जॉर्ज ऑरवेल यांच्या लोकप्रिय कादंबर्यांपैकी ‘ॲनिमल फार्म’ ही एक कादंबरी. लहानशी असली तरी तत्कालीन समाजव्यवस्थेवर कडाडून टीका करणारी व्यंगात्मक कादंबरी आहे. याचा अनुवाद आरती देवगांवकर यांनी केला आहे. प्राण्यांचे रूपक वापरून जॉर्ज ऑरवेल यांनी साम्यवादाचे खरे स्वरूप मांडले. राजकीय व्यंग असल्याने यातली प्राण्यांच्या रुपात असलेले मूळ राजकारणी सहज ओळखू येतात. रशियन राज्यक्रांतीनंतर साम्यवाद उदयाला आला, त्यावेळी एक सुंदर रंजक स्वप्न सर्वांना दाखवले होते. अर्थातच, त्याची भुरळ पडली होती. पण नंतर सत्यात तसे उतरले नाही. ‘’वयाच्या विशी-पंचविशीत जो साम्यवादी नसतो, त्याला मन नसते; आणि पस्तिशीतही जो साम्यवादी राहतो, त्याला अक्कल नसते…’’ हे प्रसिद्ध वाक्य आहे.
1943 ते 1947 या कालावधीत, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही कादंबरी लिहिली गेली. इंग्लंड गटाची राष्ट्रं लोकशाहीवादी आणि दुसरा गट रशिया साम्यवादी… उजवी आणि डावी विचारसरणी! आपल्याकडे लोकशाही असली तरी, एक डावी विचारसरणी सुद्धा आहे, जिच्याशी आपला परिचय आहे.
मि. जोन नावाच्या शेतकर्याचे मेनोर फार्म नावाचे मोठे शेत असते. त्याच्याकडे खूप पाळीव प्राणी असतात. घोडे, गाढवं, डुक्करं, कुत्रे, शेळ्या मेंढ्या, मांजरी वगैरे आणि उंदीर, पक्षी वगैरे न पाळलेले जीवही असतात. थोडक्यात, जसे शेतकऱ्याचे शेत असते, तसे एक शेत असते. त्याचे घर तिथेच असते. शेतात काम करणारे चार मजूर असतात. एक दिवस एक वयस्कर डुक्कर, ज्याचे नाव मेजर, मृत्यूपूर्वी सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून सांगते की, तुम्ही सगळे कॉम्रेड आहात आणि जोन तुमचे शोषण करत आहे. तुम्ही खरेतर मालक आहात, त्यामुळे तुम्ही स्वतंत्र व्हा. जोन खूप दारू पीत असल्याने त्याचे शेताकडे लक्ष नसते. मजूर प्राण्यांना नीट खायला घालत नसल्याने प्राणी नाराज असतात. एक दिवस असंतोषासाठी पुरेसे कारण मिळते आणि जोनचे शेत ‘ॲनिमल फार्म‘ होते. मेजरचा मृत्यू झाल्यावर नेपोलियन, स्क्विलर आणि स्नोबॉल या तीन डुकरांच्या नेतृत्वाखाली सगळे प्राणी मिळून जोन आणि मजुरांना हाकलून देतात आणि स्वतंत्र होतात.
हेही वाचा – Bookshelf : ‘इरावती कर्वे…’ कुतूहलाची जागा घेतली अतीव आदराने!
नव्या राज्यासाठी तीन डुकरे सात आज्ञा तयार करतात जे संविधान असते. प्रत्येकासाठी पालन करणे सक्तीचे असते. सगळे प्राणी काम करतात. सर्वांना भरपूर खायला मिळाल्यामुळे संतुष्ट असतात. डुकरे व्यवस्था पाहतात. रक्षणाची जबाबदारी घेतात. आसपासच्या शेतातल्या प्राण्यांना ही बातमी मिळाल्यावर तेही कबूतरांकडून निरोप पोहोचवतात…
आता डुकरांची प्रजाती या फार्मची प्रमुख होते. ते स्वतःला सवलती घ्यायला सुरुवात करतात. दूध आणि सफरचंद त्यांनाच मिळतात वगैरे. राजकारण करायला सुरुवात होते आणि एकेक करून सात आज्ञा मोडल्या जातात. नेपोलियन डुकराच्या हातात सत्ता येते. त्यांचे रक्षण करायला हिंस्त्र कुत्रे असतात आणि त्यांची मखलाशी करायला विचारवंत डुक्कर असतेच. हळूहळू प्राण्यांची श्रद्धा ॲनिमल फार्मवरून नेपोलियनकडे वळवली जाते. सक्तीची व्यक्तिपूजा सुरू होते. त्याच्याविरुद्ध उठलेल्या प्रत्येक आवाजाची कत्तल होते. बाकीच्या प्राण्यांना जीवाच्या भीतीने दबून राहावे लागते. नेपोलियन कोंबड्यांची अंडी, लाकूड सुद्धा माणसांना विकून टाकतो… त्यात भ्रष्टाचार करतो. हळूहळू डुकरांसाठी वेगळे कायदे होतात, त्यांचा मानमरातब वाढतो. प्राण्यांनी ज्या व्यवस्थेविरुद्ध क्रांती केली होती, तीच व्यवस्था पुन्हा येते… फक्त मालक बदललेला असतो. त्यांचे जीवन तेवढेच किंवा अधिकच कष्टप्रद होते. अनिर्बंध एकाधिकारशाही निर्माण होते, हुकूमशाही सुरू होते.
शेवटचे वाक्य असे आहे – आत असलेली माणसे डुकरांसारखी दिसत होती आणि डुकरे माणसांसारखी… त्यामुळे ते कोण आहे, हे सांगता येणे कठीण होते. या पुस्तकात काही चिरकालीन सत्य सांगणारी वाक्यं आहेत, जसे – All animals are equal, some animals are more equal than others.
ही कादंबरी व्यंगात्मक आणि रूपकात्मक लेखनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जगाच्या राजकारणाची जाण असणार्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजेल, पण रोज वर्तमानपत्र वाचणाऱ्या इतरांना सुद्धा समजेल. यातली पात्रे ओळखता येतील.
अंतू बर्वा म्हणतो, झाडाचे एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. साम्यवाद मुळात यावरच आधारित आहे. एन रँड या लेखिकेने सुद्धा याच विषयावर लिहिलेली कादंबरी साम्यवादाचे चटके सोसायला लागलेल्यांचे दुख मांडते.
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ या सुरेश भटांच्या गझलमधील “जे कधीच नव्हते, त्याची आस का धरावी?” ही ओळ इथे समर्पक वाटू लागते. इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते… पुन्हा पुन्हा सत्ता बदल होतो… सत्ता कोणाच्याही हातात गेली तरी, सत्ताबदलाची कारणे तीच राहतात.
Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely. सत्ता मिळाली की, ती डोक्यात न जाऊ देणारे, पाय जमिनीवर ठेवणारे कमीच असतात. या पुस्तकातली अनेक विधाने कटू सत्य समोर ठेवतात. मुखपृष्ठावरचे वाक्य – ‘चार पाय चांगले, दोन पाय वाईट’ – कादंबरीत वारंवार येत राहते आणि शेवटी दोनच पाय चांगले म्हणणे त्यांच्या नशिबी येते. हे पुस्तक वाचताना लेखणीची ताकद अनुभवायला मिळते. लेखकाने निर्भीडतेने लिहिण्याचे धाडस दाखवले, याबद्दल अपार आदर वाटतो. समाजातली विकृती, कुरूपता मांडणे लेखकाचे कर्तव्य असते. जॉर्ज ओरवेल याचमुळे खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान लेखक आहेत.
ॲनिमल फार्म वाचल्यावर हवं तर सिनेमा पाहा!


