Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्कूटी, बायको आणि मी…
    ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेAugust 1, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, बायकोचे स्कूटी शिकणे, बायकोच्या स्कूटीचा अपघात, स्कूटी शिकण्याची जिद्द, स्कूटी शिकणारी बायको, स्कूटी चालवण्याचे ट्रेनिंग, स्कूटी शिकणारी बायको, स्कूटी आणि बायकोबरोबर फरफट
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट…  संध्याकाळी घरी आल्यावर मी पेपर चाळत असताना, हिने अचानक बॉम्ब टाकला.

    “ऐक ना, माझ्या मैत्रिणीला तिची स्कूटी विकायची आहे. आपण घेऊया?”

    “आपल्याला कशाला? एक आहे ना माझी बाइक? डोंबिवलीत कशाला लागतेय?” माझे लगोलग प्रतिप्रश्न, येणाऱ्या संकटाला हुलकावणी देण्यासाठी.

    “माझ्या मैत्रिणी चालवतात. मला पण वाटतंय शिकावी असं. घेऊया ना, प्लीज.”

    बाल, राज आणि स्त्री या तीन हट्टांपैकी,  एका हट्टाचं भूत आज माझ्या मानगुटीवर बसू पहात होतं. “बघूया,” म्हणत वेळ मारून नेली, पण आता हे भूत सहजी शांत होणाऱ्यातलं नव्हतं, याची मला मनोमन जाणीव झाली.

    तस्सच झालं अगदी. भुणभूण काही संपेचना. मी तिला म्हणालो, “तुला साधी सायकल चालवता येत नाही, तू स्कूटी कशी चालवणार? आणि कोण शिकवणारे तुला?”

    “तुला ना, नरपटी लावायची जन्मजात खोड आहे. मी काही नवं करायचं म्हंटलं की, याने अडथळे आणलेच. शाळेत तुला नन्नाचा पाढाच तेवढा शिकवलाय का रे?” वगैरे बोलून माझ्या खनपटीला बसून, तिने माझा होकार मिळवला. माझ्याकडून, ती चालवायला शिकवायचं पण कबूल करून घेतलं. माझ्या सत्व परीक्षेची ती तर जणू सुरुवात होती.

    दोन दिवसांतच, स्कूटी आमच्या दाराशी येऊन उभी राहिली. लाडाची, पहिलीवहिली गाडी, म्हणून तिला हारतुरे घातले गेले, औक्षण केलं गेलं आणि आमची झाशीची राणी सज्ज झाली स्वार व्हायला! गाडी चालवणं, हे मागे बसून मिरवत जाण्याइतकं सोप्पं नसतं हे उमगायला जास्त वेळ नाही लागला तिला आणि मलासुद्धा…

    माझं शिकवणं आणि तिचं शिकणं, दोन्हींच्या कसोटीचा काळ आता सुरू होणार होता. पत्रिकेतले ग्रह तपासून पहायला हवे होते. आधी तिचा शिकावू परवाना काढून घेतला. तो आल्यावर, उद्यापासून सुरुवात, असं ठरलं. उद्याची चाहूल लागून, आजच माझ्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला.

    हेही वाचा – शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    दुसऱ्या दिवशी, सोसायटीच्या पार्किंगमध्ये थोडीशी तोंड ओळख करून दिली स्कूटीची… हा ब्रेक. डावीकडचा मागच्या चाकाचा, उजवीकडचा पुढच्या चाकाचा… हे दिव्याचं बटण, हा हॉर्न, हे इंडिकेटर… हे स्कूटर सुरू करण्याचं बटण आणि हा स्टँड… अशी सगळी मौलिक माहिती दिली. हा एक्सीलेटर (accelerator); हा पिळला की गाडी पळायला लागते आणि वेग कमी जास्त करता येतो, हे पण सांगितलं.

    ही सगळी theory नीट घोटून घेतली आणि मग आम्ही प्रात्यक्षिक करायला सिद्ध झालो. मी, ही अशी शिकवणी पहिल्यांदाच घेत होतो. कुठून सुरुवात करावी, हेच कळत नव्हतं. शेवटी, आमच्याच जवळचं नेहरू मैदान गाठलं.

    तिला म्हणालो, “तू पुढे बस. मी बसतो मागे आणि करू सुरुवात, नव्या प्रयोगाला.”

    बसली बया पुढे. मी घाबरतच मागे मांड ठोकली आणि गाडी सुरू केली. सावकाश, मैदानाला एक प्रदक्षिणा घातली. नवाच, थोडासा रोमॅंटिक अनुभव घेत. हवाहवासा!! तिची भीड चेपायला हवी म्हणून अशा तीन-चार प्रदक्षिणा घातल्या. मग पुढच्या प्रदक्षिणेच्या वेळेस हात सैल केले. ताबा तिच्याकडे दिला थोडासा आणि पुन्हा दोन प्रदक्षिणा घातल्या. आपल्याला हे जमू शकेल, असं तिला वाटायला लागलं आणि पहिल्या दिवशीची शिकवणी संपली!

    मग हे रोजचंच आन्हिक. रात्री जेवण झालं, की आमची वरात मैदानात. असं चांगलं आठवडाभर झाल्यावर ती म्हणाली,  “आता रस्त्यावर चालवूया.”

    माझे प्राण कंठाशी. कुठेतरी ठोकली गाडी तर, केवढ्याला पडेल, या शंकेने मला निद्रानाश. पण ‘ये तो होना ही था’, म्हणत रस्त्यावर चालवायला न्यायचं कबूल केलं. आता ती थोडं थोडं चालवायला शिकली होती. आत्मविश्वास दिसत होता चेहेऱ्यावर. गाडी घेऊन मग आम्ही एमआयडीसीमधल्या एका मोकळ्या रस्त्यावर गेलो. मी उतरलो,  गाडी तिच्या ताब्यात दिली. ती ओढणी बांधून सज्ज झाली आणि मला म्हणाली, “माझ्या मागून ये, मी चालवते हळूहळू.”

    दोन्ही बाजूला पाय तरंगत ठेवून गाडी चालवायला सुरूवात केली. मी मागे तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करीत होतो आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक, घोडी उधळावी तशी ती स्कूटी उधळली आणि मला न जुमानता, फेफरं भरल्यासारखी अस्ताव्यस्त धावायला लागली…

    हा विचित्र प्रकार पाहून, ती किंचाळायला लागली आणि आता काय करावं, हे मलाही सुचेना. माझी फरफट त्या गाडीमागे, पण मला कुठली ती आवरायला!! सुटली माझ्या ताब्यातून आणि समोरच्या गटाराच्या दिशेने धावायला लागली. आता काय होणार, या आशंकेने, “ब्रेक दाब, ब्रेक दाब” असं बोंबलत मी धावत सुटलो तिच्या मागे आणि माझ्या नशिबाने तिने ब्रेक दाबला. ब्रेक दाबताक्षणी गाडी थडथडाट करत थांबली आणि मग वरच्या स्वारीसकट आडवी झाली.

    हे सगळं ऐकून आणि पाहून आजूबाजूची तमाम जनता गाडीभोवती गोळा झाली आणि घाम पुसत मी तिथे पोहोचेपर्यंत, गाडी स्टँडला आणि वरची बाई थरथरत, मुसमुसत तिच्या शेजारी उभी…

    एका बाईने पाणी आणलं, कुठे लागलंय का याची विचारपूस केली… पण नशिबाने, थोडंसं खरचटण्यापलीकडे जास्त हानी झालेली दिसत नव्हती, गाडीचीही. मी गाडी तपासत असताना, “तुला माझ्यापेक्षा गाडीचीच काळजी जास्त,” हा टोमणा पण मी ऐकून घेतला, निमूट.

    “तुझ्यामुळे झालं सगळं. तुला धरायला काय झालं होतं नीट,” वगैरे बोल लावून झाल्यावर, “मी आता शिकणारच नाही गाडी जा. फिटली हौस माझी…” म्हणताना, तेरड्याचा रंग तीन दिवसांत उतरलेला मला जाणवू लागला. तरी बरं, शिकायची तिचीच इच्छा होती.

    आता ती काही परत गाडी चालवेल असं मला वाटेना. शेवटी, न राहवून आठवड्याभरानंतर मी तिला म्हणालो, “एकदा आडवी झालीस आणि सगळं संपलं? न पडता शिकणारे या जगात कोणीच नाहीत. शेवटी तूही शेंदाड शिपाईणच निघालीस.”

    नागिणीलाच डिवचलं होतं जणू मी.

    “चल, स्वीकारलं मी तुझं आव्हान. उद्यापासून परत सुरू करू.”

    आणि मग आमची शिकवणी परत एकदा सुरू झाली. त्या दिवशी तिचं काय चुकलं, वेग हळूहळू कसा वाढवायचा वगैरे तिला समजावून सांगितलं आणि मग परत त्याच रस्त्यावर आम्ही पोहोचलो… आम्हाला बघताच आजुबाजूचे लोक सुरक्षित अंतरावर गेले आणि मी गाडी तिच्या ताब्यात दिली.

    सावकाश तोल सावरत, ती एकटी शंभर दीडशे मीटर गेली आणि थांबली. विजयी मुद्रेनं तिने माझ्याकडे वळून स्मित केलं आणि मी अंगठा उंचावून तिला दाद दिली. तिला म्हंटलं, ‘जा पुढे बिनधास्त, यशस्वी भवं!’

    तशीच थोडी पुढे गेली आणि गाडी वळवून परत माझ्यापर्यंत घेऊन आली. काहीतरी मिळवल्याचं अतूट समाधान तिच्या चर्येवर झळकत होतं. पुढचं काम सोप्पं होतं. पंधरा-वीस दिवस कसून सराव केला आणि मग ती बऱ्यापैकी स्वावलंबी झाली. स्कूटर घेऊन घराच्या जवळपास वावरायला लागली, धीर चेपला तिचा.

    आता आत्मविश्वास वाढला आणि एके दिवशी मला म्हणाली, “आज फडके रोड वर घेऊन जाते गाडी.” मी आवंढा गिळला आणि तिला परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

    हेही वाचा – देखल्या देवा…

    “तू नको येऊस, माझी मी समर्थ आहे” म्हणत, खरंच फडके रोडला जाऊन आली ती, स्वावलंबी स्त्री. विजयी मुद्रेनं, खरेदीच्या पिशव्या माझ्यासमोर ठेवत ती म्हणाली, “जमलं मला.”

    आनंद झिरपत होता नुसता शब्दांमधून आणि चेहेऱ्यावरून. आमूलाग्र बदल तिच्यात, जाणवण्याइतपत. थोडीशी घाबरट आणि बुजरी ती, एवढं मोठं धाडस करू शकेल, यावर खरंच माझा विश्वास बसत नव्हता, पण सत्य होतं ते. फडके रोडची सैर करून आल्यावर त्याचं सेलिब्रेशन आम्ही मॉडर्न कॅफेमध्ये जाऊन केलं, तिच्या आवडीचं भोजन करून, हे सांगणे न लगे.

    परवा, ती स्टेशनवर घ्यायला आली होती मला, स्कूटी घेऊन. डौलात येणारी ती बघून, स्मृती चाळवल्या गेल्या माझ्या आणि ते जुने दिवस झरझर सरकत गेले नजरेसमोरून.

    “त्यावेळी ओरडले तुला, पण तुझ्यामुळेच मी शिकले,” हे ऐकतो तिच्या तोंडून मी वारंवार आणि या बदलाला माझाही थोडासा हातभार लागलाय, हे जाणवून मूठभर मांस चढतं माझ्या अंगावर. मुलगी शिकली, प्रगती झाली हे जाणवून!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026 ललित

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026

    भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस…

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 514
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.