“मी मेल्यावर तुझा मुलगा रडेल का गं माझ्यासाठी?” त्यांनी कोपराने तिला ढोसत विचारले.
“तुमच्या जिभेला काही हाड? कधीही, काहीही वेळकाळ न बघता बोलायचे, हे तुम्हा बापलेकानाच सुचू शकते…” ती हाताचा फटका त्याच्या कोपरावर मारत म्हणाली. तसा तो मोठ्याने हसला.
“बघ, म्हटले ना, माझाच मुलगा आहे तो… तुलाच शंका हॉस्पिटलमध्ये बदली झाला असेल म्हणून! पण त्याने वेळोवेळी सिद्ध केलंय मी तुमचाच दिवटा आहे म्हणून…” ते जोरात हसत म्हणाले.
“आहो, आता त्याचे लग्न होऊन पोरंही मोठी झालीत… आता तरी हे बोलणे सोडा. कितीवेळा बोलून दाखवणार हे? आता तोही सुनबाईला हेच म्हणतो…” ती लटक्या रागाने म्हणाली.
म्हातारा, म्हातारी दोघेही समुद्रावर बसून भेळपुरी खात होते. “पण सांग ना तुला काय वाटते?” त्याने परत प्रश्न विचारला.
हेही वाचा – वधू-वर सूचक मंडळ
“नाही रडणार… निदान सर्वांसमोर तरी नाही रडणार, पण आतल्या आत रडत राहील; एकांत शोधेल. हेच तर शिकवलेत तुम्ही त्याला… जबाबदारी घे… दुसऱ्यांसमोर धीर सोडू नकोस, मी आहे… मी करेन सर्व… माझ्यावर विश्वास ठेवा… असेच दाखवीत फिरेल तो…” ती समोरच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत म्हणाली.
“खरे आहे तुझे. आपले कुटुंब नेहमी आपल्या विश्वासावरच जगत असते. घरातील कर्ता पुरुष असतो, तोच निर्णय घेतो. कुटुंबाला अडीअडचणीतून बाहेर काढतो. पण आयत्यावेळी त्यानेच धीर सोडला तर…?” बोलता बोलता तो शहारला.
“खरे आहे हो. कुटुंबात अचानक दुःखाचा आघात झाला, की सगळे कोलमडून पडतात. अशावेळी एका व्यक्तीने परिस्थितीचे भान राखून खंबीरपणे काही निर्णय घ्यायचे असतात आणि हेच गुण तुम्ही त्याच्यात उतरविले. आज तो घरात फारसा लक्ष देत नसला तरी, कठीण परिस्थितीत योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात आहे आणि हे सर्व तुमच्यामुळे आहे, याचीही जाणीव आहे त्याला…” ती त्याच्याकडे पाहात म्हणाली.
“काय बोलतेस? कधी बोलली नाहीस मला?” तो आश्चर्याने म्हणाला.
“माझ्याकडे तरी कुठे बोलतोय? पण तुमच्या नातवाशी सतत असे काही बोलत असतो तो आणि नातू माझ्याकडे बोलतो…” ती म्हणाली.
“छान… म्हणजे आपले गुप्तहेर खाते खूपच प्रभावी आहे!” तो हसत तिला म्हणाला.
“चला काहीतरीच काय! निघूया आता… सर्व आले असतील घरी,” असे बोलून दोघांनीही घराची वाट धरली.
घरी येताच सर्व त्यांचीच वाट पाहात असल्याप्रमाणे बसले होते. नेहमीसारखा तो कोपऱ्यात बसून होता. डोळे मोबाइलमध्ये होते, पण कान त्यांच्याकडे होते. नातवाने एक मोठा केक आणून आजोबांसमोर ठेवला… “हॅप्पी फादर डे आजोबा!” तो ओरडला.
“अरे, आज फादर डे आहे, आजोबा डे नाही…” आजोबा गमतीने त्याला म्हणाले. तसा तो कोपऱ्यातून उठला आणि वडिलांसमोर जाऊन उभा राहिला. केकचा तुकडा कापून त्यांच्या तोंडात भरवून म्हणाला, “हॅप्पी फादर्स डे, बाबा.”
भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्याला मिठी मारली.
हेही वाचा – टिपिकल
“तूही एका मुलाचा बाप आहेस रे…” असे म्हणत त्यांनी हळूच नातवाला खूण केली. नातवाने केकचा एक तुकडा आपल्या वडिलांच्या तोंडात भरविला आणि मोठ्याने ‘हॅप्पी फादर्स डे’ विश् केले.
आजोबांनी आपल्या मुलाला जवळ घेतले, मिठी मारून त्याच्या कानात पुटपुटले…
“मी मेल्यानंतर रडशील का रे?”
“म्हणजे, तुम्ही मरणार आहात का? मी कधी विचारच केला नाही याचा? तुम्हाला आवडणार नाही मी रडलेले आणि माझ्या मुलालाही नाही आवडणार ते… त्यामुळे दुसरे काहीही मागा मी तयार आहे द्यायला…”
काही न बोलता ते मुलाच्या डोळ्यात डोळा घालून उभे राहिले आणि हळूवारपणे म्हणाले – “हॅप्पी फादर्स डे मुला…”


