अध्याय तेरावा
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥32॥
अगा आकाश कें नाहीं । हें न रिघेचि कवणे ठायीं । परी कायिसेनि कहीं । गादिजेना जैसा ॥1119॥ तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । संगदोषें एकेंही । लिप्तु नव्हे ॥1120॥ पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥1121॥
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥33॥
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥1122॥ दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची । परो वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥1123॥ काष्ठांचां पोटीं । वन्हि असे किरीटी । परी काष्ठ नोहे या दिठी । पाहिजे गा ॥1124॥ अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैलाचि हाही डोळां । देखसी जरी ॥1125॥ हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटवी लोकु । नांवें नांवें ॥1126॥ एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुतें हें न पुसा । शंका नेघा ॥1127॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं
अर्थ
ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे (कोणत्याही वस्तूशी) लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहांमधे स्थित असला तरी, लिप्त होत नाही. ॥32॥
अर्जुना, आकाश कोठे नाही? व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही? परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही ॥1119॥ तसा आत्मा सर्वत्र देहात आहेच आहे. (परंतु) पाहा तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. ॥1120॥ येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे, असें वारंवार जाणावे ते हे की शररीस्थ आत्म्याला देहादिसंघातरहित असा ओळखावा. ॥1121॥
हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. ॥33॥
लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हालवितो पण लोहचुंबक हा लोखंड नाही, तसे क्षेत्र (देह) व क्षेत्रज्ञ (आत्मा) यांमधे अंतर आहे. ॥1122॥ दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर यात स्वभावत: अतिशय अंतर आहे. ॥1123॥ अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नि आहे, पण अग्नि काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. ॥1124॥ आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ, यात जो भेद आहे, तितकाच देह व आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पहाशील ॥1125॥ हे सर्व राहू दे, आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी (दररोज) त्रैलोक्य प्रकाशित करतो ॥1126॥ त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला (प्रतीतीला) प्रकाशक आहे. याउपर आता या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका. ॥1127॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा


