चातुर्मास सुरू झाला आणि आजीची गडबड सुरू झाली. सणांसाठीचे नियोजन तिला वेगळे करावे लागत नव्हते. ते तर तिच्यासाठी सरावाचे होते. तिच्या बरोबरीने तिची सून सगळे करत होती. आजीच्या हाताखाली छान तयार झाली होती ती सुद्धा. आतातर दोन वर्षांपूर्वी नातवाचे लग्न झाल्यामुळे नातसून प्रिया पण होती. मागचे वर्ष तर सगळे पहिले सण या नावाखाली साजरे झाले. आताची परिस्थिती मात्र वेगळी होती. आजी आणि सासू यांची गडबड बघून प्रियाला समजतच नव्हते की, काय करावे? वेळ नाही, सुटी नाही ही कारणं कशी सांगावी तेच समजत नव्हते! त्यातच, मुळात का वेळ वाया घालवतात या दोघी? असेपण वाटत होते.
आजीला प्रियाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लक्षात आला. आजीने तसे प्रियाला विचारले, पण प्रिया ‘काही नाही’ म्हणून गप्प बसली. खूप विचारल्यावर प्रियाने विचारले की, “हे सगळे दिवस का साजरे करायचे?” आजीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले…
प्रिया – “मग काय तर, हे दिवस साजरे करायचे म्हणजे सुटी काढणं आलं… त्यात सध्या सगळेजण वेगळ्याच मूडमध्ये असतात. काय तर म्हणे ‘अलग vibes’“
आजी – “पण तुला काय झालं? त्यांचे Vibes त्यांना एन्जॉय करू दे.”
प्रिया – “नाही ते सगळ्यांनाच मग कामाला लावतात. आज काय हा दिवस, मग असं आवरून या… आज काय हा दिवस, मग असा खाऊ घेऊन या… कशाला ना उगीचच हे दिवस साजरे करायचे?”
आजीला खरंतर दिवस साजरे करतो हे वाक्यच खटकलं होतं, पण अजून काही बोललो तर आगीत तेल ओतल्यासारखे! म्हणून कोणत्याही सणाचा उल्लेख न करता आजी म्हणाली, ”तुम्ही पण करतातच ना ‘डेज’ साजरे… मग हे पण तर तसेच आहे. फक्त त्याला वेगवेगळ्या सणांची नावे दिली आहेत की!”
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
प्रियाला ते पटतच नव्हते, ”आजी आम्ही डेज साजरे करतो, पण ते स्वत: पुरते. त्यामुळे कोणाला अडचणीत आणत नाहीत.”
आजी म्हणाली, ”बरं हरकत नाही. पण तुला एक गोष्ट सांगते ऐकणार का?”
वय कितीही असो, गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. त्याप्रमाणे चिडलेली जरी असली तरी प्रिया गोष्ट ऐकायला तयार झाली.
आजी गोष्ट सांगू लागली,
एका गावात एक मोठे एकत्र कुटुंब राहत होते. आजोबा, आजी, आई-वडील, काका-काकू, भाऊ-बहीण आणि नातवंडे — सगळे एकाच घरात आनंदाने राहत होते. पण काळ बदलला. प्रत्येकजण शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या शहरांत गेला. फोनवर बोलणे होत असे, पण भेटी कमी झाल्या.
एके दिवशी आजीने सगळ्यांना एक पत्र लिहिले. त्यात तिने लिहिले, “सण-उत्सव येतात, जातात; पण माणसांनी एकमेकांसाठी वेळ काढला नाही, तर नाती हळूहळू दूर जातात. म्हणून, दरवर्षी आपण एका दिवशी तरी सगळे एकत्र भेटूया.”
आजीचे पत्र वाचून सगळ्यांच्या मनाला स्पर्श झाला. त्या वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब गावात जमले. बहिणींनी भावांना राखी बांधली, आजीने नातवंडांना आशीर्वाद दिला… सगळ्यांनी एकत्र जेवण केले, जुन्या आठवणी काढल्या आणि भरपूर हसले.
त्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण होते. छोट्या आरवने आजोबांना विचारले, “आजोबा, आपण असे दिवस का साजरे करतो?”
आजोबा हसून म्हणाले, “बाळा, प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्यावर नाती टिकतात. पण रोजच्या धावपळीत आपण ते व्यक्त करायला विसरतो. म्हणून असे दिवस आपल्याला आठवण करून देतात की, आपली माणसं हीच आपली खरी संपत्ती आहेत.”
त्या दिवसापासून त्या कुटुंबाने दरवर्षी किमान एक दिवस सर्वांनी एकत्र भेटण्याचा नियम केला. भेटवस्तूंपेक्षा त्यांनी एकमेकांना वेळ, प्रेम आणि आपुलकी दिली. त्यामुळे त्यांचे नाते वर्षानुवर्षे अधिक घट्ट होत गेले.
गोष्ट ऐकताना प्रियाला खूप गहिवरून आले आणि ती आजीला बिलगली.
आजी म्हणाली, ”बाळा, आपले सण म्हणजेच आपली संस्कृती. ती आपल्याला एकत्र रहायला, एकत्र विचार करायला शिकवते. तुमच्या भाषेत सांगायचे तर हे टीमवर्क आहे. प्रत्येक सण हा तुमच्यासाठी प्रोजेक्ट आहे. त्यासाठी तुम्हाला डेडलाइन्स आहेत… आणि जसे प्रोजेक्ट पूर्ण करायला सगळी टीम एकत्र काम करते ना, तसे आपले सण साजरे करायला घरातील सगळे एकत्र लागतात. तुमच्या ‘डेज’सारखे एकटे-एकटे नाही साजरे करायचे आणि यामधून तुम्हाला मिळते ते ‘अप्रायझल’ म्हणजे घरातल्यांचे प्रेम बोनस म्हणून भरपूर कौतुक…”
हेही वाचा – आश्वस्त करणारी मिठी
सासू – ”आणि खरं सांगू का प्रिया हे, नात्यांचे दिवस हे केवळ सण नसतात; ते प्रेम, कृतज्ञता, संवाद आणि एकमेकांसोबत घालवलेल्या वेळेचे महत्त्व जपणारे सुंदर निमित्त असतात. प्रत्येक सण हा वेगवेगळ्या नात्यांना महत्त्व देतो. म्हणून बाळा या सणांचे टेन्शन न घेता छान आनंदात, उत्साहात साजरे कर. यामुळे नात्यांची ही वीण घट्ट होत जाईल आणि यामुळे ना, आयुष्यात तुला कधीच एकटे वाटणार नाही. कारण तू कौतुकाने संभाळलेली सगळी नाती तुझ्याबरोबर प्रत्येक वेळी असतील!”
आजी – ”बघ आता चातुर्मास म्हणजे सणांची रेलचेलच. प्रत्येक नात्यासाठी खास… तो तू तुझ्यासाठी खास कर. तू छान एन्जॉय कर. अजून आम्ही दोघी आहोत, त्यामुळे तुला जास्त कामाचा ताण नाही येणार… पण तरी गोष्टी समजून घे, स्वत:हून या प्रोसेसमध्ये सहभागी हो. मग बघ कसा तुला टार्गेट कम्प्लिट झाल्याचा आनंद मिळतो ना त्यापेक्षा जास्त आनंद, सुख, समाधान मिळेल.”
प्रियाला आता आजी आणि सासूच्या बोलण्यामुळे छान वाटत होते आणि म्हणून तिने आजी आणि सासू यांच्याबरोबरीने या सगळ्या सणांमध्ये आनंदाने सहभागी व्हायचे ठरविले.


