अध्याय तेरावा
तांबुलें ओठ राऊं । हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । बोल जेणें ॥563॥ तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसीहि ॥564॥ कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं । तैसी नुठील कांहीं केली । जीभचि हे ॥565॥ कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं । तैसा आपत्ति तोंडीं । दाढियेसी ॥566॥ आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें । तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥567॥ वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥568॥ तृणाचें बुजवणें । आंदोळे वारेगुणें । तैसें येईल कांपणें । सर्वांगासी ॥569॥ पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी । बरवेपणा बागडी । नाचविजैल ॥570॥ मळमूत्रद्वारें । होऊनि ठाकती खोंकरें । नवसियें होती इतरें । माझां निधनीं ॥571॥ देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु । सोयरियां उबगु । येईल माझा ॥572॥ स्त्रियां म्हणती विवसी । बाळें जाती मूर्च्छी । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥573॥ उभळीचा उजगरा । सेजेया साइलिया घरा । शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांतें हा ॥574॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला
अर्थ
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने (हल्ली तारुण्यावस्थेत) रंगवितो व ज्यातील दात हसतांना दाखवितो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो, ॥563॥ त्याच तोंडाला (उद्या म्हातारपणी) कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसकट उखडून जातील. ॥564॥ शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही. ॥565॥ माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. ॥566॥ आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. ॥567॥ वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे (पुष्ट असलेले) शरीर म्हातार्या माकडासारखे बेडौल होईल. ॥568॥ गवताचे बुजगावणे जसे वार्याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. ॥569॥ पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्या वेळी (म्हातारपणी) सोंगासारखा नाचविला जाईल. (म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन) देहाची आकृति सोंगासारखी होईल. ॥570॥ मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. ॥571॥ अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील. मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्याधायर्या लोकांस माझा कंटाळा येईल. ॥572॥ बायका मला पिशाच्च म्हणतील व मुले मला भिऊन मूर्छित होतील. फार काय सांगावे! मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन. ॥573॥ शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्या जागरणामुळे ‘हा म्हातारा पुष्कळांना शिणवील’ असे ते म्हणतील. ॥574॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय


