भाग – 1
“आई खूप आनंदाची बातमी आहे. मला 98 टक्के मिळाले,” आईला मिठी मारत मानस म्हणाला. सुनीताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. “खूप खूप अभिनंदन बेटा. तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर… त्यांनाही खूप आनंद होईल.”
मानसने लगेच सुभाषला फोन लावला आणि आपला रिझल्ट सांगितला.
“अरे वा, खूप मस्त! अभिनंदन बेटा. मी आलोच घरी,” सुभाष म्हणाला.
मानस हा सुभाष-सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळावे, यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला ॲडमिशन करून दिली होती. खरंतर, दोघांच्या खासगी नोकऱ्या. क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती, तरीसुद्धा स्वतः वर्षभर काटकसर करून त्यांनी मानसला कोणतीही अडचण येऊ दिली नव्हती.
सुभाष घरी आला. येताना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला.
“बाबा, आमच्या क्लासच्या सरांनाही पेढे द्यायचे का?”
“हो, मग! अरे, त्यांच्यामुळे तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत. चल जाऊया आपण त्यांच्याकडे…”
दोघंही बापलेक पेढे घेऊन मानसच्या क्लासमध्ये पोहोचले. क्लासमध्ये खूप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते.
“अरे, ये ये मानस आणि मनःपूर्वक अभिनंदन. 98 टक्के मिळाले ना?” सरांनी मानसला पाहाताच त्याला हाक मारून जवळ बोलावलं.
“हो सर… थँक्यू सर…” मानस म्हणाला.
“सर, हे घ्या पेढे. तुमच्यामुळे मानसला एवढं मोठं यश मिळालं,” सरांना पेढे देत सुभाष आनंदाने म्हणाला.
सरांनी पेढे घेतले आणि हसत म्हणाले, “सुभाषभाऊ पूर्ण शहरात आपला क्लास टॉपवर आहे. अहो, 25 मुलांना 95 टक्क्यांच्या वर, 50 मुलांना 90च्या वर आणि 30 मुलांना 80 टक्क्यांच्या वर मार्क्स आहेत.”
मानसला आठवलं या क्लासमध्ये नववीत 80% असलेल्यांनाच प्रवेश मिळाला होता. याचा अर्थ सगळी स्कॉलर मुलंच इथे घेतली जात होती. ही मुळातच स्कॉलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला, ‘मग या मुलांच्या यशात क्लासचा रोल काय होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का? हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं कुठे?’
“सर नववीत 79 टक्के मिळालेल्या माझ्या मित्राच्या भावाला आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन मिळेल?” मुद्दामच त्याने सरांना विचारलं
“अजिबात नाही. आपण आपल्या क्लासचा दर्जा उच्च ठेवलाय मानस आणि आपण तो मेन्टेन करतो. अशा कमी टक्के मिळालेल्या मुलांना प्रवेश देऊन आपल्याला आपल्या क्लासचं नाव खराब करायचं नाहीये…” सर आत्मप्रौढीने म्हणाले. तेवढ्यात इतर पालक आत शिरले तेव्हा मानस आणि सुभाषने सरांचा निरोप घेतला.
हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!
0000
रिझल्ट लागला. आता ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली. 11वी-12वी करून मेडिकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डाँक्टर व्हावं, असं सुनीता-सुभाषचंही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये वार्षिक 15 हजार रुपये भरून मानसने प्रवेश घेतला.
मानसचा कॉलेजला जायचा पहिलाच दिवस म्हणून सुनीता मुद्दामच घरी राहिली. मानस कॉलेजला गेला आणि दोन तासांतच परत आला.
“अरे! कॉलेजला गेला नाहीस?” सुनीताने विचारलं.
“अगं, गेलो होतो. पण दोन-चारच मुलं आली होती. त्यामुळे लेक्चर्स होऊ शकले नाहीत. माझा मित्रही आला होता. तो म्हणाला, ‘आजकाल कॉलेज कुणीच अटेंड करत नाहीत, फक्त प्रॅक्टिकलला येतात.’”
“अरे, मग शिकणार कसं?”
“कॉलेजमध्ये चांगलं शिकवत नाहीत, म्हणून सगळी मुलं क्लासेस लावून घेतात.”
“अरे, मग कॉलेजची आपण एवढी फी भरतो ती कशासाठी?”
“फक्त नावासाठी आणि परीक्षा देण्यासाठी. चांगल्या कॉलेजमधून शिकलो, हे सांगण्यासाठी…”
“ते काही नाही. तू कॉलेजची लेक्चर्स अटेंड करत जा,” सुनीता रागाने म्हणाली.
“अगं आई, आम्ही गेलो होतो प्राचार्यांना भेटायला. ते म्हणाले, किमान दहा तरी मुलं येऊ द्या क्लासमध्ये, मग पाठवतो प्राध्यापकांना. त्यांचं म्हणणं आहे की, विद्यार्थीच बसत नाहीत लेक्चर्सना… आम्ही तर तयार आहोत!”
“बापरे! म्हणजे काय आता क्लासेस लावायचे?”
“काही इलाज नाही आई. मेडिकलला जायचं म्हटल्यावर क्लासेस तर लावावेच लागतील.”
सुनीताने कपाळावर हात मारून घेतला. आधीच दोघांची तुटपुंजी कमाई त्यात हा नवीन खर्च! संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर मानसने सगळा किस्सा त्याला सांगितला.
“ठीक आहे. लावून घेऊ आपण क्लास. पण लावायचा कुठे? चांगले क्लासेस कोणते आहेत?” सुभाषने विचारलं.
“हो, मी काढलीय माहिती. तुम्हाला वेळ असेल तर जाऊन यायचं का?”
” जावंच लागेल. शिकण्यासाठी हे आता सर्व करावंच लागणार आहे…”
दोघं एका क्लासमध्ये पोहोचले. बाहेर बसलेल्या रिसेप्शननिस्टने मार्क्स विचारले. त्यांनी सागितल्यावर ती म्हणाली,
“ठीक आहे. आमची 11वी, 12वी मिळून 1,80,000 फी आहे एका टप्प्यात भरली तर! तुम्ही चार टप्प्यातही भरू शकता. पण मग 50 हजारांचे चार टप्पे… अशी फी होईल दोन लाख.”
“बापरे एवढी फी? देतात मुलं एवढी फी?” सुभाषने आश्चर्याने विचारलं.
ती हसली आणि मग्रुरीने म्हणाली, “देतात का? अहो सर, आमची 120 विद्यार्थ्यांची कपॅसिटी आहे. 115 जागा भरल्यात. तुम्ही घाई केली नाहीत तर तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळणं मुश्किल आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी खर्च हा करावाच लागतो… आणि सगळेच पालक तो आनंदाने करतात.”
तेवढ्यात एक मुलगी आई-वडिलांसोबत चौकशी करण्यासाठी आली. रिसेप्शनिस्टने तिला मार्क्स विचारले. तिने 75 टक्के सांगितल्यावर ती म्हणाली,
“सॉरी, 85 टक्क्यांच्या खाली आम्ही ॲडमिशन देत नाही. पण आम्ही तुला वेटिंगवर ठेवू.आमच्या उरलेल्या पाच जागा भरल्या नाहीत तर, आम्ही तुला कॉल करू.” मुलीचा चेहरा पडला. तिचे पालक रिसेप्शनिस्टला विनवण्या करू लागले.
“अहो, एकदा सांगितलं ना तुम्हाला!” रिसेप्शनिस्ट त्यांच्यावर खेकसत म्हणाली, “मी काही करू शकत नाही म्हणून.”
“अहो पण, इथे वाट बघत बसलो तर बाकीचे क्लासेस फुल्ल व्हायचे. मग तिथेही ॲडमिशन मिळणार नाही,” त्या मुलीचे वडील काकुळतीने म्हणाले.
“सॉरी. तुम्ही सरांना भेटू शकता. पण काही फायदा होईल, असं वाटत नाही.”
तो संवाद ऐकून मानसला काय वाटलं कुणास ठाऊक तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला,
“मॅडम तुम्ही यांना ॲडमिशन द्या… मला नाही घ्यायची ॲडमिशन.”
तिथे बसलेले सगळे लोक त्याच्याकडे अवाक् होऊन बघू लागले.
“अरे मानस, असा काय करतोस? ॲडमिशनसाठीच तर आलो ना आपण?” सुभाष आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
“नाही बाबा… आपण फक्त चौकशीसाठी आलोय. चला, आपण बाहेर जाऊया…” आणि तो उठून बाहेरही पडला. सुभाषही हतबल होऊन त्याच्यामागे बाहेर पडला.
“मानस काय वेडेपणा चालवलाय? अरे, आपल्या शहरातला सर्वात नावाजलेला क्लास आहे हा आणि तू…”
“नावाजलेला आहे कारण, ते हुशार मुलांनाच प्रवेश देतात. बघितलं ना तुम्ही त्या मुलीला क्लासची खरी गरज होती. तिला ते प्रवेश देत नव्हते आणि बाबा मला इतका महागडा क्लास लावायचाच नाहीये. आपण एखादा नवा क्लास बघू. ते फी कमी घेतात आणि नाव मिळवण्यासाठी चांगलंसुद्धा शिकवतात”
“तू पैशांची काळजी नको करूस मानस… तुला डॉक्टर करायचं आमचं स्वप्न आहे. प्रसंगी आम्ही स्वतःला गहाण ठेवू, पण तुला कसलीच कमी पडू देणार नाही.”
मानस हसला…
“मला समजतंय ते बाबा, पण त्याची काहीच गरज नाही. चला, आपण दोन-तीन क्लास बघू आणि फायनल करू.”
तीन क्लासमध्ये चौकशी केल्यानंतर चौथ्या क्लासमध्ये त्यांनी प्रवेश नक्की केला. मानससारखा हुशार मुलगा आपला क्लास जॉईन करतोय, हे पाहून क्लासवाल्यांनाही आनंद झाला.
0000
मानस कॉलेजमध्येही तीन-चार वेळा जाऊन आला, पण लेक्चर्स कुणीच अटेंड करत नव्हतं, याचं त्याला दुःख होत होतं. एकदा केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला सगळे विद्यार्थी जमले. आज सगळ्यांशी बोलायचं, असं मानस ठरवूनच आला होता. प्रॅक्टिकल संपल्यावर व्हरांड्यात जमलेल्या मुलांकडे तो गेला…
“मित्रांनो, तुमच्यापैकी क्लास कुणी नाही लावलेला?”
सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एक मुलगा म्हणाला, “अरे वेड्या सायन्सचा स्टुडंट क्लास लावणार नाही, असं कधी होईल का?”
तेवढ्यात… “आम्ही नाही लावला क्लास. का काय झालं?”
सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या. चार-पाच गरीब घरची मुलं समोर उभी होती.
“का? तुम्ही का नाही लावला क्लास?” मानसने विचारलं.
“आम्ही 15 किमीच्या पुढे एका खेड्यात रहातो. घरची परिस्थिती एवढी चांगली नाहीये. आमच्यापैकी कुणाचे वडील शेती करतात, तर कुणाचे छोटे-मोठे उद्योग किंवा नोकऱ्या. क्लासची महागडी फी आम्ही नाही भरू शकत.”
“मग तुम्ही लेक्चर्स का नाही अटेंड करत?”
“आम्हाला खेड्यावरून बसने किंवा सायकलने यावं लागतं. त्याला आमची तयारी आहे. एक-दोनदा आम्ही येऊन पाहिलं… पण इथे कुणी येतच नाही, हे पाहून आम्हीही येणं सोडलं.”
“अरे, आपण एवढी फी भरतो कॉलेजची ती कशासाठी? वरून आपण महागडे क्लासेस लावतो. आपल्या आई-वडिलांवर आपण किती ओझं टाकायचं?”
“आम्ही नाही अटेंड करणार लेक्चर्स. काही चांगलं शिकवत नाहीत,” मधेच एक मुलगी ठसक्यात म्हणाली. मानस तिच्याकडे किंचित रागाने बघत म्हणाला,
“मला सांगा क्लासमध्येही शंभर शंभर विद्यार्थी असतात. तिथेही कोणं आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देतं? आणि मी, ज्यांना कॉलेज फीमध्ये सवलत मिळते किंवा ज्यांचे आईवडील श्रीमंत आहेत, त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये. मी मध्यमवर्गीय किंवा गरीबांबद्दल बोलतोय.”
ती मुलगी तावातावाने तिथून निघून गेली.
“अजून कुणाला लेक्चर्स अटेंड करायची इच्छा आहे?” मानसने विचारलं.
“आमची” चारपाच मुली एकदमच म्हणाल्या.
मानसने सगळी मुलं मोजली… 15-16 भरली.
“चला तर मग, आपण प्राचार्यांकडे जाऊ. उद्यापासून लेक्चर्स सुरू करायची त्यांना विनंती करू.”
0000
दुसऱ्या दिवसापासून कॉलेजमध्ये लेक्चर्स सुरू झाले. मानस सकाळी कॉलेजला, तर संध्याकाळी क्लासला जाऊ लागला. त्याचा क्लास अत्याधुनिक होता. क्लासमध्ये 125 विद्यार्थी असल्यामुळे मागच्या मुलांना सरांचा आवाज ऐकू जायचा नाही. त्यांच्यासाठी टीव्ही आणि स्पिकर्सची व्यवस्था होती. मानस प्रश्नं विचारायचा. पण बरीच मुलं शंका असूनही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं हसू होऊ नये म्हणून प्रश्नच विचारत नव्हती. याउलट, कॉलेजमध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळे सरांचं प्रत्येक मुला-मुलीकडे लक्ष असायचं. हळूहळू मानसच्या लक्षात आलं की, कॉलेजमध्येही चांगलं शिकवल्या जातंय. क्लासमध्ये त्याच विषयाची पुनरावृत्ती होत असल्याने सगळ्या विषयांवर चांगली पकड बसत चालली होती.
मानसच्या क्लासमध्ये सगळे विषय शिकवले जात होते. पण बहुतांश मुलांनी वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस लावले होते. ही मुलं कॉलेजमध्ये न जाता या क्लासमधून त्या क्लासमध्ये जाण्यात दिवसभर अडकून पडायची. या अशा फिरण्याने त्यांना थकवा तर यायचाच, शिवाय अभ्यासही व्हायचा नाही.
आपण एकपाठी नाही आणि मेहनतीशिवाय आपल्याला पर्याय नाही, ही गोष्ट मानस जाणून होता. संध्याकाळी क्लासहून परतल्यावर रात्री उशिरापर्यंत दिवसभरात झालेल्या अभ्यासाची उजळणी करणं आणि नोट्स काढण्याचं काम तो करायचा. घरकामं करूनही मेरिटमध्ये येणाऱ्या मुलींच्या बातम्या त्याने वाचलेल्या होत्या, त्यामुळे आईला तो नेहमी घरकामात मदत करायचा. त्याचे वडील रात्री नऊ वाजता घरी यायचे. अर्थातच, त्यांच्या वाटेची बाहेरची कामंही त्यालाच करावी लागायची. मानसची त्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती आणि आई-वडिलांच्या आशा आपल्यावरच केंद्रित झाल्यात, हेही तो जाणून होता. सुनीताला त्याच्या समंजसपणाचं खूप कौतुक होतं. मानसच माझी मुलगी आणि मुलगा आहे, असं ती अभिमानाने लोकांना सांगायची.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
सहामाही परीक्षा झाली. मानसला त्यात 85 टक्के मिळाले. मराठी माध्यमात शिकलेल्या मानसला इंग्रजी माध्यमातले विषय थोडेफार जड जाणारच होते. सुभाषला मात्र थोडीफार चिंता वाटू लागली होती. एक दिवस तो मानसला म्हणाला,
“अजूनही चान्स आहे मानस, हा क्लास सोडून दुसरा चांगला क्लास लावून घे.”
“बाबा, क्लास कितीही चांगला असला तरी सगळेच विद्यार्थी काही मेरिटमध्ये येत नाहीत. शेवटी क्लासचा फायदा आपण कसा करून घेतो, ते आपल्यावर अवलंबून असतं. तुम्ही काही काळजी करू नका. वार्षिक परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळतील… नाहीच मिळाले तर बघू.”
सुभाष काही बोलला नाही, पण त्याचं मन मात्र अस्वस्थच होतं.
एक गोष्ट मानसच्या लक्षात येत होती, ती म्हणजे क्लासमध्ये 125 विद्यार्थी असल्याने कुणाही विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात नव्हतं. त्यातच परीक्षेच्या गुणांना केंद्रीत करून शिकवलं जात होतं. विषयांचं सखोल ज्ञान मिळावं, असं ना तर क्लासवाल्यांना वाटत होतं, ना विद्यार्थ्यांना! शिक्षणपद्धतीच अशी होती की, जास्तीत जास्त मार्क्स पदरात पाडून घेण्यावर भर दिला जात होता. अशा प्रकारच्या शिक्षणामुळेच कॉपी करण्यासारखे शॉर्टकट्स विद्यार्थी अवलंबत होते.


