अध्याय चौदावा
पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें । नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥291॥ तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये ॥292॥ तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥293॥ सत्त्वरजतमांचां । भेदीं पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥294॥ ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥295॥ कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ॥296॥ ये कोणाचीं काजीं कहीं । सविता जैसा नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥297॥ मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे । ययाचेनि निःशेखें । उरे तें मी ॥298॥ ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्व तया । अर्धपंथें ॥299॥
गुणानेतानतीत्य त्रीन् देही देहसमुद्भवान् । जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥20॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें
अर्थ
अथवा आकाश हे तिन्ही ऋतूस आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही. ॥291॥ त्याप्रमाणे गुणात असून जे गुणांच्या पलीकडे असे आपल्या ठिकाणी स्वत:सिद्ध आहे त्या मूळच्या स्वरूपअहंपणावर (ब्रह्मस्वरूप अहंतेवर) जेव्हा अहंकार असतो (देहअहंता जाऊन स्वरूप-अहंता येते) ॥292॥ तेव्हा तेथून (स्वरूप-अहंतेहून) पाहात असता, तो असे म्हणतो की, मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत. ॥293॥ सत्वरजतमांच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होते आहे, तो हा गुणांचा विकार आहे. ॥294॥ वनामधे जसा वसंत ऋतु वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो, तसा मी या गुणांच्या विकारामधे (साक्षी असा कारणीभूत) आहे. ॥295॥ अथवा तार्यांच्या समुदायांनी लोपावे, सूर्यकांत मण्याने अग्नि उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे ॥296॥ यापैकी कोणच्याही कार्यामधे सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही, त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित, केवळ साक्षित्वाने, अधिष्ठानरूप होऊन राहिलो आहे. ॥297॥ मी गुणांचे प्रकाशन करून (परत) गुणांस पाहतो, गुणांच्या ठिकाणी (असणारा) गुणपणा माझ्याकडून पोसला जातो व या गुणांचा निरास झाल्यावर जे उरते, ते मी आहे. ॥298॥ अर्जुना, अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो, त्यास गुणातीतपणा (उच्च) स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो. ॥299॥
देहाला कारण असणार्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यु, म्हातारपण (इत्यादि) दु:खे यांतून मुक्त होऊन, तो देहांत राहणारा (देहांत असूनसुद्धा) अमृतत्व (मोक्ष) पावतो. ॥20॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुण आपुलालेनि धर्में, देहींचे माघुत साउमें


