वडील वारले त्यावेळी सचिन फक्त पंधरा वर्षांचा होता. पाठोपाठ आईसुद्धा देवाघरी गेली. 13 वर्षांच्या रंजनाची आणि 11 वर्षांच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली. नोकरी करता-करता त्याने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. फॅक्टरीत मूळ मालक गेल्यानंतर त्याच्या मुलांनी ताबा घेतला आणि सचिनचा पगार वेळेवर मिळणे बंद झालं. सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं. वडिलांनी ते एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं होतं. शब्दाला जागण्याचा तो काळ होता. त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही. पण मित्राच्या निधनानंतर त्याचे घरभाडे येणे बंद झालं. मग सुरू झाल्या कोर्टकचऱ्या!
हायकोर्टात सचिन खटला जिंकला. सचिनने एका बिल्डरला गाठून ते घर दीड कोटीला विकले. बहिणींना कोर्टात यावं लागू नये, म्हणून केलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने घराची विक्री केली. मात्र त्याने बहिणींना गृहित धरण्याची फार मोठी चूक केली होती. बहिणींना फोन करून त्याने या विक्रीची माहिती दिली आणि प्रत्येकीला वीस-वीस लाख देण्याचं कबूलही केलं. या सौद्याची खबर रंजना आणि अनिताच्या वकील मैत्रिणीला लागली आणि तिने प्रत्येकी 50 लाख रुपये मागण्याचा सल्ला दिला. तिच्या बोलण्यात येऊन दोघींनी भावाला नोटीस पाठवली. ती पाहून सचिन आणि त्याची बायको सुचिता हबकलेच.
नोटिशीचे एक हजार रुपये देऊन रंजना आणि अनिता घरी आल्या. सासू त्यांची वाटच बघत होती. सचिनला नोटीस पाठवल्याचं कळल्यावर तिचा चेहरा आनंदाने फुलला. रूममध्ये आल्यावर रंजना अनिताला म्हणाली,
“अनू, मला सारखं वाटतंय की, आपलं काहीतरी चुकतंय…”
“हो गं! मलाही तसंच वाटतंय. आपला दादा तसा नाहीये. आपल्याला फसवणार नाही तो!”
तिने असं म्हटल्याबरोबर रंजनाचे डोळे भरून आले… “खूप काही केलंय गं त्याने आपल्यासाठी…”
“हो खरंय. पण जाऊ दे रडू नकोस. तो देईल तेवढे पैसे घेऊन आपण शांत रहायचं… कोर्टात काही जायचं नाही.”
ते ऐकल्यावर रंजना जरा शांत झाली.
“नोटीस मिळाल्यावर तो दिवाळीला बोलावेल का गं आपल्याला?”
“तो बोलावेल, पण वहिनी त्याला तसं करू देणार नाही.”
“मग आपल्या मुलांचं काय करायचं? मामाकडे जायचं म्हणून आतापासून नाचताहेत ती! तुला तर माहीत आहे सचुमामा त्यांचा किती आवडता आहे तो!”
अनिताला काय बोलावं ते सुचेना. ती एवढंच म्हणाली,
“अजून दिवाळीला पंधरा दिवस आहेत. तोपर्यंत निघेल काहीतरी मार्ग…”
हेही वाचा – अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध
0000
दोघींच्या नवऱ्यांना नोटीसची बातमी कळली. दोघांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तसे ते स्वभावाने चांगले होते. दोघांना चांगल्या नोकऱ्या होत्या, उत्तम पगार होते. पैशांची कसलीही कमतरता नव्हती. पण आयता पैसा मिळाला तर कुणाला नको असतो? तोही 50 लाख! रंजनाच्या नवऱ्याने लगेच ब्रोकरला फोन करुन लोणावळ्याला फार्महाऊस बघायला सांगितलं. अनिताच्या नवऱ्याने पुण्याला नवीन फ्लॅटची चौकशी सुरू केली. दोघींच्या सासूला मात्र या एक कोटी रुपयाचं काय करावं, ते सुचेना! तिने आपल्या लेकीला, मीनलला फोन लावला. मीनल गावातच रहात होती आणि रंजना, अनिताची बालपणीची मैत्रीण होती. विशेष म्हणजे, दोघींची लग्नं तिनेच जुळवली होती. आईने फोनवरून सचिनची बातमी दिल्यावर ती स्तब्ध झाली…
“या एक कोटी रुपयांचं काय करायचं, हे ठरवायला मी संध्याकाळी घरी येते,” असं म्हणून तिने फोन ठेवला.
संध्याकाळी ती माहेरी गेली तेव्हा तिचे दोन्ही भाऊ घरी आले होते. रंजना आणि अनिता किचनमध्ये काहीतरी करत होत्या.
“बरं झालं बाई तू आलीस. एवढ्या एक कोटीचं काय करायचं, तेच मला सुचत नाहीये!” मीनलची आई म्हणजेच रंजनाची सासू तिला म्हणाली.
“आई, रंजना आणि अनिता कुठे आहेत? त्यांना बोलव बरं… मला त्यांच्याशी बोलायचंय…”
“अगं त्यांना कशाला बोलवतेस? आपण आपलं ठरवू ना!”
“नाही आई, पैसे आपल्याला नाही, त्यांना मिळणार आहेत. मग त्यांच्याशी बोलायला नको? अगोदर मला त्यांच्याशी बोलू दे. मग मी तुम्हा सर्वांशी बोलते.”
तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून रंजना आणि अनिताच बाहेर आल्या.
“रंजू, अनू आई सांगत होती की, तुम्ही सचिन दादाला वकीलामार्फत नोटीस पाठवली म्हणे!”
“हो का?” रंजूने विचारलं
“फार अन्याय केला तुमच्यावर सचिनदादाने नाही? तुम्ही दोघी इतक्या गरीब आहात की, तुमचे खायचे वांधे झालेत. त्यामुळे तो देत असलेले वीस लाखही तुम्हाला कमी पडलेत…”
तिच्या त्या उपरोधिक बोलण्यावर दोघींनी चमकून तिच्याकडे पाहिलं
“असं का म्हणते मीनू? आमचा तो हक्कच आहे,” अनू म्हणाली.
“अनू कुणाकडे हक्क मागताय तुम्ही? ज्याने 15-16 वयाचा असल्यापासून तुमची जबाबदारी स्वीकारली, कुठे कुठे मजुरी करून, स्वतः हालअपेष्टा सोसून ज्याने तुमच्या सर्व हौशी पुरवल्या, ज्याने तुमचे आईवडील होऊन सांभाळ केला, तुम्ही लहान असताना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तुम्हाला भरवलं, ज्याने तुमची आजारपणं सोसली… त्याच्याकडे तुम्ही हक्क मागताय? काय नाही केलं त्याने तुमच्यासाठी? तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, स्वतःच्या वाढत्या वयाचा विचार न करता तुमची लग्नं लावून दिली. ज्या घराचा ताबा मिळवण्यासाठी त्याने पंधरा वर्षं रक्ताचं पाणी केलं, त्या घरावर तुम्ही हक्क सांगताय? सांगा काय केलंत तुम्ही त्या घरासाठी? कधी तुम्ही म्हटलंत की, दादा तू राहू दे आम्ही जातो कोर्टात? किंवा वकिलाला पैसे तू देऊ नको आम्ही देतो, असं म्हटलं? कधी म्हंटलंत की, खटल्याचं टेन्शन तू घेऊ नको आम्ही घेतो? सांगा ना? तुम्ही काय सांगणार म्हणा, कारण तुम्ही काहीच केलं नाही त्या घरासाठी! आणि आता आयत्या पीठावर रेघोट्या ओढताय. सचिनदादा तुम्हाला प्रेमाने वीस लाख देतोय, तेसुद्धा तुम्हाला कमी पडायला लागले नाही का?”
तिच्या या उत्तेजीत आवाजाने रंजना, अनिताचे नवरेही बाहेर आले.
“मीनू, हे काय बोलतेय तू? मी तुला कशासाठी बोलवलंय आणि तू उलटंच काहीतरी बरळतेय… आणि तुला माहीत नसेल आजकाल कायदाच असा आहे की, मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळालाच पाहिजे,” तिची आई रागाने म्हणाली.
“बरं झालं आई तू मला कायदा सांगितला. हा बंगला माझ्या वडिलांचं वडिलोपार्जित घर पाडून तुम्ही बांधलाय. ज्यावेळी तुम्ही ते घर पाडलं, त्यावेळी या घराची किंमत तीन कोटी होती. याचाच अर्थ असा की, मला माझा एक कोटीचा हिस्सा मिळायला हवा.”
मग भावांकडे वळून ती म्हणाली, “दिले तुम्ही मला एक कोटी रुपये? चला हरकत नाही आता द्या मला एक कोटी रुपये!”
तिच्या या पवित्र्याने तिची आई आणि भाऊ अवाक झाले. रंजना आणि अनिताही तिच्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहू लागल्या. हा विचार त्यांच्याही मनात आजपर्यंत आला नव्हता.
“अगं, पण मीनू आम्ही अजून या घरात रहातोय. घर विकलं की, देऊ तुला तुझा हिस्सा,” रंजनाचा नवरा तिला समजावत म्हणाला.
“ठीक आहे. माझ्या हिश्श्याच्या जमिनीवर तुम्ही माझी परवानगी न घेता घर बांधलं. शिवाय, त्याचं भाडंही तुम्ही मला देत नाही. याचा अर्थ, तुम्ही माझी जमीन बळकावली आहे. तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करून तुम्हाला जेलमध्ये टाकते की नाही, बघाच!” मीनल रागाने म्हणाली.
“काय माझा हिस्सा, माझा हिस्सा लावलंय मीनू? तुला काय कमी आहे? गाडी बंगला सगळंच तर आहे तुझ्याकडे!” अनिताचा नवरा म्हणाला
“बघितलं रंजू आणि अनू! या माझ्या भावांनी माझ्यासाठी कधीच काही केलं नाही. हे घरही त्यांना आयतं मिळालंय. तुमच्या भावासारख्या कोर्टाच्या वाऱ्या नाही कराव्या लागल्या त्यांना. तरीसुद्धा माझा हिस्सा देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. आताही ते टाळाटाळ करताहेत. हा खरा अन्याय आहे. मी तुमच्या पाया पडते. सचिनदादावरची नोटीस मागे घ्या. तो देत असलेले वीस लाखही घेऊ नका. खूप सोसलंय त्याने. आता सुखाचे दिवस आले तर त्याला त्रास देऊ नका… आणि आई मला तुमचं काहीही नको. पण तू आणि तुझ्या मुलांनी तुझ्या सुनांच्या पैशावर डोळा ठेवणं बंद करावं. लक्षात ठेवा, तुम्ही जर त्यांना याबद्दल काही म्हटलंत, तर मी सुद्धा माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात जायला कमी करणार नाही. चला येते मी.”
रंजना आणि अनिताचे डोळे भरून आले होते. नणंदेकडे पहात रंजना म्हणाली,
“खूप मोठं मनावरचं ओझं उतरवलसं तू मीनल!”
दोघा बहिणींना जवळ घेऊन म्हणाली,
“अगं वेड्यांनो, सचिनदादा तुमचाच नाही माझासुद्धा भाऊ आहे. लाखात एक भाऊ आहे आपला. त्याला अंतर देऊ नका…”
0000
रंजना आणि अनिताने पाठवलेली नोटीस घेऊन सचिन वकिलाच्या केबिनमध्ये शिरला. ती नोटीस वाचून वकील म्हणाले,
“आपण या नोटिशीला उत्तर देऊ. तुम्ही आजपर्यंत बहिणींसाठी आणि या घराचा ताबा मिळवण्यासाठी काय काय केलं त्याचा उल्लेख करू. भावनात्मक आवाहन केलं की, बहिणी भावनावश होऊन तुमच्यावर केस करणार नाहीत, असं मला वाटतं. तरीही त्यांनी केस केली तर आपल्याला काही पर्याय रहाणार नाही.”
“वकीलसाहेब बहिणींसाठी आणि घरासाठी मी जे काही केलं, ते माझं कर्तव्यच होतं… आणि तुम्हाला खरं सांगू, या कोर्टकचेऱ्यांनी मी थकून गेलोय. त्यातून बहिणींशी मी लढू शकत नाही. माझं फार प्रेम आहे हो त्यांच्यावर. तुम्हाला जे उत्तर पाठवायचं आहे ते पाठवा. या भाऊबीजेला मी त्यांना पन्नास पन्नास लाखाचे चेक देऊन मोकळा होणार आहे.”
“अहो, इतकी घाई काय करताय? बघूया ना तुमच्या बहिणींमध्ये किती शक्ती आणि धाडस आहे, खटले चालवायचं! काही वर्षांनंतर त्यांनाच कंटाळा येईल आणि करतील कॉम्प्रमाइज…”
“पण तोपर्यंत आमचे संबंध तुटतील त्याचं काय?”
“हा विचार तुमच्या बहिणींनी करायला नको का?”
“त्या लहान आहेत वकीलसाहेब, त्यातून सासरचंही प्रेशर असणारच त्यांच्यावर. नकोच ते. त्यापेक्षा पन्नास लाख देणं योग्य राहील, असं मला वाटतं.”
वकीलाने खांदे उडवले, “जशी तुमची मर्जी.”
सचिन जसा बाहेर पडला. वकिलाने रंजनाच्या वकीलाला फोन लावला…
“मॅडम तुमचा प्लॅन फेल झाला. आमच्या अशिलाने माघार घेतली. तुमच्या अशिलांना पन्नास लाख द्यायला तो तयार झाला आहे.”
“अरे राम, काय माणूस आहे! वाटलं होतं चांगली 8-10 वर्षं केस चालेल. शेवटी कॉम्प्रमाइज होईल, तोपर्यंत आपली कमाई होत राहील. फारच कमजोर निघाला हो तुमचा पक्षकार!”
“जाऊद्या आता नोटिशीच्या फीमध्येच समाधान माना,” वकील हसून म्हणाले.
0000
दिवाळी आटोपली. आज भाऊबीजेचा दिवस. अनिता, रंजनाला अपेक्षा नसतानाही दिवाळी सुरू होण्यापूर्वीच सचिनने आपल्या बहिणी आणि मेव्हण्यांना फोनवर रीतसर आमंत्रण दिलं होतं. आज सकाळपासून तो त्यांची वाटच पहात होता. गाड्या थांबल्याचा आवाज आला, तसा तो शर्ट घालून बाहेर आला. घरात शिरल्याबरोबर रंजना आणि अनिताची मुलं लाडक्या सचिनमामाला बिलगली. सगळी सोफ्यावर बसल्यावर सुचिताने सगळ्यांना पाणी आणलं. ते पिऊन झाल्यावर रंजनाने अनिताला इशारा केला. अनिताने पर्समधून एक पाकीट काढलं.
“सचूदादा हे घे.”
ते पाकीट पाहून सचिनच्या ह्रदयात धस्स झाल. सुचिताच्या हातातला ग्लासांचा ट्रे थरथरला.
“काय आहे त्यात?” कापऱ्या स्वरात त्याने विचारलं.
“वाच ना. कळेलच तुला,” रंजना म्हणाली.
थरथरत्या हाताने त्याने त्या पाकिटातून कागद बाहेर काढला. फक्त दहा पंधरा ओळीची ती नोटीस होती… त्यात लिहिलं होतं –
“या नोटिशीद्वारे आपणास कळविण्यात येते की, यापूर्वी पाठवलेली नोटीस रद्दबातल समजावी. तसेच आम्ही, खालील सही करणार, खालील उल्लेख केलेल्या वडिलोपार्जित मिळकतीवरील आमचा हक्क स्वखुशीने, कोणत्याही दडपणाखाली न येता सोडून देत आहोत. तसेच, या मिळकतीच्या विक्रीपोटी मिळालेल्या रकमेतील आमचा हिस्साही आम्ही आमच्या भावाकरिता राजीखुशीने सोडून देत आहोत. यापुढे आमची त्याबद्दल कोणतीही तक्रार राहणार नाही.”
हेही वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?
बाकी खाली आणखी मजकूर होता, पण डोळे भरून आल्यामुळे सचिनला ते दिसेनासं झालं. पत्र बाजूला करून त्याने बहिणींकडे पाहिलं. त्याचे भरलेले डोळे पाहून रंजनाला रहावलं नाही, तिने उठून भावाला मिठी मारली. पाठोपाठ अनिताही उठून भावाला बिलगली. दोघीही बहिणी हमसून हमसून रडू लागल्या, सचिनच्या डोळ्यांतूनही घळाघळा अश्रू वहात होते. अखेर प्रेम जिंकलं होतं. व्यवहार आणि कायद्याची हार झाली होती. सचिनला तसं रडताना पाहून अनिताची चार वर्षाची मुलगी मामाच्या पायाला बिलगली आणि मुसमुसत रडू लागली. तिच्या बालमिठीच्या स्पर्शाने भानावर येऊन सचिनने तिला वर उचलून घेतलं. तिनेही लगेच त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.
संध्याकाळी दोघी बहिणींनी भावाला ओवाळल्यावर सचिनने दोघींच्या तबकात दोन दोन चेक टाकले
“यात एक पन्नास लाखाचा आणि एक वीस लाखाचा चेक आहे.तुम्हाला जो हवा असेल तो घ्या.”
रंजनाने चारही चेक हातात घेऊन त्याचे तुकडे केले आणि ते डस्टबिनमध्ये टाकून दिले.
“बस हं दादा, आता परत आम्हाला रडवू नकोस. आम्हाला फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय.”
“अगं, भाऊबीजेला मी तुम्हाला काही देण्याऐवजी तुम्हीच मला ‘बहीणबीज’ दिलीये.”
“नाही दादा… तू आमच्यासाठी जे केलंय त्याची भरपाई सात जन्मांत होणार नाही. आमचं चुकलं आम्हाला माफ कर.”


