जब ज़िद पे आ गई पार्वती,
समझाने पहुँचे सप्तऋषि।
काय ज़िद कर रई,
काय खुमर रई,
ऐसे वर के लाने…
‘हनुमान अंश’ या चित्रपटातील साधू एस. तिवारी यांचं हे गाणे! गाणे म्हणण्यापेक्षा बुंदेली लोकभक्तिगीत. अतिशय सुंदर गीत आहे. एकदा ऐकायला सुरुवात केली की, ते सतत गुणगुणत राहावेसे वाटते. पार्वती शंकराशीच लग्न करण्याचा हट्ट धरून बसली आहे आणि तिला समजावण्यासाठी सप्तऋषी आले आहेत. समाजमान्य निकषांत न बसणारा, जगावेगळा असा हा वर तू का निवडला आहेस, हा त्यांचा प्रश्न!
देवांना मानवी रूप देऊन, त्यांच्याही आयुष्यात मानवी भावभावना, हट्ट, प्रेम आणि संघर्ष गुंफून गोष्टी सांगण्याची आपल्याकडची परंपरा किती सुंदर आहे! शंकर आणि पार्वती यांच्याभोवती फिरणाऱ्या कथा पाहिल्या की वाटते, मानवापेक्षा श्रेष्ठ देव, देवांच्या पलीकडे असणारे महादेव आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या इच्छा-आकांक्षांच्या पलीकडे, म्हणजेच पार जाणारी अशी ती पार्वती! काय सुंदर जोडी आणि काय सुंदर कथा!
कधी कधी आपण एखादा नवीन शब्द ऐकतो आणि वारंवार तोच शब्द आपल्या कानावर पडू लागतो. एखाद्या विचाराचेही असेच असते. आपण एखाद्या भावनेचा विचार करत असतो आणि नेमक्या त्याच भावनेशी नाते सांगणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. असाच काहीसा योगायोग माझ्या बाबतीत घडला.
हेही वाचा – अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!
बरेच दिवसांपूर्वी मी आनंदवनातून साधनाताई आमटे यांचे ‘समिधा’ हे पुस्तक आणले होते; पण वाचायचे राहूनच गेले होते. साधनाताईंनी आपल्या आयुष्यातील अनुभव आणि आठवणी या पुस्तकातून मांडल्या आहेत. या पुस्तकाचे शब्दांकन सीताकांत प्रभू यांनी केले आहे. वाचनासाठी सतत पुढे ढकलत आलेले हे पुस्तक आणि डोक्यात सतत घोळणारे पार्वतीचे गाणे! नेमके हेच गाणे मनात असताना ‘समिधा’ वाचायला घेतले आणि मला राहून राहून वाटू लागले, हे गाणे जणू बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्याच आयुष्यावर लिहिले असावे!
बाबा आमटे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा साधनाताईंच्या वाट्यालाही असेच अनेक सप्तर्षी आले असतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात महत्त्वाची भूमिका बजावणारे गागाभट्ट हे साधनाताईंचे पूर्वज. अशा घराण्यातील इंदू घुले यांनी बाबा आमटेंसारख्या खादीधारी फकिराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, ही त्या काळात अनेकांना आश्चर्याची वाटणारी गोष्ट होती.
साधनाताईंनी बाबांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ते साधूच्या वेशात होते. पोटापर्यंत रुळणारी लांब दाढी, पाठीवर जटा, एका हातात काठी, खांद्यावर मोठी पिशवी आणि कांबळे, अंगावर खादीचे धोतर आणि भगव्या रंगाचा अंगरखा, असा त्यांचा अवतार होता. अशा खादीधारी फकिराशी रेशमी नऊवारी नेसणाऱ्या, नाजूक-साजूक वातावरणात वाढलेल्या इंदू घुले लग्न करतील, असे कोणाला वाटले असेल? त्यांच्यासमोर इतर स्थळेही होती; पण साधनाताईंना हा फकिरी बाबा भावला होता.
विशेष म्हणजे, साधनाताईंना भेटण्यापूर्वी बाबा आमटेंना लग्न करण्याची इच्छा नव्हती. त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्याचा निर्धार केला होता. मात्र, त्यांची ही साधना मोडणारी म्हणून इंदू घुले यांचे नाव पुढे ‘साधना’ ठेवण्यात आले, असे म्हटले जाते.
बाबा आमटेंसारख्या माणसाच्या आयुष्यात येणे म्हणजे केवळ एका माणसाशी लग्न करणे नव्हते, तर त्याच्या ध्येयाशी, त्याच्या संघर्षाशी आणि त्याच्या स्वप्नांशी एकरूप होणे होते.
लग्नासाठी मुलगा कसा असावा, याचे काही ठरावीक निकष समाजाने ठरवून ठेवले आहेत. चांगली नोकरी, नियमित उत्पन्न, स्वतःच्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ, सुखसोयींचे आयुष्य… या अपेक्षा चुकीच्या नाहीत; पण सुखाची व्याख्या एवढ्यापुरतीच मर्यादित असते का?
समाजाला कदाचित असे वाटत असावे, की मुलाने दिवसातील सात-आठ तास नोकरी करावी, उरलेला वेळ कुटुंबाला द्यावा, बाहेर फिरायला जावे, संसारात सुखसोयी असाव्यात. दागदागिने, कपडेलत्ते यांच्या हौशी पुरवता याव्यात. यात काही गैर नाही; पण स्त्रीच्या सुखाची व्याख्या एवढीच असते का? एखाद्या मोठ्या ध्येयाने झपाटलेल्या माणसासोबत आयुष्य जगण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रीच्या अपेक्षा या निकषांपेक्षा वेगळ्या असू शकतात.
राम शेवाळकर यांनी ‘समिधा’च्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, सदैव मृत्यूची मैत्री लाभलेल्या पुरुषाला सहचर म्हणून पत्करणे सुखाचे नव्हते. पण बाबा आणि साधनाताई यांच्या सुखाच्या कल्पनाच लौकिकापेक्षा वेगळ्या होत्या. ध्येयाच्या वाटेवर दुःख असते, हे खरे असले तरी दुःखाच्या गर्भातही एक सूक्ष्म, उच्च आनंद दडलेला असतो. बाबा आणि ताई त्या दुर्मीळ आनंदाचे धनी ठरले.
मुळात, अद्वितीय माणसाला निवडणारी स्त्रीही अद्वितीय असते. तिच्या डोळ्यांसमोर असलेले आयुष्य इतरांना दिसत नसते. तिच्या सुखाची कारणे इतरांच्या सुखाच्या कल्पनांपेक्षा वेगळी असतात. तिला दिसणारे सौंदर्य इतरांना दिसेलच असे नाही आणि तिला जाणवणारा आनंद इतरांना समजेलच असेही नाही.
साधनाताई म्हणतात, “मी या एका जीवनात अनेक जीवने जगले. आयुष्यात काही राहून गेले आहे, असे मला वाटत नाही.” त्यांच्या या शब्दांचा विचार केला की वाटते, एखाद्या सामान्य, सुखसोयींनी भरलेल्या संसारात त्यांनाही हे समाधान मिळाले असते का? कारण त्यांना केवळ संसार करायचा नव्हता, तर एका मोठ्या ध्येयाचा भाग व्हायचे होते. बाबा आमटे यांच्या महान कार्याच्या यज्ञात त्या स्वतःला समिधा मानतात.
हेही वाचा – …तेच मातीने माखलेले पाय!
साधनाताईंचे एक वाक्य तर त्यांच्या संपूर्ण भूमिकेचे सार सांगते, “बाबा आमटे जर सर्जन आहेत, तर मी त्यांची ॲनेस्थेटिस्ट आहे.”
अशा आयुष्यात संघर्ष असतो, त्याग असतो, कधी एकटेपणाही असतो; पण त्याचबरोबर एका मोठ्या ध्येयाचा भाग असल्याचे समाधानही असते.
आजूबाजूला पाहताना मला अशा अनेक पार्वती दिसतात. समाजाच्या नजरेत हट्टी, अव्यवहारी, जगावेगळ्या; पण स्वतःच्या मनाला माहीत असलेल्या एका वेगळ्याच सुखाच्या वाटेवर चालणाऱ्या. त्यांच्या निवडीमागची ओढ, त्यातला आनंद आणि त्यासाठी आयुष्यभर सोबत चालण्याची तयारी फक्त त्यांनाच माहीत असते.
काही निवडी समाजाला हट्ट वाटतात, काहींना त्या वेडेपणाही वाटतात; पण प्रत्येक निवडीमागे एक वेगळी सुखाची व्याख्या असते. अशा स्त्रियांना समजावण्यासाठी सप्तर्षी आजही येतात; पण प्रत्येक पार्वतीला आपल्या शंकरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहीत असतो!


