फूड पॉयझनिंग झालेली दोन भावंडं ओपीडीत आली होती. कालही तीन मित्रांनी याच तक्रारीसाठी, डे-केअर ट्रीटमेंटही घेतली होती आणि सकाळपासून आमच्या एका सिस्टरलाही सेम त्रास सुरू होता… रजिस्टर मागवून कालच्या मित्रांपैकी एकाला फोन केला, त्यानं मित्रासोबत बर्गर खाल्ल्याचं समजलं. आज आलेल्या भांवडांनी सुद्धा बर्गर खाल्ला होता आणि सिस्टरनंही काल बर्गरच खाल्ला होता!
मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, आणि हा योगायोग निश्चितच नव्हता. या सगळ्यांनी एकाच ठिकाणी बर्गर खाल्ला होता… ‘जस्ट डायल’वरून त्याचा फोन नंबर शोधला आणि दूषित सोर्सची माहिती घ्यायला सांगत, त्यांनी असे न केल्यास कायदेशीर तक्रार नोंदवावी लागेल, अशी पुस्तीही जोडली. कधीकधी ब्योमकेश बक्षीसारखं सत्यान्वेषी व्हावं लागतं!
डॉट्स जुळले की, केसेस सुटतात… चाइल्ड ॲब्युजच्या केसेस असतात, प्रीमरायटल प्रेग्नन्सीच्या केसेस असतात, डोमेस्टिक व्हॉयलन्स असतो… यात ‘वैद्यकीय’ बाजू जरी असली तर, साधकबाधक माहिती घेतल्यास अशी प्रकरणं टाळण्यात ठोस भूमिका बजावता येते.
थांबा, याच श्रेणीतली एक ऐतिहासिक गोष्टच सांगतो…
स्थळ लंडन. साल 1854 असावं. शहर धुरकट, गलिच्छ होतं. रस्त्यांवर घोड्यांची लिद, उघडी गटारं आणि हवेत एक विचित्र भीती… कारण होता कॉलरा! सकाळी तंदुरुस्त असलेला माणूस संध्याकाळपर्यंत मृत झालेला असयाचा… डॉक्टर मंडळीही हतबल होती आणि जनता प्रचंड भयभीत. सगळ्यांच्या डोक्यात एकच समज पसरला होता तो म्हणजे, ‘’शापित हवा’ हा रोग पसरवतेय…”
या सगळ्या भाऊगर्दीत एक डॉक्टर मात्र शांतपणं विचार करत होता त्याचं नाव होतं डॉक्टर जॉन स्नो… जॉन स्नो काही क्रांतिकारक नव्हता, ना त्याच्याकडं कुठली प्रयोगशाळा होती. त्याच्याकडं होतं फक्त एक शस्त्र – ते म्हणजे त्याच्या अचूक आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीचं धारदार शस्त्र!
तो रुग्णांकडं गेला. त्यानं सहजसोपे प्रश्न विचारले… जसं कुठून आणलेलं पाणी पिता? घर कुठंय? आजारी होण्यापूर्वी काय केलं?
आजूबाजूचे लोकंच काय अगदी डॉक्टरही हसले… “अरे यार, हवा खराब आहे. लोकांना सांगता येत नाही म्हणून ते तिला ‘शापित’ म्हणतात, यात पाण्याचा संबंध येतोच कुठं?”
पण थांबेल तो स्नो कसला? पठ्ठ्यानं एक साधा कोरा कागद घेतला, त्यावर लंडनचा ढोबळ नकाशा काढला आणि जिथं जिथं कॉलऱ्यानं मृत्यू झाले, तिथं तिथं एक काळी खूण केली… हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं. सगळी काळे ठिपके एका ठिकाणी गच्च जमा होत गेले ती जागा म्हणजे इथला सुप्रसिद्ध ब्रॉड स्ट्रीट पंप…
हेही वाचा – विषाची परीक्षा…
हा एक जुना सार्वजनिक पाण्याचा पंप होता, जिथं लोक रांगेत उभे राहून पाणी पित, भरून नेत… एवढंच नाही, हे पाणी ‘थंड, गोड, स्वच्छ पाणी’ म्हणून प्रसिद्ध होतं. पण स्नोनं आणखी खोदून माहिती घेतली, तेव्हा त्याला लक्षात आलं, जे या पंपाचं पाणी पीत नव्हते, ते आजारी नव्हते. जे इथं जवळ राहूनही जे दुसरीकडून पाणी घेत होते, ते वाचले आणि विशेष म्हणजे शहरातली ‘पेताड’ मंडळीही वाचली… कारण ते फक्त मद्य पित! मात्र इथं येऊन जे जे पाणी प्याले, ते ते बाधित झाले होते.
आता चित्र पूर्ण झालं. “पंपचं हँडल काढा” नावाचं पत्र घेऊन स्नो थेट प्रशासनाकडं गेला. त्यानं रितसर तक्रार नोंदवली. त्याला अद्याप कोणतेही जंतू दिसले नव्हते, फक्त अचाट तर्क, अचूक निरीक्षण आणि अफाट धाडस…
त्यानं एकच मागणी केली “ब्रॉड स्ट्रीट पंपचं हँडल काढा.”
लोक चकित झाले, प्रशासन गोंधळलं, डॉक्टर मंडळींनी नाराजी व्यक्त केली. पण सरतेशेवटी यात नुकसान ते काय? यामुळं प्रयोग म्हणून एकदाचं हँडल काढण्यात आलां… लागलीच पाणी बंद झालं. लोकांनी दुसऱ्या ठिकाणचं पाणी वापरायला सुरुवात केली अन् काही दिवसांत ‘अहो आश्चर्यम्’ नवीन रुग्ण बंद झाले. मृत्यूसत्र अचानक थांबलं आणि साथ चक्क ओसरली!
कोणताही मंत्र नाही, कोणतीही पूजा नाही… एवढंच काय, कुठलंही औषधही नाही… फक्त कारण-परिणामाचं भान!
हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!
स्नो बरोबर होता, पण दुर्दैवानं त्यावेळी कुणीच हे मान्य केलं नाही; कारण त्या काळात जंतूसिद्धांत अस्तित्वात नव्हता. ‘हवा’ सिद्धांतच राज्य करत होता. पर्यायानं स्नोला फारशी दाद मिळाली नाही. तो लवकर मरण पावला, पण इतिहासानं उशिरा का होईना, त्याला न्याय दिला… आज जॉन स्नोला एपिडेमिओलॉजीचा जनक अर्थातच सार्वजनिक आरोग्याचा शिल्पकार म्हणतात. पुरावाधिष्ठित वैद्यकाचा पहिला योद्धा! ज्यानं दाखवून दिलं की, डॉक्टरचं सर्वात मोठं आयुध म्हणजे त्याची वैचारिक क्षमता…
ब्रॉड स्ट्रीट पंपचं हँडल म्हणजे फक्त एक लोखंडाचा तुकडा नव्हता, तो अंधश्रद्धेवरचा घाव होता. डेटाचा विजय आणि माणुसकीसाठी उभं ठाकलेलं विज्ञान होतं…
आजही जेव्हा एखादी नवी साथ येते डेटा, मॅपिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वापरलं जातं, तेव्हा नकळत आपण सगळे जॉन स्नोच्या पावलावर पाऊल ठेवत असतो!


