अध्याय चौदावा
कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें । पडियंतें ये पाहुणें । स्वर्गौनियां ॥216॥ मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा ॥217॥ जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ॥218॥ अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ॥219॥ सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई ॥220॥ नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ॥221॥ तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी । तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी ॥222॥ पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं । विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ॥223॥ छत्तिसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें । तिन्ही नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें ॥224॥ ऐसें सर्व जें सर्वोत्तम । आलें असे जया सुगम । तयासवें निरुपम । लाहे देह ॥225॥ इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जैं आगळीक । धरी रज ॥226॥ आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचां । माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा ॥227॥ पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी । तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ॥228॥ परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ॥229॥ हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेंटाळितां अलाभु । तें तें उरे ॥230॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुणवृद्धिनिरूपण, तीं श्लोकीं सांगितलें जाण
अर्थ
अथवा सुकाळ (धान्य व जल यांची विपुलता) प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य (जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता, असे आवडते मनुष्य) स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे ॥216॥ अर्जुना, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे काय? त्याप्रमाणे सत्त्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो (सत्त्व गुणाने स्वभावत: युक्त अशा जन्माशिवाय) दुसरीकडे कोठे जाईल? ॥217॥ कारण की, आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण, तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे शरीर टाकून निघतो ॥218॥ असा जो अकस्मात जातो, तो पुन्हा सत्त्वाचाच नवा होतो. त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो. फार काय सांगावे! त्याला ज्ञानी पुरुषांमध्ये जन्म मिळतो ॥219॥ राजा हा राजेपणाने डोंगरावर गेला असता, त्याच्या राजेपणात काही कमीपणा येईल काय ? अर्जुना, सांग बरे ॥220॥ अथवा अर्जुना, या गावातील दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे ॥221॥ त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्त्वगुणाचे निर्मलत्व (प्रकाश) ज्ञानासह विशेष वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. ॥222॥ महतत्वादि अनुक्रमाचा विचार करून अखेरीस (विचार करणारा) त्या विचारांसकट (ज्या ब्रह्मस्वरूपात) लीन होतो ॥223॥ वेदांतात (गीतेत १३ व्या अध्यायात ५/६ श्लोकात सांगितल्याप्रमाणे) छत्तीस तत्त्वे मानली आहेत, त्यांच्या मते जे ब्रह्म सदतिसावे आहे, सांख्यात चोवीस तत्त्वे मानली आहेत, म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म पंचविसावे आहे, व सत्त्वगुणादि तीन गुणांस नाहीसे करून, जे स्वभावत:च चौथे आहे ॥224॥ असे जे ब्रह्म, सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास (ज्या कुलात) सुलभ झाले आहे, त्यांच्याबरोबर (त्या कुलात) त्यास निरुपम देह मिळतो. ॥225॥ हे पाहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्त्वगुण खाली तोंड करून बसतात (कमी होतात) व रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो ॥226॥ तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्या वेळी त्या शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. ॥227॥ पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे (बरे वाईट न पाहाता) एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमधे मोकळीक असते. ॥228॥ परस्त्री वगैरेंशी प्रसंग आला असता, या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत, असे त्यास वाटत नाही व मग शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो. ॥229॥ तेथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसर्याच्या वस्तु लुबाडतांना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते, तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. ॥230॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : धाराधरकाळें, महानदी उचंबळे


