साधारणतः पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. राज या माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला. “मी पुढच्या रविवारी पुण्याला येणार आहे, आहेस का घरी? आणि 5-6 तास मला देऊ शकशील का?”
“मित्रा ये, मी पुढच्या रविवारी एकटाच आहे, पूर्ण दिवस देईन, तू नक्की ये.”
रात्रभर प्रवास करून राज सकाळी लवकरच आला. खूप वर्षांनंतर भेटल्यामुळे गप्पा रंगल्या. चहा पिताना राज म्हणाला, “आपल्या चार मित्रांकडे जायचेय.” राजने नाव, पत्ता आणि भेटीच्या वेळा दाखविल्या. “तुझी गाडी नको, मी मर्सिडीज बुक केलीय,” राजने सांगितले.
बरोबर दहा वाजता आम्ही अजयच्या घरी पोहोचलो. मर्सिडीजमधून आलेलो पाहून अजयने मोठ्या आदराने स्वागत केले. गप्पा मारता मारता पोहे खाऊन झाले.
“चहा की कॉफी?” अजयने विचारले.
“चहा चालेल, पण बिनसाखरेचा,” राज म्हणाला… “एक काळ होता जेव्हा पैसे नव्हते म्हणून बिनसाखरेचा चहा प्यायचो, आता बक्कळ पैसे आहेत, पण डॉक्टरांचे पथ्य आडवे येते.”
“अजय, फ्लॅट झकास आहे, कितीला घेतला?” मी विचारले.
“दीड कोटीला. एक कोटी माझ्याकडे होते, फक्त पन्नास लाख कर्ज काढले,” मोठ्या अभिमानाने अजय म्हणाला.
हेही वाचा – एआयच्या पलीकडे…
“मी मागच्याच महिन्यात तीन कोटीला प्रभात रोडला 3 बीएचके घेतला,” राज म्हणाला.
मी आणि अजयही आश्चर्यचकित झालो.
“सर्व कर्ज का?” अजयने विचारले.
“कर्ज नाही, सर्व माझेच पैसे आणि तेही चेकने दिले.”
मला राजचा अभिमान वाटला, पण अजयचा मात्र चेहरा पडला.
नंतर आम्ही विजयकडे पोहोचलो.
“पुढच्या आठवड्यात सिंगापूरला जातोय, आठ दिवस चैन करतो,” विजय म्हणाला.
“अरे व्वा, छानच,” राज म्हणाला. “सिंगापूर सुंदरच आहे. मी मागच्याच महिन्यात सिंगापूर, मलेशिया आणि हाँगकाँगचा तीन आठवड्यांचा दौरा केला. बिझनेस क्लासचा प्रवास, अजिबात थकायला झाले नाही. मजा आली.”
राजची प्रगती ऐकून माझी छाती अभिमानाने फुलली, विजयच्या मात्र आनंदावर विरजण पडले.
पुढची भेट दिनेशला. खूपच खुशीत होता तो…
“कालच नवी इनोव्हा घेतली, चला आपण एक चक्कर मारून येऊ,” दिनेशने आग्रह केला.
“दिनेश, गुड चॉईस, खूपच कम्फर्टेबल गाडी. माझ्याकडे दोन इनोव्हा आहेत.”
राजची मजबूत आर्थिक स्थिती समजून दिनेश मात्र हिरमुसला.
नंतर आम्ही महेशकडे पोहोचलो. छानसा बंगला, लहानसे पण नीटनेटके गार्डन. गार्डनमध्येच आम्ही गरम भजी खाल्ली.
“लेका, मस्त बंगला,” मी कौतुकाने म्हणालो.
“पुढच्याच चौकात माझा याच्यापेक्षा दुपटीने मोठा बंगला आहे. रिकामा ठेवण्यापेक्षा एका मित्राला राहायला दिला, दोन वर्षांसाठी,” राजने सांगितले.
गरम भजी खाता खाता महेश गार पडला.
मी आणि राज माझ्या घरी परतलो.
“माझे गुगल पे चालत नाही, नेटवर्कचा इश्यू आहे, मर्सिडीजचे 4000 रुपये पे करतोस का?” राजने विचारले. मी पटकन पैसे पे केले.
“मित्रा, तुझे 4000 रुपये मी परत करतो, प्लीज मला थोडी मुदत दे. 1000 प्रमाणे चार महिन्यांत परत करतो.”
“राज, काय फिरकी घेतोस यार?” मी चक्रावून म्हणालो.
“मित्रा, मी खाऊन-पिऊन सुखी आहे, परंतु तुला वाटलो तेवढा मोठा नाही. आपल्या मित्रांसमोर मी फक्त बढाया मारल्यात.”
“राज, पण का? कशासाठी?” मी विचारले.
“त्यांचा बदला घेण्यासाठी,” राज शांतपणे म्हणाला.
“राज, मला काहीही समजले नाही, नीट सांगशील का?” मी म्हणालो.
“मित्रा, ऐक. मी, आई, बाबा आणि लहान बहीण अशी आमची फॅमिली. वडील मजुरी करायचे. कसेबसे आम्ही दिवस काढायचो. त्यात माझे आणि बहिणीचे शिक्षण. तेव्हा अजय, विजय, दिनेश आणि महेश मोठ्या बंगल्यात राहायचे, आमच्या मात्र दोन लहानशा खोल्या होत्या.
नववीत असताना माझी शाळेची फी भरायला पैसे नव्हते. बाबांनी अजयच्या वडिलांकडे 200 रुपये उसने मागितले होते. त्यांना बाबांचा कसला तरी राग होता. पैसे देण्याआधी कुत्र्यासारखे पाय चाटायला लावले त्यांनी माझ्या बाबांना. अजूनही तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही…
हेही वाचा – माणुसकी…
माझी दहावीची परीक्षा सुरू होती. शेवटचे तीन पेपर बाकी होते आणि बिल भरले नाही म्हणून आमचे वीजेचे कनेक्शन काढले. मी विजयकडे 100 रुपये मागायला गेलो. तो म्हणाला, “पैसे देतो, पण मी आज एकटाच आहे. रात्री बहिणीला पाठव. तू लाइट लावून रात्री अभ्यास कर आणि मी लाइट बंद करून…’
पुढचे सांगवत नाही मित्रा. मी रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून परीक्षा दिली.
क्रिकेट खेळताना दिनेशने त्याच्या कारचा आरसा फोडला आणि नाव मात्र माझे सांगितले. त्याचे वडील मला मारत असताना माझे बाबा मला सोडवायला आले होते. त्या राक्षसाने माझ्या बाबांनाही मारले. पाठ सुजली होती बाबांची.
आईला अपघात झाला तेव्हा महेशच्या वडिलांनी आईचे मंगळसूत्र घेऊन 500 रुपये दिले होते. आई गेली तेव्हा पूजा करताना आणि अंत्यदर्शनापुरते मंगळसूत्र द्यायलाही त्यांनी नकार दिला. शेवटी मित्रा, तुझ्या आईने मंगळसूत्र विकत आणले आणि अंत्यसंस्काराचा खर्चसुद्धा केला.
मला या सर्वांपेक्षा मोठं होता आलं नाही, म्हणून खोटं बोलून, बढाया मारून मी त्यांना दुखावलं आणि त्यांचा बदला घेतला. आठवतं ना? कसे चेहरे पडले होते त्यांचे.”
हे सर्व ऐकताना माझे डोळे पाणावले.
मी राजला माझा बिझनेस पार्टनर बनविले. त्याच्या कल्पकतेमुळे आमची खूप प्रगती झाली. राज आता खरोखरच मोठा झालाय. त्याच्याजवळ गाडी, बंगला, सर्व काही आहे. एवढंच काय तर, पुढच्या आठवड्यात त्याला मुख्यमंत्र्यांकडून “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मिळणार आहे. त्या कार्यक्रमाचे व्हीआयपी पास अजय, विजय, दिनेश आणि महेशला द्यायला मी आणि राज, त्याने नुकत्याच घेतलेल्या नव्या मर्सिडीजमधून निघालो होतो.
राजला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला. सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. अजय, विजय, दिनेश आणि महेश मात्र नि:शब्द बसले होते. मला जाणवलं — राजच्या चेहऱ्यावरचं समाधान पुरस्कार मिळाल्याचं नव्हतं; वर्षानुवर्षे सहन केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याचं होतं. मलाही समाधान होतं, कारण अपमानामुळे माझा मित्र मोडला नव्हता; उलट तो घडला होता.


