अध्याय चौदावा
इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे । कां अगवे तरुवरें । भूमिरसु ॥281॥ नाना दहियांचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें । कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं ॥282॥ तैसें हे सांतःकरण । देहचि होती त्रिगुण । म्हणोनि बंधा कारण । घडे कीर ॥283॥ परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥284॥ त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें । चाळितांही न खोमें । गुणातीतता ॥285॥ ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ॥286॥ आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें । बोलिलों तें खागें । तेवींचि हें ॥287॥ तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे । स्वप्न कां जैसें । चेइलेनी ॥288॥ नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनी न्याहळी । चळण होतां कल्लोळीं । अनेकधा ॥289॥ कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे । तैसें गुणजात देखावें । न होनियां ॥290॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तामस कर्म जितुकें, अज्ञानफळेंचि पिके
अर्थ
लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो, अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो. ॥281॥ अथवा दह्याच्या रूपाने जसे दूधच परिणाम पावते, अथवा उसाच्या रूपाने गोडीच जशी प्रगट होते. ॥282॥ त्याप्रमाणे हे तीन गुण अंत:करणासह देहच (सूक्ष्म व स्थूल देह) होतात. म्हणून खरोखर (जीवाच्या) बंधाला कारण घडते. ॥283॥ परंतु अर्जुना, आश्चर्य हे आहे की, एवढे बंधन जीवास असताही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. ॥284॥ तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे व पुढे हालचाल करीत असताही, आत्म्याच्या गुणातीततपणास धक्का लागत नाही. ॥285॥ अशी (आत्म्याची) स्वभावत: मुक्त स्थिती आहे, ती आता तुला ऐकवितो. कारण तू ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर (भोक्ता) आहेस. ॥286॥ आणि चैतन्य हे गुणांत असून गुणास वश होणारे नसते, ही जी मागे (अध्याय 13 श्लोक 23 मध्ये) तुला गोष्ट सांगितली, तशीच ही गोष्ट आहे. ॥287॥ तरी अर्जुना, ज्यावेळेस अंत:करणात समजूत पटून याप्रमाणे ज्ञानप्रतीति होईल (त्यावेळेला गुणादि हे सर्व मिथ्या भासेल) ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते. ॥288॥ अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून (एखादा मनुष्य) पाहातो, ॥289॥ आपण घेतलेल्या सोंगाने जसा नट फसला जात नाही, त्याप्रमाणे गुण न होऊन (साक्षित्वाने) सर्व गुण पाहावेत. ॥290॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें


