“डॉक्टर… माझ्या मुलाला काय झालं?” सदानंदांचा आवाज थरथरत होता.
“फूड पॉयझनिंग झालं आहे. काय खाल्लं होतं त्याने?”
सदानंद काही बोलण्याआधीच राजचा मित्र वरद म्हणाला, “नाटकानंतर आम्ही नाश्ता आणि मिठाई मागवली होती.” सदानंदांनी नाश्ता आणि मिठाईचं बिल वरदकडून घेतलं आणि ते फेमस मिठाईवाल्यांचं बिल खिशात ठेवलं.
‘फेमस मिठाईवाले’— पन्नास वर्षं जुनं दुकान. उत्तम चव, दर्जा आणि विश्वास यासाठी प्रसिद्ध. “इथली मिठाई म्हणजे डोळे झाकून घ्यावी,” असं ग्राहक म्हणायचे.
0000
राज हा सदानंदांचा एकुलता एक मुलगा. एम.एस. करण्यासाठी अमेरिकेला जाणार होता…
“बाबा, एम.एस. करून आलो की, आधुनिक तंत्रज्ञान आपल्या व्यवसायात वापरणार,” राज उत्साहाने म्हणायचा. सदानंद त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणायचे, “तू फक्त शिकून ये. बाकी मी बघतो.”
हेही वाचा – रिटर्न गिफ्ट
दोन वर्षांचा खर्च — जवळपास दोन कोटी रुपये. सदानंद दिवसरात्र पैशांची जुळवाजुळव करत होते. राजच्या अमेरिकेला जाण्याचा दिवस जवळ येत होता… पण पैशांची व्यवस्था अजूनही झाली नव्हती. त्यामुळे सदानंद बेचैन होते.
0000
काल राजच्या नाटकाचा प्रयोग झाला. विषय होता — अन्नातील भेसळ. नाटकाचा प्रयोग संपल्यावर दिग्दर्शक वरदने समोसे, मटार करंज्या, ढोकळा, कलाकंद, बर्फी आणि गुलाबजाम मागवले. सगळ्यांनी ताव मारला आणि अर्ध्या तासातच राजसह चार जणांची प्रकृती बिघडली.
“काळजी करू नका,” डॉक्टर म्हणाले, “योग्य उपचार लगेच मिळाले म्हणून थोडक्यात निभावले. राज आणि त्याचे मित्र आता ठीक आहेत. तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता.”
हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य
“काका, मला थोडे पैसे उसने देता का? हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे. मी एक-दोन दिवसांत परत करेन.”
“नाही वरद, उसने देत नाही… पण सगळं बिल मी भरतो,” सदानंद म्हणाले.
“काका, खरंच? तुमचे खूप उपकार झाले. मी हे कधीच विसरणार नाही,” वरद कृतज्ञतेने म्हणाला.
सगळे आपापल्या घरी परतले. घरी आल्यावर सदानंदांनी खिशातून ते बिल काढलं.
“फेमस मिठाईवाले…”
“राजला अमेरिकेत पाठवण्यासाठी… मीच या मिठाईत भेसळ केली होती! पन्नास वर्षं जपलेल्या ग्राहकांच्या विश्वासाला मीच तडा दिला…” मनातल्या मनात ते पुटपुटले — “यापुढे… कधीही भेसळ नाही!” आणि त्यांचा निर्णय योग्यच ठरला.
पुढच्याच आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘फेमस मिठाईवाले’वर छापा टाकला. दुकानातील मिठाई आणि कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीत कुठेही भेसळ आढळली नाही आणि पन्नास वर्षं जपलेला ग्राहकांचा विश्वास अबाधित राहिला.


