बंगाल आणि दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातही होमिओपॅथी रुजण्यामागे काही विलक्षण व्यक्तींच्या कथा आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे विश्वेश्वर राय मंगेश कुलकर्णी. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, वयाच्या सुमारे सोळाव्या वर्षी ते गंभीर आजारी पडले. प्रचलित औषधोपचारांनी अपेक्षित फायदा झाला नाही. त्यावेळी फादर जेलोविट्झ नावाच्या एका जेसुइट धर्मगुरूंनी त्यांच्यावर होमिओपॅथिक उपचार केले आणि त्यातून त्यांना फायदा झाला, असे सांगितले जाते.
पण गोष्ट तिथे संपली नाही…
ज्या औषधांनी आपल्याला मदत केली ती नेमकी काय आहेत, याचे कुतूहल कुलकर्णींना स्वस्थ बसू देईना. त्यांनी फादर जेलोविट्झ यांच्याकडून होमिओपॅथी शिकण्यास सुरुवात केली, त्यांना कामात मदत केली आणि उपलब्ध होमिओपॅथिक ग्रंथांचा अभ्यास केला.
पुढे पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यातील नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत आले. इथेच त्यांच्या होमिओपॅथिक कार्याला व्यापक स्वरूप मिळाले आणि 1889मध्ये मुंबईत ‘Roy & Company’ची स्थापना झाली. Roy & Company ही केवळ औषधांची दुकान किंवा दवाखाना म्हणून मर्यादित राहिली नाही. पुढच्या पिढीत तिच्यामार्फत अमेरिकेतील Boericke & Tafel आणि जर्मनीतील Willmar Schwabe यासारख्या नामांकित संस्थांची होमिओपॅथिक औषधे भारतात उपलब्ध होऊ लागली. होमिओपॅथिक ग्रंथांच्या प्रकाशनातही या संस्थेने योगदान दिले.
कुलकर्णींच्या कार्याची व्याप्ती किती वाढली होती, याची कल्पना एका रंजक ऐतिहासिक उल्लेखावरून येते. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांनीही कुलकर्णींकडून उपचार घेतल्याची नोंद होमिओपॅथीच्या इतिहासात आढळते. एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रांताच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने एका भारतीय होमिओपॅथकडून उपचार घेणे ही निश्चितच लक्षवेधी घटना होती.
एका तरुणाच्या स्वतःच्या आजारातून सुरू झालेला होमिओपॅथीचा परिचय, एका जेसुइट धर्मगुरूकडून मिळालेले ज्ञान आणि त्यातून पुढे मुंबईत उभी राहिलेली Roy & Company — महाराष्ट्रातील होमिओपॅथीच्या प्रवासातील हे एक रंजक पान आहे.
हेही वाचा – Homeopathy : होमिओ आख्यान
भारताने होमिओपॅथी इतकी सहज आत्मसात का केली?
हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो. माझ्या मते, त्यामागचे एक कारण म्हणजे भारतीय संस्कृतीला पूर्वीपासून असलेली आध्यात्मिक आरोग्याची बैठक. भारताची प्राचीन वैद्यकीय परंपरा असलेला आयुर्वेद हा केवळ रोग आणि त्यावरील औषध एवढ्यापुरता मर्यादित नाही. आरोग्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी अधिक व्यापक आहे — शरीर, मन, आहार, आचार, दिनचर्या आणि माणसाच्या एकूण जीवनाचा विचार करणारी.
भारतीय संस्कृतीत आरोग्य म्हणजे केवळ शरीरात रोग नसणे, एवढीच त्याची व्याख्या कधीच राहिलेली नाही. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य यांचा परस्परसंबंध आपल्या विचारपरंपरेत फार पूर्वीपासून दिसतो.
भारतीयांची आध्यात्मिक बैठक आणि पाश्चात्त्यांची आध्यात्मिक बैठक यात निश्चितच मोठी तफावत आहे. तरीही मानवी विचारांच्या इतिहासात एक विलक्षण गोष्ट वारंवार दिसते — एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या संबंध नसलेल्या दोन संस्कृतींमध्ये जवळजवळ एकाच कालखंडात काही विद्वान स्वतंत्रपणे सारख्याच विचारांपर्यंत पोहोचलेले दिसतात. म्हणून जगातील प्रत्येक चांगल्या विचाराचे मूळ भारतातच शोधणे आणि तो भारतातूनच पाश्चात्त्य जगात गेला, असे मानणे मला योग्य वाटत नाही. त्याला ऐतिहासिक पुरावा नसेल, तर असा दावा करणे म्हणजे इतिहासापेक्षा आपल्या अभिमानाला अधिक महत्त्व देणे ठरेल.
त्यापेक्षा दुसरी शक्यता मला अधिक सयुक्तिक वाटते. भारतीय संस्कृतीत रुग्णाकडे पाहण्याची जी दृष्टी शतकानुशतके विकसित झाली होती, तिच्याशी काही बाबतींत साधर्म्य असणारी व्यक्तिकेंद्री दृष्टी होमिओपॅथीच्या रूपाने जेव्हा युरोपातून भारतात आली, तेव्हा ती भारतीय मनाला पूर्णपणे परकी वाटली नसावी.
याचा अर्थ आयुर्वेद आणि होमिओपॅथी एकच आहेत असा अजिबात नाही. त्यांचा इतिहास वेगळा आहे, मूलभूत तत्त्वे वेगळी आहेत आणि उपचारपद्धतीही वेगळ्या आहेत. पण माणसाकडे केवळ त्याच्या रोगाचे नाव म्हणून न पाहता, एक संपूर्ण व्यक्ती म्हणून पाहण्याचा प्रयत्न — हा धागा भारतीय मनाला परिचित होता. तो विचार भारतातून युरोपात गेला म्हणून दोन्हींत साधर्म्य आहे असे नव्हे; कदाचित दोन स्वतंत्र संस्कृतींनी दोन स्वतंत्र वाटांनी प्रवास करताना माणसाकडे पाहण्याच्या एका समान बिंदूला स्पर्श केला… आणि म्हणूनच परदेशातून आलेली होमिओपॅथी भारतीय मनाला इतकी परकी वाटली नसावी.
शेवटी एवढंच…
हा लेख होमिओपॅथीची बाजू मांडण्यासाठी किंवा तिचे समर्थन करण्यासाठी लिहिलेला नाही. होमिओपॅथी शास्त्र आहे की नाही, ती स्वीकारावी की नाकारावी, तिच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये — या वादात पडण्याचाही माझा इथे हेतू नाही. होमिओपॅथीवर आजवर अनेकांनी लिहिले आहे आणि यापुढेही अनेकजण लिहितील. कोणाला होमिओपॅथी पटवून देणे, तिचा प्रचार करणे किंवा तिच्यावर उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे, ही या लेखमालेची भूमिका नाही.
हेही वाचा – Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?
गेली सत्तावीस वर्षे या क्षेत्रात काम करताना मला जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या देशांतील, संस्कृतींतील आणि विचारधारांतील होमिओपॅथिक चिकित्सकांना भेटता आले. त्यांच्याशी चर्चा करता आली. होमिओपॅथीचा इतिहास, तिचा प्रवास आणि तिच्याशी जोडलेल्या अनेक व्यक्ती आणि घटनांचा अभ्यास करता आला. या प्रवासात मला अनेक अशा गोष्टी सापडल्या ज्या रंजक आहेत, काही आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत आणि अनेकांना कदाचित माहीतही नसतील. त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
मत पटवून देण्याचा नाही — माहिती सांगण्याचा…
वाद घालण्याचा नाही — इतिहासातील काही रंजक पाने उलगडण्याचा…
बाकी काय स्वीकारायचे, काय नाकारायचे आणि कोणते मत बनवायचे, हे प्रत्येक वाचकाने स्वतः ठरवावे.


