भाग – 1
“चल, येतो मी,” स्वप्नील बॅग उचलत जुईला म्हणाला.
“ओके,” जुईने निरोप देण्यासाठी हात हलवला, पण अचानक काहीतरी आठवून म्हणाली, “अहो, मी काय म्हणते… आज गंधे हॉलमध्ये कवीसंमेलन आहे. जायचं का आपण संध्याकाळी?”
“अं… माझं जमेल असं वाटत नाही. तू जाऊन ये ना संध्या वहिनीसोबत…”
“संध्या वहिनींना कुठे इंटरेस्ट आहे अशा कार्यक्रमात… कुठे सेल लागलेला असला की, मात्र एका पायावर तयार!”
स्वप्नील हसला.
“बायकांना शॉपिंगशिवाय दुसरं सुचतं तरी काय? सगळ्यात प्रिय छंद असतो तो त्यांचा!”
जुईने तोंड वेडंवाकडं केलं. स्वप्नीलने गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला. जुई स्वतःशी चरफडली. मग तिने कुणी नाही आलं तरी, कवीसंमेलनाला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला.
जुईला लहानपणापासूनच कवितांचं वेड होतं. शाळेत असल्यापासून ती कविता लिहायची. अर्थात, त्यावेळी निसर्ग हाच तिच्या कवितांचा विषय असायचा. कॉलेजमध्ये गेल्यावर ती मुक्त कविता लिहू लागली. निसर्ग कवितांची जागा आता सामाजिक कवितांनी घेतली होती. ‘काव्यदर्पण’ नावाचं मासिक तिनेच कॉलेजमध्ये सुरू केलं होतं. काही दिवसांनी सुधीर नावाचा एक देखणा तरुण त्या मासिकात कविता पाठवू लागला. त्याच्या काहीशा बंडखोर कविता जुईला फार आवडायच्या. त्या मासिकाच्या निमित्ताने सुधीरशी तिची ओळख झाली. भेटीगाठी होऊ लागल्या. हळूहळू कवीमनाची जुई त्याच्या प्रेमात पडली. सुधीर देखणा असल्यामुळे अनेक मुली त्याच्यासाठी जीव टाकायच्या. पण जुई सुधीरवर प्रेमकविता लिहू लागली आणि तिचं प्रेमप्रकरण कॉलेजमध्ये गाजू लागलं. सिगारेट पित असलेला सुधीर आणि त्याला खेटून उभी असलेली जुई, हे दृश्य कॉलेजमध्ये कॉमन झालं होतं. सुधीर चेनस्मोकर होता. एकापाठोपाठ भकाभका सिगारेट प्यायचा आणि तो धूर जुईच्या तोंडावर सोडायचा. जुई त्या वासाने धुंद व्हायची. कधीतरी ती त्याला विचारायची,
“का पितोस एवढा? सोडून दे ना…” तेव्हा तो एक दमदार झुरका घेऊन धुरांची वलंयं बाहेर काढायचा आणि म्हणायचा,
“जमाने की हर फिक्र को धुएँ में उडाना मुझे अच्छा लगता हैं, जुई…” त्याच्या या स्टाईलवर जुई अजूनच फिदा व्हायची.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी
जुई बी.ए. पास झाली आणि तिने एम.ए.ला ॲडमिशन घेतली. सुधीर मात्र नापास झाला. सुधीरला त्याचं फारसं दुःख झालं नाही. आता ही जोडी फुटेल असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र जुईचं त्याच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही.
घरातून जुईसाठी स्थळं बघणं सुरू झालं. त्यामुळे जुई कासावीस झाली. सुधीरला भेटून तिने या गोष्टीची कल्पना दिली. त्याने तिला लवकरच तिच्या वडिलांना भेटण्याचं आश्वासन दिलं. एक दिवस स्वप्नीलचं चांगलं स्थळ सांगून आलं आणि स्वप्नील लवकरच तिला बघायला येणार आहे, हे जुईला कळल्यावर मात्र तिने धीर करून आईला सुधीरवरच्या प्रेमाची कल्पना दिली आणि “करीन तर त्याच्याशीच लग्न करीन” असंही स्पष्ट सांगितलं. आईने ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर टाकली. जुईचे वडील मोकळ्या स्वभावाचे होते. मुलगा चांगला असेल तर, आंतरजातीय विवाहालाही त्यांची आडकाठी नव्हती. शिवाय, आजकालची मुलं जरा मनाविरुद्ध घडलं की, आत्महत्या करायला मागेपुढे पहात नाहीत, याचीही त्यांच्या मनात भीती होतीच. त्यांनी जुईला सुधीरची माहिती विचारली, पण सुधीरचं नाव आणि तो सुंदर कविता करतो, यापलीकडे जुईला त्याची काहीच माहिती नव्हती. तरीही वडिल म्हणाले, “काही हरकत नाही. तू त्याला घरी घेऊन ये. मी विचारेन त्याला. त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरीलाही लावून देईन…”
जुईने सुधीरला कॉलेजमध्ये गाठलं. त्याला सर्व कल्पना देऊन वडिलांनी घरी बोलावल्याचं सांगितलं. पण सुधीरच्या चेहऱ्यावर फारशी काळजी दिसली नाही. उलट ते ऐकून सुधीर मोठमोठ्याने हसायला लागला…
“अगं जुई, मी इतक्या लवकर लग्न कसा करू शकेन? अजून मी ग्रॅज्युएट झालो नाही. कधी होईन सांगता येत नाही. अर्थातच, ग्रॅज्युएट झाल्याशिवाय नोकरी नाही. त्यातून तुम तो जानती हो मैं आझाद पंछी हूँ. हमें एक जगह रुकना अच्छा नहीं लगता…” बोलता बोलता त्याने सिगारेट शिलगावली. जुई काकुळतीला आली आणि म्हणाली,
“सुधीर, मी लग्न करीन तर तुझ्याशीच. तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायची माझी तयारी आहे. पण तू एकदा माझ्या वडिलांना भेटून त्यांना व्यवस्थित समजावून सांग म्हणजे ते माझ्यासाठी स्थळ तरी पहाणार नाहीत.”
सुधीरने तिच्या तोंडावर धूर सोडला आणि म्हणाला,
“ठीक आहे. येतो मी रविवारी संध्याकाळी तुझ्या घरी आणि पटवतो तुझ्या वडिलांना.”
जुई खूश झाली. हवेत तरंगतच ती घरी आली. सुधीर रविवारी येऊन भेटणार असल्याचं तिने आईला सांगितलं. त्या रात्री तिने सुधीरवर एक ह्रदयस्पर्शी कविता लिहिली.
रविवारची संध्याकाळ उजाडली. जुई आणि तिचे आई-वडील आतुरतेने सुधीरची वाट बघत होते. पण सुधीर आलाच नाही. जुई त्याला वारंवार फोन करत होती, पण त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. त्याला काही अपघात तर झाला नाही! या शंकेने ती व्याकूळ झाली. दहा वाजून गेले तरी तो येत नाही, हे पाहून तिच्या वडिलांनी दरवाजा बंद करून टाकला.
जुई रात्रभर झोपली नाही. सुधीरच्या काळजीने रडत राहिली.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाऊन तिने त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याचा फोनही लागला नाही. चार-पाच दिवसांनी तिला कळलं सुधीर कॉलेज सोडून कुठेतरी निघून गेला होता. कुठे गेला, हे कुणालाच माहीत नव्हतं. तो जिथे रहात होता, त्या चाळीतही ती जाऊन आली. शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा ठावठिकाणा माहीत नव्हता. त्याचे आई-वडील विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यात रहात होते. पण त्या खेड्याचं नावही कुणाला माहीत नव्हतं. जुई हताश झाली…
यथावकाश जुईचं स्वप्नीलशी लग्न झालं. गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत जुई सुधीरची वाट बघत होती. पण सुधीर काही आला नाही.
जुईचा नवरा, स्वप्नील स्मार्ट असला तरी सुधीरसारखा देखणा नव्हता आणि मेकॅनिकल इंजिनीअर असल्यामुळे त्याचा कवितांशी काहीच संबंध नसणार, हे जुईने गृहित धरलंच होतं. पण त्याची स्वतःची इंडस्ट्री होती. गावात दोन वर्कशॉप्स होते. मोठा बंगला होता. दोन फोर-व्हिलर होत्या. विशेष म्हणजे, स्वप्नीलने ते स्वमेहनतीने कमावलं होतं. कोणत्याही मुलीच्या आई-वडिलांना शेवटी काय हवं असतं? आपली मुलगी सुखात रहावी, असंच त्यांना वाटतं. शिवाय, इतक्या कर्तबगार मुलाला ते नाही म्हणूच शकत नव्हते. शेवटी इच्छा नसूनही जुई लग्नाला विरोध करू शकली नाही. त्यातून सुधीर असा पळून गेलेला. जुईकडे विरोधासाठी कोणतंच कारण उरलं नव्हतं!
लग्नानंतर जुई शांतशांत रहायची. गरज पडेल तेव्हाच ती बोलायची. ती नाराज आहे की, अशीच अबोल आहे, हे स्वप्नीलला कळत नव्हतं. तिचं मन जिंकायचा तो आटोकाट प्रयत्न करायचा. पण जुईला हवा होता तिच्यासारखाच कवीमनाचा नवरा आणि मेकॅनिकल इंजिनीअर असलेला स्वप्नील कवीमनाचा असूच शकत नव्हता. आपल्या नाजूक भावना त्याला समजणार नाहीत, असंच तिला वाटायचं. कविता लिहिलेल्या तिच्या वह्या ती माहेरीच सोडून आली होती. आताही तिला कविता सुचायच्या, पण त्यात विरहभावना जास्त असायच्या. त्या कुठेतरी लिहून ठेवाव्यात, असं तिला वाटायचं. पण लिहिणार कुणासाठी? या घरात तर, कुणाचा कवितेशी दूरदूरचाही संबंध नव्हता. शेवटी तिने कविता लिहिण्याचा नादच सोडला. वर्तमानपत्रातल्या कविता मात्र ती जरूर वाचायची. टीव्हीवरील कवीसंमेलनही ती आवर्जून बघायची. तिला कवितांचं वेड आहे, हे यावरून घरात सगळ्यांना कळलं होतं.
त्यामुळे कुठेही कविसंमेलन असलं की, तिला तिथे जायला कुणी अडवायचं नाही. अशा कवीसंमेलनात तरी कधीतरी सुधीर तिथे भेटेल, अशी वेडी आशा तिला असायची. तिच्या दुर्दैवाने आजपर्यंत तरी तो भेटला नव्हता.
लग्नाआधी तिने खूप कविता लिहिल्या आहेत, हे मात्र जुईने कुणालाच सांगितलं नव्हतं. तिचं हे भांडं मात्र एकदा तिची मैत्रिण घरी आली तेव्हा फुटलं…
एके दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली. जुईने दार उघडून पाहिलं तर, तिची बालपणीची मैत्रिण अंजू उभी होती. दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. जुई तिला प्रेमाने आत घेऊन गेली…
“अंजू, अगं फोन तर करायचास! मी तुला घ्यायला आले असते…”
जुईला तिचं अचानक येणं थोडं खटकलंच
“अगं, मला तुला सरप्राइज द्यायचं होतं. मावशींकडून पत्ता घेतला आणि सरळ तुझ्याकडे आले. ए पण जुई, तुझा बंगला फार सुंदर आहे गं आणि किती एलिगंटली सजवलंय घर… वा खुपच सुंदर. चॉईस तुझा की जिजूंचा?”
“मी लग्न होऊन आले तेव्हापासून हे घर असंच आहे. अर्थातच, या सगळ्या आयडियाज् स्वप्नीलच्याच!”
“व्वा! चांगलाच रसिक आहे गं तुझा नवरा!”
तेवढ्यात स्वप्नील आला. जुईने ओळख करून दिली. जेवणाच्या टेबलावर सगळे बसले असतानाच अंजू म्हणाली,
“जिजू, आमची कवयित्री मैत्रिण तुम्हाला कविता वाचून दाखवते की नाही?”
“जुई कविता करते?” स्वप्नीलने आश्चर्याने विचारलं, “तिला कविता आवडतात, हे मला माहीत होतं, पण ती कविता करते, हे माहीत नव्हतं…”
“हो मग! अहो कॉलेजमध्ये असताना ती ‘काव्यदर्पण’ नावाचं मासिक चालवायची. त्यात तिच्याही कविता असायच्या. मला तरी वाटतं दोनतीन डायऱ्या सहज भरल्या असतील तिच्या
या कवितांनी. हो ना गं जुई?”
जुईने तिच्याकडे पाहून डोळे वटारले. अंजू सुधीरचा विषय तर, काढणार नाही? या विचाराने ती अस्वस्थ झाली,
“इतक्या काही चांगल्या नव्हत्या, माझ्या कविता… शिवाय, आपल्या घरात कुणाला कवितांमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मी कधी बोलले नाही त्याबद्दल…” स्वप्नीलने काही विचारण्याच्या आतच जुईने स्पष्टीकरण देऊन टाकलं. स्वप्नील काही बोलला नाही पण अंजूकडे बघून त्याने स्मित केलं.
रात्री बेडरूममध्ये अंजूने जुईला विचारलं,
“सुधीरची आठवण तुला अजूनही येते का गं?”
“हो गं. मुली आपलं पहिलं प्रेम कधी विसरतात का अंजू?”
“पण जुई, तुझा नवरा खूपच चांगलाय गं! सुधीरसारखा देखणा नसला तरी स्मार्ट आहे आणि जंटलमन आहे. तो सुधीर कसला सिगारेटी ओढायचा. मला नाही आवडायचं, त्याचं ते भकाभका धूर ओकणं…”
“मला आवडायचं. काय स्टाईलने तो सिगारेट ओढायचा, खरा पुरुष वाटायचा तो!”
“मला त्याच्या कविताही आवडत नसत…”
“मला आवडायच्या. जीवनातलं वास्तव असायचं, त्याच्या कवितात.”
“बोडक्याचं वास्तव! सगळ्या बिभत्स असायच्या. मला तर किळसच यायची त्या वाचून!”
“तुला नाही समजायचं ते अंजू. कविता तुझा प्रांतच नाहीये…”
“ठीक आहे. नाही कळत मला काही कवितेतलं. पण धन्य आहे बाई तुझी! मॅडम, विसरा आता त्या सुधीरला… चांगला वेल सेटल्ड नवरा मिळालाय तुम्हाला. माहितेय, तू जर सुधीरशी लग्न केलं असतं ना, तर तुला त्या घाणेरड्या चाळीतल्या नरकात रहावं लागलं असतं. आज तू एवढ्या शानदार बंगल्यात रहातेयस.”
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!
“केलं असतं गं मी ॲडजस्ट… सुरुवातीला येतातच अडचणी. काही वर्षं आम्ही दोघांनीही नोकरी करून एखादं छोटंसं घर घेतलंच असतं…”
अंजूने तिला हात जोडले.
“बाई बस कर तुझं सुधीरपुराण. तुला नको असेल हा स्वर्ग तर सोडून दे नवऱ्याला. मी करीन स्वप्नीलशी लग्न!”
“खरंच करशील? मला सुधीर भेटू दे, मग खुशाल कर…” जुई आनंदाने म्हणाली.
“मुस्काटात मारीन मी आता! एवढा चांगला नवरा सोडला आणि त्या धुराड्याच्या आठवणीने कुढतेय. मूर्ख कुठली आणि आता त्या सुधीरची तारीफ करून माझं डोकं पिकवू नको. चल झोप मुकाट्याने…” अंजू संतापून म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती गेली तेव्हा जुईला बरंच वाटलं कारण ती सारखी स्वप्नीलची तारीफ करत होती. तुलना करताना ती चुकून सर्वांसमोर सुधीरचा उल्लेख तर नाही करणार, या भीतीने जुईचा जीव टांगणीला लागला होता.
क्रमश:
(ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)


