अण्णांच्या शेवटच्या दिवसांत सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच होता – तो हा की, सुलूताई येईल का परत अण्णांना भेटायला? अण्णांनी गेल्या आठवड्यात सुलूताईला भेटण्याची इच्छा व्यक्त करून घरातील सर्वांनाच धक्का दिला.
सुलूताई घरातून निघून गेली तेव्हा, घरातील आम्ही सगळेजण खूप लहान होतो, न कळण्याच्या वयातले. आम्हाला घरातून सक्त ताकीद होती की, सुलूताईचं नाव घ्यायचं नाही. पण पुढे जसजसे वय वाढत गेलं, तसतसा सगळा उलगडा झाला होता. गावातील एका परजातीच्या मुलाचा हात पकडून सुलूताई मुंबईला गेली होती, नाटकात काम करायला. त्यानंतर आजतागायत ती कधी कोकणात आली नाही, की तिचा ठावठिकाणाही कोणाला लागला नाही! ‘ती आपल्यासाठी मेली’ असं अण्णांनी मोठ्या आवाजात ठणकावून सांगितले होते, तेव्हाचे ते शब्द अजून कानात घुमत होते माझ्या.
एकदा कधीतरी माईला दबक्या आवाजात बोलताना ऐकले होते की, सुलूताई मुंबईला नाटकात कामं करणारी मोठी नटी झाली आहे, असे आळीतील पेंडशांच्या जावयाने कळवलं होते. तिचा पत्ता आणि फोन नंबर देखील त्याने दिला होता.
अण्णांनी तिला भेटायची इच्छा व्यक्त केली आणि तिला तसा निरोप धाडला गेला. आम्ही सगळेच तिच्या येण्याची वाट बघत होते… आणि एक दिवस रविवारी सकाळी सकाळी एक मोठी मोटार आमच्या कौलारू घरापाशी येऊन थांबली. घरातील सगळी मंडळी अंगणात आली… गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून सुलूताई खाली उतरली. माई तिला सामोरी गेली आणि दोघींची गळाभेट झाली. दोघीही हमसून रडत होत्या. ते बघून मग आम्ही सगळेच पुढे झालो.
हेही वाचा – पैलतीर… नकारात्मक अन् सकारात्मक!
“ए माई, माझे अण्णा कसे आहेत गं?”
“तुझ्या आठवणीने जीव कासावीस झाला आहे ह्यांचा. हातपाय धुऊन घे आधी आणि त्यांना भेट. डोळे लावून वाट बघत आहेत तुझी.”
सुलूताईने हातपाय धुवून अण्णांच्या खोलीत प्रवेश केला आणि तिचा आजवर कोंडलेला उरलासुरला संयम सुटला आणि अण्णांच्या पायांवर डोकं ठेवून ती धाय मोकलून रडायला लागली. तिला त्या अवस्थेत सावरायची हिंमत कोणालाच झाली नाही. शेवटी, माई पुढे होऊन अण्णांच्या कानाजवळ जाऊन म्हणाली, “अहो बघा, आपली लाडकी सुलू आली आहे तुम्हाला भेटायला.” माईचं बोलणं ऐकून अण्णांनी किलकिले करत डोळे उघडले आणि हातानेच ती कुठे आहे, अशी विचारणा केली.
सुलूताई उठून अण्णांच्या पलंगावर बसली. दोघांची नजरानजर झाली. अण्णांनी तिला जवळ ओढून तिचं डोकं आपल्या छातीवर ठेवून तिला थोपटायला सुरुवात केली. पुढची पाच-दहा मिनिटे आम्ही सगळेच स्तब्ध आणि स्तंभित होऊन बघत होतो, तो बापलेकीच्या भेटीचा अवर्णनीय सोहळा.
“अण्णा, माझ्या नाट्यवेडापायी मी घर सोडून गेले. काही वर्षं खूप कष्टांची गेली. पण हळूहळू स्थिरावले. तुमच्या शिकवणीत आणि संस्कारात वाढल्याने आजवर माझा पाय कधीच घसरला नाही, त्या मोहमयी दुनियेत. खुपदा वाटायचं, यावं तुम्हाला भेटायला, पण नाही झाली हिंमत. गेल्या आठवड्यात तुमच्या गंभीर आजारपणाविषयी समजले. सुदैवाने माझे प्रयोग नव्हते, त्यामुळे लगोलग येता आलं मला… अण्णा तुमच्या लाडक्या नावाने हाक मारा ना मला एकदा…”
अण्णा क्षीण आवाजात सावकाश बोलू लागले… “बबडे खूप उशीर केलास यायला. आता कोणत्या हाताने तुला भरवणार मी. लहानपणी जेवताना काऊ-चिऊच्या गोष्टीचा हट्ट धरून मला घरभर नाचवणारी तू, आज माझ्या जगण्यालाच घरघर लागली तेव्हा आली आहेस भेटायला. दिवेलागणीला ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून तुझ्यासोबत म्हटलेली स्तोत्र आज आठवतात. नाटकाच्या वेडापायी तू गेल्यावर या घराचा मात्र सिनेमा झाला. आनंदाची आणि सुखाची उसनी तिकिटं काढून आम्ही सगळे जगत आलो आजवर. हेच बदलू न शकणारे प्रारब्ध आहे, अशी मी स्वतःची समजूत काढून जगत होतो. पण जसजसा श्वास हृदयातून मोकळा झाल्याचे जाणवत गेलं, तेव्हा सर्वप्रथम तू डोळ्यांसमोर आलीस. माईकडे तुझ्या भेटीची इच्छा व्यक्त केली. बबडे, आज तू आलीस. कडकडून भेटलीस. जीव शांत झाला माझा. आता मी तयार आहे मनापासून पुढच्या प्रवासाला.
एक लक्षात ठेव आणि पुढच्या पिढीला देखील तुझ्या नाटकांतून सांग, की ज्या मातीशी तुमची नाळ जुळलेली असते ती एक ना एक दिवस तुम्हाला तिच्या भेटीला बोलावतेच. मायेच्या रंगमंचावर एन्ट्री घेताना कोणाच्या एक्झिटची कधीच वाट बघायची नसते. कारण तो रंगमंच सदैव सजलेला राहून डोळे लावून वाट बघत असतो, तिथेच जन्म घेऊन कर्तृत्वाच्या आकाशात गरूड भरारी मारणाऱ्या तुझ्यासारख्या कलाकारांची.
अगं माई आज आपल्या लाडक्या बबडीच्या आवडीचा स्वयंपाक कर हो. मला जमेल तसं तिला भरवायचं आहे आज… अंधार झाल्यावर घराकडे परतणाऱ्या चिऊताईची गोष्ट सांगत!”
इतकं बोलून अण्णांनी पाणी मागितले प्यायला आणि खोलीत फक्त सुलूताईला ठेवून आम्ही आमच्या सकाळच्या कामासाठी खोली बाहेर आलो.


