दक्षिण ध्रुवावर रात्र होती. तिथली रात्र आपल्या गाव, शहरातल्या रात्रीसारखी नसते… सूर्य मावळला की, काही तासांनी पहाट होते, पण तसाही प्रकार तिथे नसतो. दक्षिण ध्रुवावर कधी कधी रात्र सलग अनेक महिने राहते. तिथे आकाशात सूर्य दिसत नाही. चहूबाजूंना पांढरा बर्फ आणि वर काळंभोर आकाश.
त्या काळ्या आकाशात लाखो तारे चमकत होते. हिरव्या आणि जांभळ्या प्रकाशाच्या लांब लांब लाटा आकाशात नाचत होत्या. त्यांना विज्ञानाच्या भाषेत दक्षिण ध्रुवीय प्रकाश म्हणतात. त्या प्रकाशाकडे पाहिलं की, एखाद्या अदृश्य चित्रकाराने आकाशावर रंगांचा मोठा कुंचला फिरवला आहे, असं वाटायचं.
त्या बर्फाळ प्रदेशात छोटी मुलगी राहत होती. तिचं नाव होतं तारा. तारा अवघी पाच वर्षांची होती. तिचे बाबा खूप मोठे वैज्ञानिक होते. ते दक्षिण ध्रुवावरील ‘IceCube’ (आईस क्यूब) नावाच्या मोठ्या वेधशाळेत काम करीत होते. ताराची आई संगणकावरून आकाशातील तारे आणि दूरच्या आकाशगंगांचा अभ्यास करीत असे.
ताराला मात्र नेहमी प्रश्न पडत असे. “इथे सगळीकडे बर्फच बर्फ आहे. मग वेधशाळेचं नाव ‘IceCube’ असं का? बर्फाचा मोठा चौकोनी तुकडा कुठं आहे?”
बाबा हसत आणि म्हणत, “तो तुला दिसणार नाही.”
“का?”
“कारण तो बर्फाच्या खूप खाली आहे.”
“किती खाली?”
बाबांनी हात वर केला.
“खूप म्हणजे खूप खाली.”
“आपल्या घराच्या तळघरापेक्षा?”
“हो.”
“दहा तळघरांपेक्षा?”
“त्याहूनही खाली.”
“शंभर तळघरांपेक्षा?”
बाबा पुन्हा हसले.
“दीड ते अडीच किलोमीटर इतका खोल… आणि त्या भल्या मोठ्या बर्फात हजारो छोटे छोटे डोळे बसवले आहेत.”
ताराने डोळे विस्फारले.
“बर्फाला डोळे आहेत?”
“हो. पण ते तुझ्यासारखे नाहीत… ते प्रकाश शोधणारे संवेदक आहेत.”
“ते काय पाहतात?”
“भूत.”
तारा एकदम बाबांना बिलगली.
“खरंच भूत?”
“विज्ञानातलं भूत.”
“त्याला शिंगं आहेत?”
“नाही.”
“मोठे दात?”
“नाही.”
“पांढरं कापड?”
“नाही.”
“छे! मग ते भूत कसलं? आणि त्या भूताचं नाव काय?”
बाबांनी ताराला जवळ घेतलं… “त्याचं नाव न्यूट्रिनो. ते भूत इतकं लहान आहे की, आपण त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही. ते विजेच्या प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतं. ते पृथ्वीच्या आतून येतं आणि दुसऱ्या दिशेने बाहेर जातं.”
हेही वाचा – ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!
ताराने खाली बर्फाकडे पाहिलं.
“मग पृथ्वीला भोक पडत नाही?”
“नाही.”
“ते माझ्या शरीरातूनही जातं?”
“हो.”
तारा लगेच उभी राहिली. तिने आपले हात, पोट आणि पाय तपासले.
“मला काहीच जाणवलं नाही.”
“म्हणूनच त्याला ‘घोस्ट पार्टिकल’ असं म्हणतात. भुतासारखा कण! तो कुणाला धक्का देत नाही. कुणाच्या वस्तू पाडत नाही. त्याला कुठले दार उघडण्याचीही गरज नसते. तो भिंतीतून, बर्फातून, पृथ्वीतून आणि आपल्या शरीरातून पार निघून जातो.”
ताराने संशयाने विचारलं, “तुम्ही त्याला पाहिलं आहे का?”
“नाही.”
“मग तो आहे, हे तुम्हाला कसं कळलं?”
बाबा काही क्षण गप्प राहिले.
“एखादी चिमणी ओली होऊन तुझ्या खिडकीत आली, तर बाहेर न पाहताही बाहेर पाऊस पडत आहे हे तुला समजेल ना?”
“हो.”
“तू प्रत्येक थेंब पाहिला नसलास, तरी चिमणीच्या पंखांवरील पाण्याने तुला बाहेरच्या पावसाची खरी माहिती दिली. तसंच, न्यूट्रिनो स्वतः दिसत नाही. पण तो बर्फातील एखाद्या अणूला क्वचित जरी धडकला, तरीही तिथे निळसर प्रकाश निर्माण होतो. तो प्रकाश आम्हाला न्यूट्रिनोची बातमी देतो.”
ताराला हे उत्तर फार आवडलं.
“म्हणजे निळ्या प्रकाशाची चिठ्ठी?”
“अगदी बरोबर.”
त्या दिवसापासून तारा न्यूट्रिनोला ‘निळ्या चिठ्ठीचं भूत’ म्हणू लागली.
तिच्या बाबांचे नाव फ्रान्सिस होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या मनात वेडी कल्पना आली होती. अवकाशातून न्यूट्रिनो पृथ्वीवर येतात. ते दिसत नाहीत. ते पकडता येत नाहीत. पण ते बर्फातील एखाद्या अणूला धडकले, तर क्षणभर निळा प्रकाश निर्माण होऊ शकतो. दक्षिण ध्रुवावरील बर्फ फार जुना, स्वच्छ आणि पारदर्शक आहे. त्या बर्फाच्या आत हजारो प्रकाशसंवेदक बसवले, तर हा मंद प्रकाश आपल्याला पाहता येईल का?
अनेकांना ही कल्पना अगदीच अशक्य वाटली.
“अदृश्य कण शोधण्यासाठी बर्फाखाली वेधशाळा?” काहीजण खूप हसले होते.
“आकाशाचा अभ्यास करण्यासाठी जमिनीच्या खाली जायचं?” कुणी आश्चर्याने विचारलं.
“एखाद्या न्यूट्रिनोची धडक पाहण्यासाठी विशाल घन किलोमीटर बर्फाचा उपयोग करायचा? तुमच्या डोक्यावर नेमका कुणी हात ठेवला होता?”
फ्रान्सिस मात्र खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते.
“कधी कधी आकाश पाहण्यासाठी वर बघण्यापेक्षा पृथ्वीच्या अंतरंगात पाहावं लागतं,” ते म्हणाले.
तारा तेव्हा जन्मलीही नव्हती. अनेक देशांतील वैज्ञानिक एकत्र आले. त्यांनी बर्फात खोल छिद्रे तयार केली. त्या छिद्रांत लांब तारांबरोबर गोलाकार प्रकाशसंवेदक सोडले. दोन हजार नाही, तर पाच हजारांहून अधिक संवेदक!
ते संवेदक बर्फाच्या काळोख्या अंतरंगात जाऊन शांत बसले. दिवस गेले. महिने गेले. वर्षे गेली. वर बर्फावर वादळे वाहत होती. खाली संवेदक वाट पाहत होते…
ताराला थोडेसे कळू लागले. तेव्हा तिला वाटले, ते हजारो छोटे डोळे छान झोपले असतील.
“बाबा, ते झोपत नाहीत का?” तिने बाबांना विचारलं.
“नाही.”
“वैज्ञानिकांचे यंत्र कधी कधी वैज्ञानिकांपेक्षा अधिक संयमी असते.”
“आता ते कुणाची वाट पाहतात?”
“निळ्या चिठ्ठीची.”
दर सेकंदाला सुमारे 65 अब्ज सौर न्यूट्रिनो प्रत्येक चौरस सेंटिमीटरमधून प्रवास करत असतात. मानवी शरीरातून जाणाऱ्या न्यूट्रिनोंची संख्या शंभर लाख कोटींच्या घरात असते. रोज असंख्य न्यूट्रिनो त्या बर्फातून निघून जात होते. बहुतेक कोणालाही धडकत नव्हते. ते पृथ्वीतून आरपार प्रवास करीत होते.
ताराने एकदा बाबांना विचारलं, “एवढे न्यूट्रिनो माझ्यातून जातात, तरी माझ्याशी बोलत का नाहीत?”
“अगं ते फार लाजाळू आहेत.”
“मग मी त्यांना ‘हॅलो’ म्हणेन!”
ती बर्फावर उभी राहिली आणि मोठ्याने म्हणाली,
“हॅलो, न्यूट्रिनो! मी तारा आहे. तुम्ही माझ्यातून जात असाल तर मला गुदगुल्या करा.”
पण मग तरीही काहीच झालं नाही. तारा थोडी नाराज झाली…
“त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.”
बाबा म्हणाले, “ते अब्जावधी वर्षांचा प्रवास करून आले असतील. कदाचित ते फार थकलेही असतील.”
“कुठून आले?”
“काही न्यूट्रिनो सूर्यापासून येतात. काही पृथ्वीच्या वातावरणात तयार होतात. काही दूरच्या ताऱ्यांतून येतात आणि काही इतक्या दूरवरून येतात की, त्यांचा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला निव्वळ कल्पनाशक्तीच लागेल.”
“ते तिथे कसे जन्मतात?”
“जेव्हा आकाशात काहीतरी खूप मोठी घटना घडते, एखादा तारा फुटतो किंवा प्रचंड काळं विवर आसपासचं द्रव्य गिळू लागतं, तेव्हा खूप ऊर्जा निर्माण होते. त्या गोंधळातूनच न्यूट्रिनो बाहेर पडतात.”
“आग लागली तरी ते भाजत नाहीत?”
“नाही.”
“धुरात त्यांना खोकला येत नाही?”
“नाही.”
“खडकाचा त्यांना धक्का लागत नाही?”
“नाही.”
ताराने डोळे विस्फारले.
“मग ते खरंच भूत आहेत.”
0000
दिवसभर बाहेर मोठं हिमवादळ सुरू होतं. वारा इतका जोरात वाहत होता की, संशोधन केंद्राच्या खिडक्या थरथरत होत्या. तारा आईसोबत रंगीत पेन्सिलींनी चित्र काढत बसली होती.
तिने काळ्या कागदावर लहानसा पांढरा ठिपका काढला. त्यातून निळी रेघ काढली.
“हे काय, कसलं चित्रं?” आईने विचारलं.
“दूरचा तारा फुटला. त्याने निळी चिठ्ठी पाठवलीय.”
“चिठ्ठीत काय लिहिलं आहे?”
तारा विचार करू लागली…
“मी फार दूर आहे. तुम्हाला मी दिसत नाही, पण मला विसरू नका.”
आईने तिच्या मऊ केसांतून हात फिरवला…
“खूप सुंदर!”
तेवढ्यात प्रयोगशाळेत आवाज झाला.
“टिंग!”
संगणकाच्या पडद्यावर काही बिंदू चमकले. पहिला बिंदू, मग दुसरा, मग तिसरा. बर्फाखालील वेगवेगळ्या संवेदकांनी प्रकाशाची नोंद केली होती. फ्रान्सिस आणि त्यांचे सहकारी संगणकाजवळ आले.
“काहीतरी दिसलं आहे,” तिथला वैज्ञानिक म्हणाला.
“न्यूट्रिनो?” ताराने विचारलं.
“कदाचित.”
“तो माझा ‘हॅलो’ ऐकून आला असेल!”
सगळे हसले. पण फ्रान्सिस हसले नाहीत. ते पडद्यावर दिसणाऱ्या बिंदूंकडे एकाग्रतेने पाहत होते. प्रत्येक संवेदकाने प्रकाश पाहिलेली वेळ मोजली जात होती. कोणत्या संवेदकाला प्रकाश आधी दिसला, कोणत्या संवेदकाला नंतर दिसला, प्रकाश किती तेजस्वी होता, या सगळ्या माहितीवरून अदृश्य कणांची माहिती आणि मार्गही तयार केला जात होता.
ताराने पडद्यावर बोट ठेवलं.
“ही निळी रेघ कुठून आली?”
फ्रान्सिसने संगणकावर आकाशाचा नकाशा उघडला.
“आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून.”
“म्हणजे फार दूरून?”
“हो. सूर्यापेक्षाही दूर. आपल्या आकाशगंगेच्याही पलीकडून.”
“इतक्या दूरून ती आपल्याला भेटायला आली?”
फ्रान्सिसने ताराकडे पाहिलं.
“हो आणि तिने प्रवासात कुठेही थांबून आपली गोष्ट बदलली नाही.”
न्यूट्रिनोचे हेच मोठे वैशिष्ट्य होते. प्रकाश दूरवरून येताना धूळ, वायू किंवा इतर पदार्थांमुळे अडू शकतो. त्याची दिशा बदलू शकते. पण न्यूट्रिनो बहुतेक गोष्टींच्या आरपार जातो. त्यामुळे तो जिथे जन्मला, तिथली खरी बातमी घेऊन येऊ शकतो.
छोटासा दूत!
त्याच्या हातात पत्र नाही. पाठीवर पिशवी नाही. तरी तो ब्रह्मांडाच्या टोकावरून एकेक नवी बातमी घेऊन येतो.
0000
तारा आता रोज प्रयोगशाळेत येऊ लागली. अर्थात, तिला यंत्रांना हात लावण्याची परवानगी नव्हती. ती खुर्चीत बसून रंगीत चित्रं काढत असे. कधी न्यूट्रिनोला मोठी टोपी घाली. कधी त्याला निळे बूट घाली. कधी पृथ्वीच्या आतून जाऊन पलीकडून बाहेर येताना दाखवी.
काही काळानंतर तिने न्यूट्रिनोला डोळे काढले.
फ्रान्सिस म्हणाले, “त्याला डोळे नसतात.”
“माझ्या गोष्टीत आहेत.”
“विज्ञान बदलू नकोस.”
“मी विज्ञान बदलत नाही. न्यूट्रिनोला माझं चित्र पाहता यावं म्हणून डोळे काढते आहे.”
फ्रान्सिस हसले…
“मग ठीक आहे. पण चित्राखाली लिही, ‘हा कल्पनेतील न्यूट्रिनो आहे.’”
“कल्पना आणि विज्ञान मित्र आहेत का हो?”
“खूप चांगले मित्र. कल्पना पुढे धावते. विज्ञान तिच्यामागून पुरावे शोधत जाते.”
“आणि कल्पनाच चुकली तर?”
“विज्ञान तिला प्रेमाने परत बोलावतं, आणि पहिल्यापासून सुरुवात…”
हे वाक्य ताराला इतकं आवडलं की, तिने आपल्या चित्राखाली लिहिलं,
“कल्पना आकाशात उडते. विज्ञान तिच्यासाठी पंख पसरते.”
बर्फाखालील निळे ठिपके वाढत गेले. वैज्ञानिकांनी अनेक वर्षांची माहिती तपासली. प्रत्येक नोंद खरी न्यूट्रिनोची आहे का, की इतर कणामुळे प्रकाश निर्माण झाला, हे पाहिलं. चित्रातला छोटासा फरक शोधावा, तसं ते माहितीतील सगळे संकेत तपासत होते.
त्यांना घाई करता येत नव्हती. तारा आता आणखी थोडी मोठी झाली होती. तिला गोष्ट समजली होती. विज्ञानात “मला असं वाटतं” हे पहिलं पाऊल असतं. “मी तपासून पाहिलं” हे दुसरं. “इतर वैज्ञानिकांनीही तपासलं” हे तिसरं. या तिन्ही पायऱ्या चढल्यावरच कल्पना शोध बनते.
‘आईस क्यूब’ने आकाशातून आलेल्या अतिऊर्जावान न्यूट्रिनोंची नोंद केली. खूप दूरच्या ब्रह्मांडात निर्माण झालेल्या या कणांनी पृथ्वीवर येऊन निळ्या प्रकाशाच्या क्षणभंगुर खुणा सोडल्या होत्या. त्या खुणांमुळे माणसाला ब्रह्मांड पाहण्याचा नवा मार्ग मिळाला.
0000
सकाळी संशोधन केंद्रातील दूरध्वनी वाजला. फ्रान्सिसने तो उचलला. समोरून आलेला आवाज ऐकताना ते शांत झाले. त्यांच्या हातातील कप थरथरला… तारा जवळच बसली होती.
“काय झालं?” तिने विचारलं.
फ्रान्सिसने दूरध्वनी ठेवला. काही क्षण ते बोलू शकले नाहीत.
“स्वीडनमधून फोन होता.”
“मग?”
“त्यांनी सांगितलं की, मला यावर्षीचा 2026चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.”
सगळ्या प्रयोगशाळेत आनंदाचा आवाज घुमला. वैज्ञानिकांनी परस्परांना मिठ्या मारल्या. कुणी टाळ्या वाजवल्या. कुणाच्या डोळ्यांत पाणी आलं. वर्षानुवर्षे बर्फाखाली शांत बसलेल्या संवेदकांच्या वतीनेही जणू सारे आनंद साजरा करत होते.
तारा मात्र काही क्षण शांत राहिली. मग तिने विचारलं, “पुरस्कार तुम्हाला मिळालाय की न्यूट्रिनोला?”
फ्रान्सिस हसले…
“न्यूट्रिनोला पुरस्कारांची गरज नसते.”
“का?”
“ते आपलं काम करत राहतात. ताऱ्यांपासून निघतात. ब्रह्मांडातून प्रवास करतात. पृथ्वीच्या आरपार जातात. कधी एखाद्या बर्फाच्या अणूला धडकून आपली निळी चिठ्ठी ठेवतात.”
“मग खरा पुरस्कार कुणाला?”
फ्रान्सिसने आजूबाजूच्या वैज्ञानिकांकडे पाहिलं…
“या अशक्य अशा कल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा… या बर्फात छिद्र पाडणाऱ्या कामगारांचा… संवेदक तयार करणाऱ्या अभियंत्यांचा… माहिती तपासणाऱ्या वैज्ञानिकांचा… अनेक वर्षं छोट्याशा निळ्या प्रकाशाची वाट पाहणाऱ्या सगळ्यांचा…”
ताराने विचारलं, “माझाही?”
“तू न्यूट्रिनोला पहिल्यांदा ‘हॅलो’ म्हटलं होतंस. त्यामुळे तुझाही!”
नोबेल पुरस्काराचा दिवस आला. मोठ्या सभागृहात अनेक लोक बसले होते. फ्रान्सिस मंचावर गेले. त्यांना सुवर्णपदक देण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले. फ्रान्सिसने पदक हातात घेतलं. त्यांना दक्षिण ध्रुवावरील काळोखी रात्र आठवली. बर्फाखालील हजारो शांत डोळे आठवले. पहिल्यांदा पडद्यावर चमकलेली निळी रेघ आठवली… आणि न्यूट्रिनोला “निळ्या चिठ्ठीचं भूत” म्हणणारी छोटी तारा आठवली.
कार्यक्रमानंतर तारा त्यांच्याजवळ आली…
“आता न्यूट्रिनो दिसतो का?” तिने हसत विचारलं.
फ्रान्सिस म्हणाले, “आजही नाही.”
“मग एवढा मोठा पुरस्कार अदृश्य गोष्टीसाठी?”
“हो. कारण दिसणं आणि असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.”
हेही वाचा – एकटं टाकून…
ताराने ते नोबेल पदक हातात घेतलं. ते चमकत होतं. ती म्हणाली, “हे पदक दिसतं. न्यूट्रिनो दिसत नाही. पण पदकापर्यंत पोहोचवणारा न्यूट्रिनोच आहे.”
“अगदी बरोबर.”
तारा खिडकीजवळ गेली. बाहेर बर्फ पडत होता. तिने हात पुढे केला. हिमकण तिच्या तळहातावर विसावले आणि विरघळले. त्याच क्षणी तिच्या शरीरातून सूर्यापासून आलेले असंख्य न्यूट्रिनो आरपार गेले. काही पृथ्वीच्या दुसऱ्या दिशेला निघून गेले. काही आणखी दूरच्या प्रवासाला लागले. पण तिला काहीच जाणवलं नाही.
तरी तिने हळूच म्हटलं, “हॅलो, छोट्या भुता. तुझी निळी चिठ्ठी आम्हाला मिळाली.”
दूर दक्षिण ध्रुवावर, बर्फाखालील संवेदकाने त्याच वेळी प्रकाशाचा सूक्ष्म ठिपका पाहिला.
टिंग!
संगणकावर निळी खूण चमकली. एखाद्या दूरच्या ताऱ्याने पृथ्वीला पुन्हा संदेश पाठवला होता…
“मी दिसत नाही. तरी मी आहे. तुम्ही पाहात राहा. मी ब्रह्मांडाची आणखी गोष्ट घेऊन येतो आहे.”
…आणि बर्फाखालचे हजारो डोळे पुन्हा शांतपणे वाट पाहू लागले. कारण विज्ञानाची सर्वांत सुंदर गोष्ट अशी असते की, एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडलं म्हणून कथा संपत नाही. नवीन कथेचे नवं दार उघडतं आणि त्या दाराच्या पलीकडे असंख्य अदृश्य गोष्टी आपल्याला हळूवार हाक मारत असतात.


