कैरीचे लोणचे
साहित्य
- कैऱ्या – एक किलो
- मोहरीची डाळ – दीड वाटी
- लाल तिखट – पाव वाटी
- मेथी – तीन चमचे
- हिंग – दोन चमचे
- हळद – दोन चमचे
- गूळ – कैरीच्या फोडीइतका
- मीठ – चवीनुसार
- तेल – एक वाटी
कृती
- कैरीची साल पूर्णपणे काढून बारीक फोडी कराव्यात.
- पाणी घालून मोहरीची डाळ अगदी बारीक वाटावी आणि दोन वाट्या पाणी घालून रवीने घुसळावी. मोहरीचा दर्प नाकात चढेपर्यंत घुसळावी.
- नंतर त्यात हळद, तिखट, मीठ (चवीनुसार), गूळ (बारीक चिरून) आणि मेथीची (तळून) पूड घालावी आणि एकत्र कालवून त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात.
- नंतर मोहरी, हळद आणि हिंग घालून, एक वाटी तेलाची फोडणी करून, ती गार झाल्यावर लोणच्यावर घालावी.
- हे लोणचे आंबट-गोड चवीमुळे स्वादिष्ट लागते आणि मोहरीच्या दर्पामुळे सुखद वाटते.
- हे लोणचे बरेच दिवस टिकते.
भोकरांचे लोणचे
साहित्य
- कच्ची भोकरे – एक किलो
- कैरीच्या सालासकट फोडी – अर्धा किलो
- मेथीचा जाडसर रवा – एक वाटी
- हिंग – तीन ते चार चमचे
- मोहरीची डाळ – अर्धी वाटी
- हळद – चार चमचे
- लाल तिखट – एक वाटी
- तेल – आवश्यकतेनुसार
कृती
- भोकरे जरा ठेचून, त्यांना मीठ लावून, त्यातील बिया आणि चिकट पदार्थ असतो, तो काढून टाकावा. मीठ लावल्याने चिकटपणा कमी होतो.
- कैरीच्या सालीसकट फोडी कराव्यात.
- मेथीचा रवा तेलात बदामी रंगावर परतून घ्यावा.
- मग त्या तेलात हिंग, मोहरी आणि हळद घालून, फोडणी करून, ती गार झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ आणि मेथीचा रवा घालून एकत्र कालवावे.
- हे मिश्रण भरल्या वांग्याप्रमाणे भोकरांत भरावे. नंतर भरलेली भोकरे आणि कैरीच्या फोडी एकत्र करून, बरणीत भरून, त्यावर लोणचे चांगले बुडेपर्यंत तेल घालून ठेवावे.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


