नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आजचा विषय माझी आठवण किंवा अनुभव नाही… तर, माझी आवड अन् प्रेम आहे. ‘तारिणी’ म्हटलं की, एकच अर्थ तारणारी, ती तारिणी! जगत तारिणी… देवी आई. माझ्या आईचं नाव तारिणी. तिला ते आधी मुळीच आवडायचं नाही. म्हणायची की, ‘असलं कसलं नाव ठेवलं माझं. कधीच कुणाचं असं नाव ऐकलं नाही!’ मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा आईचं हे माहेरचं नाव मला खूप आवडायला लागलं.
…आणि एकेदिवशी मला मोबाइल कॉल आला की, ‘तारिणी’ नावाची टीव्ही सीरियल करतोय. त्यात नायिका ‘तारिणी’च्या आजीचा रोल आहे. इंटरेस्टेड असाल तर ऑडिशनला या… शूट ठाण्याला असेल. मी ‘ओके’ म्हटलं आणि ऑडिशन दिली. मला ते कॅरेक्टर खूप आवडले होते. आता वाट बघायची होती, चॅनेलमधून येणाऱ्या रिझल्टची. रिझल्ट निगेटिव्ह आला… मी खूप नाराज झाले होते. अगदी ठरवून टाकलं की, ‘झी मराठी’चे कार्यक्रम बघायचे नाहीत. सबस्क्रिप्शन घेतलं नाही… एवढा राग आलेला मला…
कालांतराने मी ते विसरून पण गेले होते अणि मला ‘झी मराठी’ची एक सीरियल मिळाली, ‘सावळ्याची जणू सावली’. आता माझी सीरियल बघण्यासाठी म्हणून मी ‘झी मराठी’ बघायला लागले. माझा एपिसोड बघत असताना अचानक ‘तारिणी’चं पोस्टर दिसलं. ‘मी नाही बघणार ती सीरियल…’ हा निग्रह. पण पोस्टरवर माझ्या लाडक्या शिवानी सोनारचा फोटो पाहिला आणि म्हटलं चला पाहूया ही सीरियल. ‘Zee 5’वर पहिल्या एपिसोडपासून सुरुवात केली आणि वेडीच झाले मी. गुरफटत गेले त्या सीरियलमध्ये!
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
सकाळी उठून चहा, ब्रेकफास्ट घेऊन टीव्हीसमोर बसायचे. ‘तारिणी’ सुरू… तिथेच बसून जेवणाची तयारी व्हायची… भाजी चिरणे, कणीक मळून तिथेच बसून चपात्या लाटून एका ट्रेमध्ये मांडून ठेवायच्या. सगळी तयारी झाली की, टीव्ही बंद करून भाजी फोडणीला टाकायची… चपात्या भाजून होईस्तोवर भाजी शिजायची, कुकर व्हायचा. वरणाला फोडणी देऊन कोशिंबीर बनवायची… आणि नवऱ्याला जेवायला वाढून माझं ताट घेऊन पुन्हा ‘तारिणी’.
फक्त स्वयंपाकघरातला मोजका वेळ आणि आंघोळीच्या वेळेपुरता टीव्ही बंद करायचे. वॉशरूमला जाताना hold ठेवायचे. संध्याकाळी लाजेकाजेस्तो आंघोळीला जायचे. झटपट देवपूजा. देव सुद्धा संभ्रमात पडत असावेत… बाहेर अंधारून आलंय, हे जे 5.30/ 6.00 वाजलेत ते सकाळचे आहेत की, संध्याकाळचे? पुरतं वेडं केलं होतं मला त्या सीरियलने.
हेही वाचा – मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…
आजीचा रोल माझीच मैत्रीण करतेय म्हटल्यावर माझा राग केव्हाच मावळला होता. तारिणीची निर्माती माझीच छोटी मैत्रीण… शर्मिष्ठा राऊत! वयाने माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून छोटी मैत्रीण. तिने एका उत्तम सीरियलची निर्मिती केलीय. प्रत्येक जण आपापली भूमिका जणू काही जगताहेत. मधे तर त्यात मिशन तिरंगा नावाचा एक ट्रॅक केला. अटारी बॉर्डरवर शूट केलेली पहिली सीरियल. मीच काय कोणीही प्रेमात पडावं, अशी मस्त आहे. देशप्रेम ओतप्रोत भरलंय त्यात. देशातली गुन्हेगारी संपवून टाकायची या ओढीने झपाटलेले स्पेशल क्राइम युनिट… त्यांच्या कामाची पद्धत, त्याचं कौटुंबिक जीवन… किती सुंदर लिहिलंय, दिग्दर्शित केलंय आणि सगळे छान कलाकार आपल्या वाट्याला आलेलं पात्र जीवंत करतायत… जर कोणी ही सीरियल पाहत नसाल तर ‘Zee 5’वर आवर्जून पाहा, पहिल्यापासून! तुमचंही माझ्यासारखाच होईल… तुमचेही देव संभ्रमित होतील… थोड्या दिवसांकरिता… पण तारिणी नक्की पाहा!


