दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 31 ऑगस्ट 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 09 भाद्रपद शके 1948; तिथि : तृतीया 08:51; नक्षत्र : रेवती 27:23;
- योग : गंड 25:50; करण : बव 20:19;
- सूर्य : सिंह; चंद्र : मीन 27:23; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08:51
श्रावणी सोमवार
शिवपूजन, शिवामूठ : मूग
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कादंबरीकार आणि कवयित्री अमृता प्रीतम
टीम अवांतर
पंजाबी साहित्यविश्वातील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 रोजी गुजरानवाला येथे झाला. हे ठिकाण आताच्या पाकिस्तानातील पंजाबमध्ये आहे. त्यांचे वडील कर्तार सिंग हे कवी, ब्रज भाषेचे विद्वान आणि साहित्यिक नियतकालिकाचे संपादक होते. अमृता अकरा वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे घरची जबाबदारी अचानकपणे अमृता यांच्यावर आली.
या जबाबदाऱ्या आणि आईच्या मृत्यूनंतर आलेल्या एकाकीपणामुळे, त्यांनी लहान वयातच लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह अमृत लहरान वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे 1936 मध्ये प्रकाशित झाला. 1936 ते 1943 या कालावधीत त्यांचे अर्धा डझन कवितासंग्रह प्रकाशित झाले.
हेही वाचा – अरे देवा…
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी प्रीतम सिंग यांच्याशी लग्न केले. ते संपादक होते.एक रोमँटिक कवयित्री म्हणून अमृता यांचा प्रवास सुरू झाला असला तरी लवकरच त्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंटचा भाग बनल्या. याचा परिणाम त्यांच्या 1944 साली प्रकाशित झालेल्या ‘लोक पीड’ या संग्रहात दिसून आला. याशिवाय काही काळ लाहोरमधील एका रेडिओ स्टेशनवरही त्यांनी काम केले.
1947 मध्ये भारताच्या फाळणीमुळे वयाच्या 28 व्या वर्षी अमृता प्रीतम निर्वासित झाल्या. त्यावेळी गर्भवती असलेल्या अमृता लाहोर सोडून नवी दिल्लीला स्थलांतरित झाल्या. डेहराडूनहून दिल्ली असा प्रवास करत असताना त्यांनी ” अज्ज आखां वारिस शाह नु” या कविता एका कागदाच्या तुकड्यावर लिहिली. ही कविता फाळणीच्या भीषणतेची सर्वात हृदयस्पर्शी आठवण तर बनलीच शिवाय अमृता यांना मोठी प्रसिद्धी देखील मिळाली.
अमृता प्रीतम 1961 पर्यंत दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओच्या पंजाबी सेवेत कार्यरत होत्या. 1960 मध्ये घटस्फोटानंतर त्यांचे लेखन अधिक स्त्रीवादी झाले. त्यांच्या अनेक कथा आणि कविता त्यांच्या वैवाहिक जीवनातील दुःखी अनुभवांवर आधारित होत्या. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये कविता, कथा, चरित्रे, निबंध, पंजाबी लोकगीतांचा संग्रह आणि आत्मचरित्र अशा 100 हून अधिक पुस्तकांचा समावेश आहे, ज्यांचे अनेक भारतीय आणि इंग्रजी, फ्रेंच, डॅनिश , जपानी, मँडरिन आणि इतर भाषांमध्ये भाषांतर झाले आहे, ज्यात त्यांच्या ‘ब्लॅक रोझ’ आणि ‘रसिदी तिकीट’ या आत्मचरित्रात्मक साहित्यकृतींचा समावेश आहे.
कवी साहिर लुधियानवी यांच्यावरील एकतर्फी प्रेमाचे चित्रण त्यांच्या ‘ रसिदी तिकीट’ या आत्मचरित्रात केले आहे. पुढे कलाकार आणि लेखक इंदरजीत इमरोज यांच्यासोबत अमृता यांनी आयुष्याची शेवटची चाळीस वर्षे घालवली. त्यांचे एकत्र जीवन ‘अमृता इमरोज: अ लव्ह स्टोरी’ या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आले आहे. ‘पिंजर’ ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. यात भारताच्या फाळणीच्या वेळची स्त्रीची व समाजाची शोकांतिका मांडली आहे. पुढे या कादंबरीवर चित्रपटही बनला.
1956 साली ‘सुनेहादे’ या साहित्यकृतीसाठी त्यांना पहिला पंजाब रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या होत्या. अमृता प्रीतम यांना 1982 मध्ये ‘कागज ते कॅनव्हास’ या साहित्यकृतीसाठी भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याशिवाय 1969 साली पद्मश्री आणि 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2004 मध्येच साहित्य अकादमीची फेलोशिप देखील मिळाली. त्यांनी डी.लिट. पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ आणि विश्व भारती यासह अनेक विद्यापीठांकडून डी.लिट्. सारख्या मानद पदव्या देखील त्यांना प्रदान करण्यात आल्या. अनेक सन्मानांमध्ये बल्गेरिया आणि फ्रान्सकडून मिळालेल्या पुरस्कारांचाही समावेश होता.
1986 – 92 या काळात त्यांची राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस पाकिस्तानच्या पंजाबी अकादमीने देखील त्यांना सन्मानित केले. 31 ऑक्टोबर 2005 रोजी या मनस्वी कवयित्रीचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आशा आणि आनंद यांची भेट घेऊन येऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित बातमी मिळू शकते. अविवाहित जातकांचे विवाह ठरू शकतात. कुटुंब आणि नातेवाईकांचा पाठिंबा तुम्हाला बळ देईल. अनावश्यक वाद टाळा. विद्यार्थ्यांसाठीही हा दिलासादायक दिवस ठरेल; मानसिक ताण कमी होईल, त्यामुळे अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल.
वृषभ – तुम्हाला आज थोडी अस्वस्थता जाणवेल. तुमची मेहनत आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. वैयक्तिक आर्थिक बाबी सर्वांना सांगत बसू नका. शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या पैलूंचा काळजीपूर्वक विचार करा. कुटुंबाबरोबर बाहेर जाण्याचा किंवा एका छोट्या पार्टीचा बेत आखल्याने तुमचा मूड सुधारू शकतो.
मिथुन – स्वतःच्या कष्टाचे फळ अखेर दिसू लागले आहे असे तुम्हाला आज वाटू शकते. यशाची चिन्हे प्रबळ आहेत. आवडत्या नातेवाईकाला भेटल्याने आनंद आणि भावनिक समाधान मिळू शकते. संततीच्या आनंदासाठी एखादी आवश्यक किंवा आवडती वस्तू खरेदी केली जाऊ शकते. खर्चात थोडी वाढ होऊ शकते, परंतु तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या गोड शब्दांवर लगेच विश्वास ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही.
कर्क – काही बाबी आज थोड्या गुंतागुंतीच्या वाटू शकतात, त्यामुळे घाई करण्याऐवजी शहाणपणाने पुढे जा. कौटुंबिक बाबींमध्ये मतभेद असल्यास, त्यावर सौहार्दाने चर्चा करणे उत्तम राहील. मालमत्ता किंवा कर्जाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक प्रगती दिसून येऊ शकते. शासकीय कामातील विलंब निराशाजनक असू शकतो, परंतु संयम ठेवल्यास त्यातून मार्ग काढण्यास मदत होईल. जुने कर्ज कमी करण्यासाठी उचललेली पावले यशस्वी होऊ शकतात.
सिंह – आर्थिक आघाडीवर नशीब आज तुमच्या बाजूने असल्याचे दिसते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक भागीदारासोबत भविष्यातील नवीन योजनांवर चर्चा केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आज स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, परंतु त्याने लगेच उत्साही होऊ नका. आर्थिक लाभाचा आनंद दिवसभर दिसून येईल.
कन्या – एखादे मोठे स्वप्न केवळ स्वप्नच न राहता, ते पूर्ण करण्याच्या दिशेने आज पहिले पाऊल टाकू शकाल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला खूप समाधान मिळेल. सध्या प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. आज आई-वडिलांचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. संततीच्या भविष्यासंबंधी घेतलेला निर्णय तुम्हाला नंतर अभिमान वाटायला लावेल. सकारात्मक मानसिकता ठेवा, कारण आज तुमची विचारशक्तीच तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते.
तुळ – आज स्वतःच्या विवेकबुद्धीचा आणि दक्षतेचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. काही विरोधक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला परिस्थिती तुमच्या बाजूने वळवण्यास मदत करेल. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने आनंद मिळू शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी एक नवीन मार्ग खुला होऊ शकतो. समाजकार्य किंवा सेवा-संबंधित कामासाठी मिळणाऱ्या मान्यतेमुळे तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक – आज तुमच्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु संभाषणात स्नेह कायम ठेवल्यास गोष्टी चिघळणार नाहीत. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खास असू शकतो. कठोर परिश्रमामुळे एक मोठी ऑर्डर किंवा चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. वाढत्या खर्चावर लक्ष ठेवा, कारण त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
हेही वाचा – कोलांटी उडी
धनु – तुमचा प्रभाव इतरांवर पडत असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येईल. यामुळे तुमच्याबद्दलचा आदरही वाढू शकतो. घरातील एखादी शुभ घटना आनंदी वातावरण निर्माण करू शकते. एखाद्या शासकीय कामात प्रगती होण्याची संधी मिळेल. दूर राहणाऱ्या संततीच्या आठवणीने तुम्ही भावुक होऊ शकता. त्यांच्या करिअरसंबंधीचा एक महत्त्वाचा निर्णय त्यांच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. याशिवाय आज घेतलेल्या एखाद्या कौटुंबिक निर्णयाचा दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मकर – तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याची आज शक्यता आहे. तुमची कार्यनिष्ठा वरिष्ठांना प्रभावित करेल. समाजसेवेत किंवा एखाद्या चांगल्या कार्यात योगदान दिल्याने तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. भूतकाळातील एखादी चूक आज तुमच्यासाठी धडा ठरू शकते. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे स्वतःच्या शब्दांबाबत आणि कृतींबाबत सावध रहा. आर्थिक व्यवहारांमध्येही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
कुंभ – आज तुमच्याकडे एखादी मोठी संधी चालून येण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. नातेवाईकांशी किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु कुटुंबातील सदस्य तुमची परिस्थिती समजून घेतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील. मैत्रिणी किंवा सहकारी महिलांमार्फत व्यवसायात फायदा होण्याचे संकेत आहेत. प्रवास करताना तुम्हाला अत्यंत उपयुक्त माहिती मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.
मीन – द्विधा स्थितीमुळे आज निर्णय घेणे थोडे कठीण होऊ शकते. एखादा महत्त्वाचा सौदा शेवटच्या क्षणी अडकला, तर चिंता करण्याऐवजी संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी काही सहकाऱ्यांच्या वागण्यामुळे तणाव वाढू शकतो, मात्र यावर घाईने प्रतिक्रिया देणे टाळा. नोकरीच्या नवीन संधी आशेचा किरण घेऊन येऊ शकतात. जोडीदारासोबत अनावश्यक वाद टाळणे उत्तम राहील. स्वतःच्या आरोग्याकडे, विशेषतः आहाराकडे लक्ष द्या, कारण अगदी लहानसा निष्काळजीपणासुद्धा मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.


