सुहास गोखले
सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा सहावा भाग.
विशाखा : काही नक्षत्रे त्यांच्या चांदणीच्या प्रखर तेजाने पटकन ओळखता येतात तर, काहींना मात्र शोधण्यासाठी थोडा त्रास होतो. विशाखा देखील असेच एक नक्षत्र आहे. या तारकांना प्रखर तेज नसले तरी, पुरेशा तेजामध्ये त्या अगदी काटेकोर मांडलेल्या आढळतात. स्वाती नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेस पाहिल्यास आपणास दोन समान तेजाच्या तारका थोड्या अंतराने अगदी समान रेषेत आढळतात. तेच विशाखा नक्षत्र.
विशाखा नक्षत्राचा समावेश तुळ राशीमध्ये होतो. तुळ म्हणजे तराजू. तराजूचा वापरच समान मापनासाठी केला जातो आणि ज्याप्रमाणे तराजूच्या दोन्ही बाजू समान असतात त्याचप्रमाणे विशाखाच्या दोन्ही चांदण्या समान वाटतात. विशाखाच्या पुढील नक्षत्राचे नाव अनुराधा म्हणजे राधेचे अनुकरण करणारी. बहुदा म्हणूनच काही ठिकाणी विशाखा नक्षत्रास राधा असेही म्हटले जाते.
एके काळी शरद संपात बिंदू (सूर्य विषुववृत्तावर लंबवत असतो) विशाखा नक्षत्रात असल्याने, दिवस आणि रात्र समान होत असे. म्हणजे दिवस आणि रात्र समान बारा-बारा तासांची असे. अशा प्रकारे दिवस रात्रीची समान वाटणी करणारे असल्याने या तारकासमूहाची कल्पना करण्यात आली. कालांतराने हा शरद संपात बिंदू सरकत गेला आणि सध्या तो चित्रा नक्षत्राजवळ आहे.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
वैशाख पौर्णिमेस अवकाश निरीक्षण केल्यास आपणास कधी कधी चंद्र पूर्वेस उगवताना या विशाखाच्या दोन चांदण्या आणि मधोमध पौर्णिमेचा चंद्र तर कधी कधी या विशाखाच्या दोन चांदण्याच्या मधोमध चंद्राची अतिशय मोहक कोर बघण्यास मिळते.
अनुराधा : बारा राशींपैकी काही ठराविक राशीच आपल्याला आकारानेच ओळखता येतात. सिंह रास मृग आणि आश्लेषा याप्रमाणेच वृश्चिक अशीच एक रास आहे. तुळ तारकासमूहाच्या पुढे पाहिल्यास आपणास विंचवाच्या आकाराप्रमाणे एक तारकासमूह आढळतो. तो म्हणजे वृश्चिक. अवकाशात हा समूह ओळखणे अतिशय सोपे. या विंचवाच्या पुढच्या बाजूस तोंडाशी, तीन जवळपास समान तेजाच्या तारका आढळतात. थोड्याशा दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनुराधा नक्षत्र होय.
भारतीय प्राचीन साहित्यामध्ये अनुराधेचा उल्लेख आढळतो. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी अनुराधा या नावाची व्युत्पत्ती दिली आहे. असुरांवर विजय मिळवण्यासाठी आपण अनुकूल सामग्रीने समृद्ध होऊया अशी प्रतिज्ञा देवांनी ज्या नक्षत्रावर केली ते अनुराधा (अन-अनुकूल, राधा-समृद्धी).
ज्येष्ठा : अनुराधा हे विंचवाचे मुख तर ज्येष्ठा विंचवाचे मधले शरीर. हे देखील ओळखण्यास अतिशय सोपे. अनुराधाच्या तीन तारका जशा आडव्या रेषेत आढळतात. त्याच प्रमाणे थोड्या पुढे आपणास तशाच तीन तारका दिसतात. परंतु तारकांमध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्षत्र.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
ज्येष्ठा नक्षत्राचा समावेश देखील वृश्चिक राशीमध्ये होतो. वृषभ राशीतील रोहिणी आणि वृश्चिक राशीतील ज्येष्ठा या दोन्ही तारका समान लाल रंगाच्या भासतात म्हणून फार पूर्वी या दोन्ही तारकांना लाल म्हणजे रोहित रंगाच्या म्हणून रोहिणी हे एकच नाव होते. तसेच या दोन्ही तारका एकमेकींच्या बहिणी, असे देखील म्हटले जात असे. पुढे वृश्चिकेतील तारका जास्त प्रखर दिसू लागल्याने तिला ज्येष्ठा हे नाव देण्यात आले आणि वृषभातील तारकेस कनिष्ठा हे नाव मिळाले. नंतरच्या काळात ज्येष्ठा आणि रोहिणी अशी नावे या दोन तारकांना देण्यात आली.
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)