अध्याय चौदावा
सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें ॥312॥ कां सौरभ्यजीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । न येचि तो ॥313॥ पैं स्वरूपसमरसें । तयाही गा जालें तैसें । तेथ किंधर्म हें कैसें । नेणें देह ॥314॥ म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया ॥315॥ घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया । महदाकाश अपैसया । जालेंचि असे ॥316॥ तैसी देहबुद्धी जाये । जैं आपणपां आठौ होये । तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी ॥317॥ येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें । म्हणूनि तो मी म्हणें । गुणातीत ॥318॥ यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला । मेघें संबोखिला । मोरु जैसा ॥319॥
अर्जुन उवाच : कैर्लिंगैस्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो । किमाचारः कथं चैतांस्त्रीन् गुणानतिवर्तते ॥21॥
तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे । जयामाजीं वसे । ऐसा बोधु ॥320॥ तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे । हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि ॥321॥ यया अर्जुनाचिया प्रश्ना । षड्गुणांचा राणा । परिहारु आकर्णा । बोलतु असे ॥322॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सत्त्वरजतमांचां, भेदीं पसरु कर्माचा
अर्थ
आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर, ती त्याची कात कोणी सांभाळावी? तसे (त्या पुरुषाच्या देहाचे) झाले आहे. ॥312॥ अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर, जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही, ॥313॥ अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाचीही तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे, हे तो जाणत नाही. ॥314॥ म्हणून जन्म, म्हातारपण व मरण इत्यादि देहाचे जे सहा गुण. ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले. त्यांचा त्याच्याशी काही एक संबंध राहिला नाही. ॥315॥ घट फुटल्यावर व घटाच्या खापर्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते. ॥316॥ त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्या वेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण होते, तेव्हा आत्मस्वरूपावाचून दुसरे काही आहे काय? ॥317॥ अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त असे, त्याचे देहामध्ये राहाणे असते, म्हणून मी त्याला गुणातीत असे म्हणतो. ॥318॥ जसा मेघांच्या गर्जनेने बोलावलेला मोर सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या भषणाने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. ॥319॥
अर्जुन म्हणाला : हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो, तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? त्याचे आचरण कसे असते? या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो? ॥21॥
त्या संतोषाने, वीर अर्जुन, विचारू लागला की, महाराज, ज्या पुरुषामधे असा बोध राहातो, तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? ॥320॥तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो? आपण कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला सांगावे. ॥321॥ ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी सहा गुणांचा राजा (श्रीकृष्ण) उत्तर देत आहे, ऐका. ॥322॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा


