भाग – 46
माधव जरा आपला आवाज कठोर करत शर्वायची आई आनंदीला म्हणाला… “याचा अर्थ काय घ्यायचा? आपण मूळ विषयावर परत यायला हवं. मी थांबणार नाही, आनंदी. शर्वायनं जर अन्वीला नाही म्हणायचं ठरवलं असेल, तर त्यानं सरळ सांगावं. उगीच असा खेळ मांडू नको.”
आनंदी थोडी अस्वस्थ झाली… “मी त्याच्याशी बोलते पुन्हा… काही कळालं तर तुला सांगते.”
आणि फोन कट करते…
“शर्वाय स्थळ पाहण्यासाठी हो म्हणाला होता… अन्वीशी लग्नाला नाही. त्याला हे जर काही कळलं, तर मग काही खरं नाही… त्याच्या निर्णयात त्याला लुडबूड चालत नाही… उगाच पुन्हा चिडायचा आणि इथे यायला टाळाटाळ करायचा…” आनंदी स्वतःशीच पुटपुटत होती.
0000
लग्नानंतरची पहिली सकाळ… सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत डोकावली आणि बारीकसं प्रकाशाचं चांदणं रेखाटलं गेलं… शर्वायच्या उघडलेल्या डोळ्यांत पहिलं प्रतिबिंब उतरलं – आराध्या…
ती शांतपणे झोपलेली होती. केसांची एक बारीक बट तिच्या कपाळावर अलगद विसावली होती. तिचा श्वास संथ आणि लयबद्ध होत होता… तिच्या चेहऱ्यावर एक निरागसतेची, पण अनुभवांची शांती होती… जणू सगळं काही पूर्ण झालं असावं!
शर्वाय हलकेच तिच्या बाजूला सरकला. त्याच्या मनात समाधानाचा एक तरंग जाणवला…
“हे क्षण… हे नातं… हे आपण…”
तो मनातच म्हणाला, “हे किती दिवसांचं स्वप्न होतं आणि आज ते प्रत्यक्ष माझ्यासमोर आहे.”
त्याने अलगद तिच्या कपाळावरून केस बाजूला केले. आराध्याने थोडीशी हालचाल केली… डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून हलकंसं हसली.
“गुड मॉर्निंग…” ती पुटपुटली.
शर्वायने तिचा हात हातात घेत, डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “आज खरंच शुभ सकाळ आहे आराध्या… आयुष्यात पहिल्यांदा पूर्णत्व वाटतंय.”
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याचा झाला विवाह, पण…
आराध्याचं हसू थोडं खोल झालं, ती जवळ आली. दोघांमध्ये शब्द नसले तरी भावनांनी भारलेलं मौन होतं. त्या सकाळचं आभाळ साक्षी होतं – दोन दुरावलेल्या, आसुसलेल्या आत्म्यांच्या नाजूक पण खऱ्या प्रेमाच्या मिलनाचं…
सकाळचं शांत वातावरण अजूनही कायम होतं. शर्वाय आणि आराध्या दोघ चहा घेत बसले होते, परंतु आज चहा फक्त चहा नव्हता, तो एक छोटासा, खास क्षण होता… ज्यामध्ये शब्द कमी, आणि भावनांचे प्रवाह जास्त होते.
आराध्याने कप उचलतच शर्वायला विचारलं, “तुम्ही कधीही असं शांत दिसत नाहीत… आज कसा झाला हा बदल?”
शर्वाय हलकेच हसला, आणि त्याने तिच्या डोळ्यांमध्ये पाहात उत्तर दिलं, “कधी कधी आपल्याला वाटतं की, काही गोष्टी खूप चांगल्या असतात आणि त्या सहजपणे मिळाल्या तर त्यातली शांती वेगळीच असते… आणि अशी सहज मिळालेली शांती अनुभवावी! कारण, असा क्षण कधी कसा अनुभवायला मिळेल सांगता येत नाही…”
आराध्या एक मिनिट थांबली आणि मग चहा प्यायला लागली. पण त्या नाजूक क्षणाचा अंत झालाच…
“आई…” मोबाइलवर नाव ब्लिंक होतं होतं…
त्याने कॉल उचलला. आनंदी कळकळीच्या आवाजात म्हणाली….
“शर्वाय, आज तू घरी येशील का? खूप दिवस झाले, तू परत आलास नाही… आणि आपली नीट भेटही झाली नाही. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आज संध्याकाळचं जेवण एकत्र घेऊया.”
शर्वाय गोड हसत म्हणाला… “आई… आज थोडं काम म्हणजे… ठीक आहे, येतो मी… तुझं म्हणणं नाकारू शकतो का मी?”
कॉल कट होताच त्याने आराध्याकडे पाहिलं. ती त्या क्षणी खिडकीजवळ उभी होती… चहा घेत… शांत.
शर्वाय : “आराध्या… आज मला घरी जावं लागणार आहे. आईचा कॉल आला. पण यावेळी मी एकटा जाणार नाही. तूही येणार आहेस माझ्यासोबत!”
आराध्या थोडी दचकली…
“मी?”
शर्वाय थेट तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, “हो… तू! तू आता माझी बायको आहेस आणि आज जे काही सुरू आहे, त्यापासून मी तुला लपवून ठेवू शकत नाही. तुला समोर उभं करायचं आहे — त्यांच्या नजरेत, त्यांच्या प्रश्नांसमोर… पण माझ्यासोबत.”
क्षणभर शांतता पसरली… पण मग आराध्या ने मूकपणे मान डोलावली.
शर्वाय चहा घेत म्हणाला, “आराध्या, आता आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वामधून भूमिकांमध्ये परतावं लागणार आहे.”
त्याने थोडं थांबून तिच्या डोळ्यांत बघत म्हटलं…
“बॉस आणि एम्प्लॉयी… समोरासमोर, पण असं वागावं लागेल, जसं काहीच घडलं नाही.”
आराध्या थोडं हसत, पण गंभीरतेने म्हणाली,
“हो शर्वाय सर, आपण जे ठरवलं त्यासाठी हे गरजेचं आहे. माधवचा बुरखा फाडायचा असेल, तर मलाही माझं आधीचं रूप परत घ्यावं लागेल.”
व्हिलामधूनच एकमेकांचा निरोप घेऊन ते वेगवेगळे बाहेर पडले…
0000
काही वेळानंतर नंदिनीच्या फ्लॅटचा दरवाजा उघडतो. आराध्या एका साध्या, परंतु कॉर्पोरेट लूक असलेल्या ड्रेसमध्ये पुन्हा तिच्या आधीच्या रूटिनमध्ये परतलेली होती…
नंदिनी हसत तिला मिठी मारते…
“Welcome back madam! आता खरी रणरागिणी उतरली आहे!”
आराध्याच्या डोळ्यात आत्मविश्वास तरळत होता. ती म्हणाली, “हो… आणि यावेळी कोणताही गुन्हा दबून जाणार नाही.”
0000
शर्वाय पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये परतला… कॉन्फरन्स कॉल्स, टीम ब्रीफिंग, बोर्ड मीटिंग्ज… नेहमीप्रमाणे त्याचं सारं शेड्युल पूर्ववत चालू झालं. पण शर्वायच्या नजरेत एक वेगळी चमक दिसत होती, जणू त्याचं व्यक्तिमत्व अजून धारदार झालं होतं!
कारण आता त्याचं मन एका भागीदारीने पूर्ण झालं होतं – आराध्याशी झालेल्या बंधनाने.
इथे माधव मात्र – दुसऱ्या बाजूला आपल्या खेळात अजून खोल जात होता… शर्वायच्या शांत भूमिकेवर तो आपले बेत आखत होता. पण त्याला हे ठाऊक नव्हतं… शांततेच्या पलीकडे वादळ तयार होतंय.
संध्याकाळची वेळ… आज वेळेत ऑफिसमधून शर्वाय बाहेर पडला. दत्ताला आधीच सांगितलं गेल्याप्रमाणे नंदिनीकडून आराध्याची कपड्याची बॅग मागवली गेली होती…
शर्वायच्या गाडीत दोघंही बसलेले. गाडी त्यांच्या मूळ वाड्याकडे धावत होती.
आराध्याने सुंदरसा साधा कुर्ता आणि ओढणी घेतलेली… सकाळीच व्हिलामध्ये तिने आपलं मंगळसूत्र काढून अगदी बारीक दोनच काळे मणी असलेली चेन घातली होती… तिच्या चेहऱ्यावर सौम्य तेज, पण डोळ्यांत विचारांचे तरंग दिसत होते…
तिच्या मनाची अवस्था ध्यानात घेऊन शर्वायने तिचा हात हातात घेतला…
“घाबरू नकोस. तू काही चूक करत नाहीस… उलट, तुझं अस्तित्वच माझी ताकद आहे. आणि म्हणून मला वाटलं आपण दोघांनी वाड्यावर एकत्र जावं. आजीलाही आनंद होईल…”
0000
जहागीरदार वाडा…
गेट ओलांडताच त्यांना आतून दिवे लागलेले, उदबत्तीचा सुगंध दरवळणारा हॉल, आणि दारात वाट बघत उभी आनंदी दिसली… तिने दोघांना पाहताच चेहऱ्यावर हसू आणलं… पण क्षणभरात तिची नजर आराध्यावर स्थिरावली… काहीसा प्रश्न अन् गोंधळ तिच्या चेहऱ्यावर त्या दोघांना जाणवला…
हेही वाचा – माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…
“आई तू बोलावलंस… तुला टाळणं शक्य नव्हतं… मीटिंगवरून तसाच परस्पर इथे आलो… ही नाही म्हणत होती यायला… पण हे घर आणि तुम्ही तिच्या आधीचे परिचयातले आहात, म्हणून सोबत चल म्हणून गळ घातली तिला…”
आनंदी शर्वायच्या बोलण्यावर हसली… सुमित्रा आजी दोघांना पाहून खूपच आनंदून गेल्या… त्यांना ओवाळण्यासाठी ताम्हण घेऊन आल्या…
आनंदी ने पुढे येत शर्वायच्या पायावर पाणी घातलं आणि तांब्या आराध्याच्या हातात दिला. ताम्हण घेण्यासाठी ती जशी वळली शर्वायने तांब्या घेऊन त्यातलं पाणी आराध्याच्या पायावर घातलं आणि तांब्या पुन्हा तिच्या हातात कोंबला… आणि तिला ‘माझ्यापाठी उभी रहा’ अशी खूण केली… त्यानुसार ती त्याच्या पाठी उभी राहताच आनंदीने त्याला ओवाळले.
आनंदी कौतुकाने…
“आज माझा मुलगा किती दिवसांनी घरी आलाय… आणि त्याच्या सोबत त्याचं सौभाग्य!”
(तिच्या आवाजात गोंधळ जाणवला) पण वास्तवात लग्न करून शर्वाय आराध्याला घेऊन येत, आपलं खरं सौभाग्यच आज वाड्यात घेऊन आला होता.
शर्वाय आणि आराध्याने एकाच वेळी घरात पाऊल टाकले… पुढे होत त्याने आनंदीला मिठी मारली…
“आई, आज काही गोष्टी मोकळ्या करायला आलोय…” तो म्हणाला.
शर्वाय वाड्यातील त्याच्या खोलीत गेला आणि आराध्याने मात्र यावेळी ‘आजीसोबत थांबते’ असं सांगितलं… कारण मागचा अनुभव फारच विचित्र होता तिचा.
शर्वायला फ्रेश होऊन आलेला पाहून आनंदीने मूळ विषयालाच हात घातला… न जाणो पुन्हा वेळ मिळेल न मिळेल!
“शर्वाय माधव काकाने तुझ्या करता अन्वीचं स्थळ आणलंय… अन्वी आराध्याची चुलत बहीण आहे. कुटुंब चांगलं आहे. बघ विचार करून…” आनंदीने चाचरतच म्हटलं.
शर्वायचं असं शांतपणे सगळं ऐकून घेणं आणि विरोध न करता हुंकार भरणं — आनंदीला थोडं आश्चर्यचकित करून गेलं. ती क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यांत आईच्या काळजीचं प्रतिबिंब दिसत होतं. तरी आनंदी उसनं हसून म्हणाली…
“काय गंमत आहे शर्वाय, इतका लगेच होकार दिलास? आधी असं काही म्हटलं असतं, तर तू थेट दरवाज्याबाहेर गेला असतास.”
शर्वाय थोडं हसत, थंडपणे म्हणाला… “कधी कधी काही गोष्टींना वेळ देता येत नाही आई. काही निर्णय घेतले जातात… लोकांसाठी, घरासाठी…”
ती त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. त्याच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं जाणवतं तिला, पण ती बोलत नाही, फक्त विचारते… “तू काही मुक्काम करणार नाहीस वाटतं?”


