|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या पत्रिकेतील ग्रह कुठल्या भावात आहेत आणि ते कसे फळ देणार आहेत, हे थोडे समजून घेतले तर निम्मे काम तिथेच होईल. इथे आपण इतर कुठलेही ग्रहांचे युतीयोग, दृष्टी वगैरे न बघता फक्त ग्रहांचे घराच्या दृष्टीने असलेले कारकत्व बघत आहोत.
मनाचा कारक चंद्र, शुभ असेल तर मन कायम उत्साहित उल्हासित असेल. असे करू… तसे करू… म्हणत अनेक गोष्टीत आपण रस घेणार. आईशी उत्तम संवाद आणि सौख्य. आई आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असेल. मन शुद्ध तर, सद्गुरुप्राप्ती सुद्धा निश्चित. मनात काळेबेरे असेल तर, परमेश्वराचे अधिष्ठान होणारच नाही. चंद्रासारखी सात्विकता, कोमल भावना आणि प्रेमळ व्यक्ती सर्वांनाच प्रिय असते. अशा व्यक्ती घराची सजावट उत्तम करतात. चंद्र हा आपल्याला आपल्या बेडरूममध्ये पाहायला मिळतो, कारण तिथे शांत झोप आहे. तसेच, चतुर्थ भाव सुखस्थान आहे, आपल्या पत्रिकेतील. तिथे चंद्र उत्तम फलित देणार. चंद्र शुक्र बेडरूममध्ये प्रणय खुलवतील.
शुक्र हा हार्मनी, सुखासीनता, वैभव, डामडौल, चकाचक, रंगसंगतीची जाण, घरातील बैठकीचे ठिकाण तेथील सजावट, रांगोळी याकडे जातीने लक्ष देणारा असतो. चंद्र शुक्र मंगळ हे स्वयंपाकघर सुद्धा सांभाळतात.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क
सूर्याचा मानमरातब, आब अधिक. त्यामुळे बैठकीची खोली आणि आपले कार्यालय इथे जातीने हजर असतो. गुरूचे प्राबल्य मुख्यत्वे पूजाघर, ध्यानाची खोली, नामस्मरण, घरातील धार्मिक गोष्टी यात असते. घरातील रीतीरिवाज, मुलांच्यावर होणारे संस्कार, पूजापाठ म्हणजे गुरू. घरातील शिस्त रवीकडे. शुक्र चंद्र घरातील सौंदर्य जपतील तर, गुरू घरातील प्रसन्नता, शांतता आणि सद्भावना. गुरूमुळेच घराला घरपण येते, म्हटले तर वावगे ठरू नये.
बुध हा घरातील लहान मुले, एकमेकांसोबत असलेला संवाद, आर्थिक चर्चा, आपले कार्यालय इथे प्रभाव टाकतो. संवाद जिथे नसतो त्या घरात चोवीस तास टीव्ही सुरू असतो. एकमेकांशी असलेला संवाद माणसांना मनाने एकत्र बांधून ठेवतो.
मंगळ घरातील विद्युत उपकरणे, स्वयंपाकघर – आपल्या एकंदरीत उर्जेवर राज्य करणारा आहे. कुठलीही कृती झटपट करणारा, आवेग, शरीरातील immunity सांभाळणारा आणि वेळीच आरेला कारेचा पवित्रा घेणारा आहे. तामसी असल्यामुळे तिखट खाणे आणि राग, भावना उफाळून येणे अशी लक्षणे दाखवणारा. त्यामुळे अशा व्यक्तींनी जोर बैठका, जिममध्ये जाणे, धावणे, व्यायाम याकडे अधिक लक्ष दिले, तर मंगळाची ऊर्जा योग्य ठिकाणी कार्यान्वित होईल आणि घरातील शांतता अबाधित राहील.
शनी सगळे कायद्याच्या चौकटीत करणार, भविष्यातील आर्थिक तरतूद, त्याचे नियोजन, घरातील वयस्कर व्यक्ती, आपले कार्यालय याकडे शनीचे अधिक लक्ष असते. शनीला एकांत प्रिय आहे.
हेही वाचा – केतू म्हणजे निर्व्याज भक्ती
केतू हा सगळ्यात असून कशातच नाही, अशा वृत्तीने राहणारा, धार्मिक, वाचन, ध्यान, मेडिटेशन यातून आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारा.
राहू आपल्या कामासाठी तन, मन झोकून देणारा, पॅशन (Passion) असणारा, प्रचंड संशोधक वृत्ती त्यामुळे वाचन, रिसर्च… घरातील बाथरूम वगैरे याकडे स्वच्छता असेल तर राहू त्रासदायक होत नाही.
आपल्या वास्तुत आपल्याच पत्रिकेतील ग्रह कसे कार्य करतात आणि त्यांची परिभाषा याचा काहीतरी अंदाज नक्कीच येईल. यातील ग्रह कमी-अधिक फळ देत असतील, तर तेही कसे? हा अभ्यास आता अभ्यासकांनी करायला हरकत नाही, सहज जमेल. जेवणाच्या पंक्तीला सर्व ग्रह स्थानापन्न झाले, तर काय काय गंमती जमती होतील, त्याचाही अभ्यास करा म्हणजे ग्रह आपल्याला किती समजले आहेत, तेही कळेल.


