गोकुळातल्या नंद आणि यशोदामातेकडे वाढणारे वासूदेव-देवकीचे बाळ, श्रीकृष्ण आपल्या लीलांनी सर्वांचे मन मोहून घेत होते. यशोदेला तर ते बाळ मिळताच आभाळ ठेंगणे झाले. त्याच्या वाढत्या वयासोबत त्या बाळाचे कोडकौतुक करता करता तिला दिवस पुरेनासा झाला. दही, दूध, लोणी तर त्याचे अत्यंत प्रिय पदार्थ त्यासोबत विविध प्रकारचे पोह्यांचे प्रकार, शिरा, सातू, रवा-बेसनाचे लाडू हेपण त्याला प्रियच! या गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थही त्याच्या आवडीचेच! कधीतरी एखाद्या गोपगोपिकेच्या घरी त्याचे असले चमचमीत पदार्थ खाणे होतच असे, घनुले हा तसाच प्रकार! बालगोपाळांना तो आवडतो म्हणून कणकेपासून केला जाणारा आणि चविष्ट असा प्रकार त्या काळात केला जात असावा, असं मला वाटत. आमच्या विदर्भात हे तिखट, मसालेदार रसरशीत चवदार ‘घनुले’ खास करून जन्माष्टमीच्या पारण्याला नैवेद्यात असतात, सुंठवडा, गोपालकाला, विविध प्रकारचे लाडू, खीर, करंज्या, पापड्या यासोबत हे घनुले आणि गावरान हरभऱ्याची उसळ हेपण नैवेद्याच्या थाळीत स्थानापन्न असतात. घननिळ्या कृष्णाला आवडणारा हा पदार्थ म्हणून त्याचे नाव घनुले पडले असावे, असही मला वाटतं बरं! नाहीतर, गोल गोल चक्रीसारख्या घनघडीसारखे आकार असणारे म्हणूनही त्यांना घनुले म्हटले जात असावे! ते काहीही असो परंतु हा पदार्थ आहे मोठा चविष्ट! श्रावणातल्या जन्माष्टमीच्या दिवसात बरसणाऱ्या पावसात हे रसदार, मसालेदार घनुले खायला असे काही मस्त लागतात की, कढईभर कधी संपतात त्याचा पत्ताच लागत नाही. चला तर मग जाणून घेऊ याची रेसिपी!
साहित्य
- गव्हाचे पीठ – दोन वाट्या
- बेसन – अर्धा वाटी (ऐच्छिक आहे, मी वापरते कारण चव तर चांगली येतेच शिवाय घनुले मऊसर शिजतात.)
- दही – दोन ते तीन चमचे
- आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट – चवीनुसार
- हळद – एक चमचा
- लाल तिखट – दोन ते तीन चमचे
- तीळ – एक टीस्पून
- ओवा – एक टीस्पून
- गरम मसाला – एक चमचा
- कांदा – एक (बारीक चिरेला)
- टोमॅटो – बारीक चिरलेला एक (ऐच्छिक)
- हिंग – एक छोटा चमचा
- तेल – एक ते दीड पळी
- मीठ – चवीनुसार
- पाणी – दोन ग्लास
- कढीपत्ता – पाच ते सहा पाने
- कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा
कृती
- गव्हाच्या पीठात अर्धी वाटी बेसन टाकून त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही, आले- लसूण- हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा तिखट, तीळ, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा. त्याला वरून तेलाचा हात लावून दहा मिनिटे मुरत ठेवावा.
- फोडणीसाठी जरा पसरट आणि खोल असे भांडे घेऊन त्यामधे दीड पळी तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून हिंग टाकावा.
- नंतर त्यामध्ये कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत परतावा.
- कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये आले- लसूण- हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकून तीपण थोडी परतावी.
- नंतर त्यात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून त्यात दोन ग्लास पाणी टाकावे.
- हा रस्सा पातळसरच असतो, तरीपण त्याला घट्टपणा हवा असेल तर थोड्या बेसनाची पाण्यात पेस्ट करून ती या फोडणीत सोडावी.
- चवीनुसार मीठ टाकावे आणि रस्सा मध्यम आचेवर उकळत ठेवावा.
- आता भिजवलेल्या पीठाचे लांबट पातळसर तुकडे करून ते गोल गोल फिरवून त्यांना चकली किंवा जिलेबीसारखा आकार द्यावा आणि त्या सर्व जिलेब्या त्या मसाल्याच्या उकळत्या पाण्यात सोडाव्यात. वरून कोथिंबीर घालावी.
- भांड्यावर झाकण अर्धवट उघडे ठेवून हे सर्व घनुले शिजवून घ्यावेत. दहा ते बारा मिनिटांनी हाताने एखादा घनुला दाबून मऊ शिजला की नाही ते पहावा. नरम झाला असेल तर घनुले शिजले, असं समजावे आणि गॅस बंद करावा.
- वरुन परत एकदा कोथिंबीर टाकून या मसाल्यांनी परिपूर्ण अशा पाणीदार घनुल्यांचा पावसाळी हवेत आनंद घ्यावा!
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


