अध्याय चौदावा
परि हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त । तैं करी संतप्त । देह जेवीं ॥196॥ कां वरिष आतप जैसें । जिणोनि शीतचि दिसे । तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ॥197॥ नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥198॥ तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी । तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी ॥199॥ तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज । वळघें तैं सहज । प्रमादीं होय ॥200॥ तयाचि गा परिपाठीं । सत्त्वतमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥201॥ तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन सौंदरचि नाहीं । ऐसें मानी देहीं । देहराजु ॥202॥ त्रिगुणवृद्धिनिरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण । आतां सत्त्वादिवृद्धिलक्षण । सादर परिसा ॥203॥
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते । ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥11॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा । रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥12॥
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च । तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥13॥
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् । तदोत्तमविदां लोकानमलान् प्रतिपद्यते ॥14॥
रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते । तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥15॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र
अर्थ
परंतु कफ व वात यांस मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते, तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते, ॥196॥ अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून (हे गेल्यानंतर) जेव्हा थंडीच दिसते, तेव्हा आकाश थंडगार असे होते ॥197॥ अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ति जडमूढ होते ॥198॥ त्याप्रमाणेच रजोगुण व तमोगुण नाहीसे करून जेव्हा सत्त्वगुण हा आपली बुद्धी मिरवतो, त्या वेळी तो सत्त्वगुण जीवाकडून ‘मी सुखी आहे ना?’ असे म्हणवितो. ॥199॥ त्याचप्रमाणे सत्त्वगुण व रजोगुण हे नाहीसे होऊन जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी (चुकी करणारा) होतो ॥200॥ त्याच रीतीने सत्त्वगुणास व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो ॥201॥ तेव्हा कर्मावाचून दुसरे काही सुंदरच नाही, असे देहात, देहराज जो आत्मा, तो मानतो. ॥202॥ तीन गुणांची वृद्धी कशी होते, त्याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले, हे समज. आता सत्त्वादि वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐका. ॥203॥
या देहामधे सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा सत्त्वगुणाची वृद्धी झाली आहे असे जाणावे. ॥11॥
हे भरतश्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असता लोभप्रवृत्ति (पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल), (अचाट) कर्माचा आरंभ, दुर्धर अभिलाष, विषयाची लालसा ही उत्पन्न होतात. ॥12॥
हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ति, प्रमाद व मोह ही निर्माण होतात. ॥13॥
सत्त्वगुणाची वाढ असतांना, जर मनुष्य मृत्यु पावला तर तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो. ॥14॥
रजोगुणाची वाढ असतांना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा (मनुष्य-) लोकी जन्म पावतो; त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धि असतांना मरण पावल्यास पुरुष, (लोह, लोष्ठ, पाषाण इत्यादि) ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो. ॥15॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेवींचि आक्रोशबळें, व्यापारे कोणे एके वेळे


