भाग – 14
सासुबाईंच्या सांगण्यावरून महेशराव उमाच्या माहेरी आलेले आहेत. सकाळी उमा लवकर उठली आणि थेट स्वयंपाकघराकडे गेली. आईचे काम चालले होते. तिने आईला सांगितले की, “मीही आज परत जाणार आहे. सकाळीच गेले तर, आजची सुट्टी पडणार नाही. इथूनच डबा घेऊन थेट शाळेतच जाईन.”
आई म्हणाली, “ठीक आहे.”
आईने स्वयंपाकाची तयारी सुरू केली. मामी मदतीला होत्याच. उमा आणि महेशरावांचे आवरून झाल्यावर ते दोघे सोबत निघाले. आईचा आणि मामीचा निरोप घेताना उमाला जड गेले. डोळे पाणावले. हात हलवत ती महेशरावांच्या मागे गाडीवर बसली.
महेशरावांनी एसटी स्टँडवर गाडी थांबवली आणि तिला बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर ते आपल्या गाडीवरून पुढे निघाले.
बसमध्ये बसल्या बसल्या उमाच्या मनात विचार आला, “आता आपण थेट शाळेत जाणार आहे, आत्या लेकाला विचारतीलच. मग आपण थेट शाळेतच गेलो, हे ऐकून त्या रागावतील का?”
हेही वाचा – उमाने दरवाज्यात महेशरावांना पाहिले अन्…
हा विचार मनात आला आणि यांचे उत्तरही तिच्याच मनाने दिले की, ‘मग आणखी एका दिवसाची सुट्टी घ्यावी लागली असती. त्याऐवजी हे बरे नव्हे का?’ अशीच उत्तरे देता आली पाहिजेत, असे तिने मनाला बजावले.
शाळेत मुलांमध्ये गेल्यावर तिचा वेळ कसा गेला, हे तिला समजलेही नाही. संध्याकाळी ती जेव्हा घरी आली, तेव्हा घरात कुणीच नव्हते. ती सगळ्या घरात एक चक्कर मारून आली. तेवढ्यात आत्या मागच्या परड्यातून घराकडे येताना दिसल्या आणि तिला हायसे वाटले. तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमंना! अशी आपली गत झाली आहे, असे उमाला वाटले आणि ती स्वतःशीच हसली.
समोर येऊन उभ्या राहिलेल्या आपल्या सासूच्या पाया पडण्यासाठी ती वाकू लागली तोच आत्याबाई ओरडल्या, “खाली वाकू नगंस. दोन जीवांची हायस. दिस भरत आलेती. यवडं पन् समजंना व्हय तुला?”
सासूच्या मोठ्या आवाजाने दचकलेली ती क्षणभर तशाच अवस्थेत थांबली. मग ताठ उभी राहून सासूबाईंकडे पाहू लागली.
हेही वाचा – उमा महेशरावांवर होती नाराज
“च्या ठीव की, माझ्या तोंडाकडं काय बघत बसलीयास?” या आत्याबाईंच्या बोलण्याने ती भानावर आली आणि चुलीजवळ बसत तिने चहाचे आधण चुलीवर चढवले. तेवढ्यात महेशराव पण आले. तिघांनी चहा घेतला.
“व्हय गं, तुझी तब्येत बरी हाय ना? तिकडं परत चक्कर बिक्कर आली न्हाय ना?” आत्यांनी विचारले.
“नाही. अगदी व्यवस्थित आहे तब्येत.” उमाने सांगितले.
रोजचे रूटीन चालू झाले. नवव्या महिन्यापर्यंत शाळेत जायचे, सुट्टी घ्यायची नाही, असे तिने ठरवले होते. शाळा गावातच होती, प्रवासाची कटकट नव्हती. तसेच रोज शाळेत जाण्याने शरीराला व्यायाम झाला असता. सासूबाईंचेही काही म्हणणे नव्हते. आताशा त्या तिला कामाबाबतीत थोडी सूट देत आहेत, हे तिच्या लक्षात आले होते.
आपण चुकीचा विचार करत होतो, अशा निर्णयाप्रत उमा पोहोचली. नववा महिना लागला. पहिला आठवडा गेला आणि तिने सुट्टीसाठी अर्ज केला. आता सुट्टी घेऊन आईकडे जायचे, असे तिने ठरवले होते.
क्रमशः
काय होईल पुढे? उमा बाळंतपणासाठी माहेरी जाऊ शकते का? की सासुबाई तिला सासरी ठेवून घेतात? पाहूया पुढील भागात…


