्या मालकाचा फोन लावला. फोन लागला नाही… राजने नेहाला फोन करण्याचा प्रयत्न केला. हा कॉलही लागला नाही.

    त्याने पुन्हा गाडी सुरू केली.

    पाचव्यांदा… तोच फलक — ‘देवराई क्षेत्र’.

    घड्याळात बारा वाजून चाळीस मिनिटं झाली होती. राजने स्टिअरिंगवर कपाळ टेकवलं. त्याच्या मनात नेहाचा आवाज घुमला — “दोडामार्गच्या पुढे चकवा लागतो म्हणे…”

    त्याने स्वतःशीच म्हटलं, “नाही… हे शक्य नाही.”

    तेवढ्यात गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशाच्या पलीकडे त्याला मंद पिवळसर उजेड दिसला. राजने आशेने तिकडे पाहिलं. दाट झाडांच्या आड एक छोटीशी कौलारू झोपडी दिसत होती. बाहेर एक कंदील होता.

    इतक्या रात्री? इतक्या जंगलात?

    राजला आश्चर्य वाटलं; पण त्याच वेळी त्याला हायसंही वाटलं. त्याने गाडी त्या झोपडीच्या दिशेने घेतली. झोपडीसमोर एक पांढरा हाफ शर्ट, पांढरी हाफ पँट, पांढरी टोपी आणि पांढरी दाढी असलेला वृद्ध इसम बसला होता. कंदिलाच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत होता.

    राजने खिडकीची काच खाली केली… “काका!”

    वृद्धाने मान वर केली. तो काही क्षण राजकडे नुसता पाहात राहिला.

    राजने विचारले, “चहा मिळेल का?”

    वृद्धाने शांतपणे विचारलं, “तुला चकवा लागला का?”

    राजच्या अंगावर काटा आला…

    “तुम्हाला कसं कळलं?”

    वृद्ध हलकंसं हसला… “चेहऱ्यावर दिसतं तुझ्या.”

    त्याने अर्ध्या मिनिटात चहा आणला, जणू चहा तयारच होता.

    राजने एक घोट घेतला. चहाची चव ओळखीची वाटत होती. अगदी नेहा करते तसाच चहा!

    वृद्धाने विचारलं, “हेवाळेला जायचं ना?”

    राजने मान डोलावली.

    वृद्ध म्हणाला, “पुढे दोन रस्ते आहेत. दोन्ही गोल फिरतात.”

    “म्हणजे?”

    “तिथून पुढे गेलं की, पुन्हा इथंच आणतात.”

    वृद्ध पुढे म्हणाला, “मधला एक रस्ता आहे. पटकन दिसत नाही. तो रस्ता हेवाळेला जातो.”

    वृद्ध म्हणाला, “गाडी हळू चालव. दोन दगडी खांब दिसतील. त्यांच्या मधोमध रस्ता आहे.”

    राजने मान डोलावली. चहा पिऊन झाल्यावर विचारले, “काका, किती पैसे झाले?”

    वृद्ध हसला. “पैसे नको, निघ, उशीर झालाय.”

    राजने गाडी सुरू केली, हेडलाइटच्या प्रकाशात त्याला झोपडीवरील नाव दिसले — ‘चकवा’! विचारात मग्न असलेला राज सावकाश पुढे जायला निघाला. काही मिनिटांनी त्याला दोन दगडी खांब दिसले. त्यांच्या मधोमध एक अरुंद रस्ता होता. राजने गाडी त्या रस्त्यावर वळवली.

    हेही वाचा – इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, भयाण शांतता… पण दोन-तीन मिनिटांनी रस्ता थोडा रुंद झाला. काही अंतर गेल्यावर फलक दिसला— हेवाळे – 2 कि.मी.

    राजने सुटकेचा निःश्वास सोडला.

    रात्री दीडच्या सुमारास तो होम-स्टेवर पोहोचला. मालकाने दार उघडलं.

    “राज?”

    “हो.”

    “बराच उशीर झाला.”

    राज म्हणाला, “माफ करा. रस्ता चुकला होता, त्यामुळे उशीर झाला.”

    मालक त्याच्याकडे पाहत म्हणाला, “चकवा लागला का?”

    राज काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला.

    “बहुतेक.”

    0000

    सकाळी सात वाजता राजचा फोन वाजला. नेहा होती.

    “फोन का केला नाहीस?”

    “मी प्रयत्न केला, पण फोन लागला नाही.”

    नेहाने काळजीने विचारलं, “राज… चकवा तर लागला नाही ना?”

    नेहाला काळजी वाटू नये म्हणून राज हसत म्हणाला, “नाही गं.”

    फोन ठेवून राज तयार झाला. नऊ वाजता मीटिंग होती. वेळेआधीच तो रिसॉर्टच्या साइटवर पोहोचला. गाडीतून उतरताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला…

    देवराई… तोच तो फलक… ती कौलारू झोपडी… तो वृद्ध… आणि तो चहा.

    क्षणभर त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. आज परत जाताना अंधार पडण्यापूर्वी दोडामार्गला पोहोचायचं, असं त्याने मनोमन ठरवलं. “कालचा अनुभव पुन्हा नको,” त्याने स्वतःशीच म्हटलं.

    मीटिंग वेळेवर सुरू झाली. कामासंबंधीची चर्चा अपेक्षेपेक्षा लवकर संपली. दुपारी साडेचारच्या सुमारास राज होम-स्टेकडे परतला. सामान घेतलं आणि पुण्याला निघण्याची तयारी केली. गाडी सुरू करताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला. पण दिवसाच्या उजेडात सगळं अगदी सामान्य दिसत होतं… देवराईचा भाग मागे पडला. काही वेळात दोडामार्ग आलं. राजने सुटकेचा निःश्वास सोडला.

    कारमधील रेडिओवरील बातमीने राजाचं लक्ष वेधलं.

    “काल मध्यरात्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जीपीएस नेव्हिगेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे.”

    न्यूज अँकर पुढे सांगत होता, “काही वाहनचालकांना चुकीचे लोकेशन आणि चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्राथमिक तपासात जीपीएस स्पुफिंग किंवा नेव्हिगेशन डेटामध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारण तीस मिनिटांच्या कालावधीत अनेक वाहनचालक एकाच परिसरात पुन्हा पुन्हा फिरत असल्याचं आम्हाला समजलं आहे.”

    राज हळूच म्हणाला, “म्हणजे… तो चकवा नव्हता तर! गूगल मॅप्सने मला चकवलं होतं.”

    त्याला काल रात्रीच्या त्या विचित्र अनुभवाचं उत्तर मिळालं होतं. गाडी चालवत असतानाच अचानक राजला चहाची हुक्की आली. त्याने मागच्या सीटवरून नेहाने दिलेला थर्मास घेतला. थर्मास हातात घेताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. थर्मास बराच हलका वाटत होता.

    राजने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. थर्मासचं झाकण उघडलं. आत थोडासाच चहा होता.

    “अरे, एवढाच चहा? कदाचित चहा सांडू नये म्हणून नेहाने कमी चहा दिला की काय? की काल रात्री मी या थर्मासमधलाच चहा प्यायलो?”

    त्याने थर्मासमधला चहा कपात ओतला. चहा अजूनही गरम होता. राजने एक घोट घेतला… आणि तो थबकला.

    तीच चव!

    त्याने पुन्हा एक घोट घेतला. काल रात्री त्या वृद्धाने दिलेल्या चहाला हीच चव होती. अगदी अशीच! हाच सुवास… हीच चव…

    राज काही क्षण नुसता कपाकडे पाहात राहिला. मग त्याच्या मनात विचार आला —

    “काल रात्री त्या वृद्धाने अवघ्या अर्ध्या मिनिटात गरम चहा दिला होता.”

    अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला —

    “ज्या ठिकाणी ती चकवा झोपडी दिसली होती, तिथे परत जाऊन पाहिलं तर?”

    त्याने आरशातून मागे पाहिलं. दोडामार्ग मागे पडला होता. एक क्षण त्याला गाडी वळवावीशी वाटली. पण त्याने तो विचार लगेच टाळला.

    “कशाला उगाच?”

    कदाचित थकव्यामुळे भास झाला असेल. कदाचित, ती चकवा झोपडी खरोखरच असेल आणि नसली तर, कदाचित ती झोपडीसुद्धा चकवाच असेल!

    त्याने गाडी पुढे घेतली. पण मनातून मात्र तो प्रसंग काही केल्या जात नव्हता.

    ती कौलारू झोपडी… तो मंद कंदील… तो वृद्ध… आणि तो चहा…

    हेही वाचा – नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    0000

    आज या गोष्टीला दोन वर्षं झाली, पण राजला आजही वाटतं, त्या दिवशी परत जाताना त्याने गाडी थांबवून पाहायला हवं होतं, ती झोपडी खरंच त्या जागी होती की नव्हती…

    जीपीएसने त्याला चकवलं होतं, हे खरं असलं तरी पण… त्या झोपडीचं, त्या वृद्धाचं आणि तिथल्या चहाचं काय?

    म्हणतात ना, काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात. कारण त्या प्रश्नांचं गूढच आपल्या आयुष्यातील कुतूहल कायम ठेवतं.

    काही गूढ उलगडूच नयेत,

    काही प्रश्न अनुत्तरितच राहावेत…

    आणि आठवणींच्या सावलीत,

    ते अधूनमधून भेटावेत…

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026 ललित

    फादर्स डे

    October 27, 2026 ललित

    कोऽहम्?

    October 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    By सतीश बर्वेOctober 28, 2026

    रोजच्या सारखा पहाटे साडेपाचला घड्याळाचा गजर वाजला. आज खरंतर सुट्टीचा दिवस होता. गजर बंद करून…

    फादर्स डे

    October 27, 2026

    कोऽहम्?

    October 27, 2026

    काय पण एकेक आठवणी असतात!

    October 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑक्टोबर 2026

    October 28, 2026

    चकवा

    October 27, 2026

    फादर्स डे

    October 27, 2026

    कोऽहम्?

    October 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 485
    • अवांतर 217
    • आरोग्य 164
    • पंचांग आणि भविष्य 650
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1024
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आगळ्यावेगळ्या जोशी आजी

    October 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला

    October 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑक्टोबर 2026

    October 28, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.