डोकं दुखत असलेली एक महिला ओपीडीत आली होती, चौकशीअंती नुकतीच तिची प्रसुती झाल्याचं कळलं आणि बाळ रात्रभर त्रास देत असल्यानं पुरेशी झोप होत नसल्याचं कारणही समोर आलं. आपल्याकडं बाळ प्लान करणं म्हणजे ‘होऊ देणं’ किंवा ‘न होऊ देणं’ इथपर्यंतच मर्यादित आहे! या बदलास कसं सामोरं जायचं? कसं मॅनेज करायचं? प्लान ए बी सी काय असणार आहे? बॅकअप कसा देणार? याबद्दल कुणीच सारासार विचार करत नाही, किंबहुना विचार करणाऱ्यांना वेड्यात काढलं जातं…
लक्षणजन्य औषधं देत तिला रवाना तर, केलं पण इकडं मला रँडी गार्डनरची आठवण झाली…
साल 1964 असावं… अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधला सॅन डिएगोचा एक साधासुधा माध्यमिक शाळेतला विद्यार्थी रँडी गार्डनर. ना तो संशोधक, ना डॉक्टर, ना एखादा विक्षिप्त प्रयोगकर्ता… फक्त आपल्या एका शालेय विज्ञान प्रकल्पासाठी काहीतरी वेगळं करायचं ठरवणारा किशोरवयीन तरूण.
“माणूस किती दिवस झोपेशिवाय राहू शकतो?” हा प्रश्न त्याच्या मनात आला आणि त्याच क्षणी इतिहासाची नोंद लिहिली जाऊ लागली…
पहिल्या दिवशी सगळं आलबेल होतं. पहिले 24 तास सहज गेले. रँडी हसत होता, बोलत होता, मित्रांसोबत गप्पा मारत होता… लोक म्हणत होते, ”अरे, यात काय मोठं?”
हेही वाचा – गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…
तिसरा-चौथा दिवस आला, आता मात्र मेंदूची चेष्टा सुरू झाली! डोळे जड झाले, स्मरणशक्ती गडबडायला लागली, एकाच वाक्याची पुनरुक्ती होऊ लागली, अचानक चिडचिड वाढली… पण रँडी टक्क जागा होता!
पाचवा दिवस उजाडला तसे वास्तवाला तडे जायला लागले आणि खरी गंमत अर्थात, भीती सुरू झाली… रँडीला भास होऊ लागले, भिंतींवरचे रंग फिरू लागले… लोकांचे चेहरे विचित्र वाटू लागले… तो स्वतःच म्हणाला,
“माझा मेंदू जागाय, पण तो माझा नाही, असं वाटतंय!”
याच काळात एक तरुण संशोधक त्याच्यावर लक्ष ठेवत होता डॉ. विल्यम डिमेंट निद्राशास्त्राचा भविष्यकाळातला दिग्गज!
दिवस आठवा-नववा दिवस… शरीर हार मानू लागलं. लघुशंकेला उभं रहाताना तोल जाऊ लागला… भाषा अस्पष्ट झाली… लक्ष केंद्रित करणं अशक्य झालं… पण आश्चर्य म्हणजे तो बेशुद्ध पडला नाही, झोपला तर अजिब्बात नाही!
त्याच्या मेंदू मात्र सूक्ष्म पातळीवर मायक्रो-स्लीप्स घेत होता. डोळे उघडे, पण मेंदू काही सेकंदांसाठी बंद!
हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?
अकरावा आणि ऐतिहासिक दिवस उजाडला… 11 दिवस आणि 25 मिनिटे झाली आणि शेवटी प्रयोग थांबवण्यात आला… रँडीला झोपायला सांगण्यात आलं… कोणतीही औषधं नाहीत, फक्त अंथरूण आणि शांतता…
तो झोपला… सलग 14 तास आणि आश्चर्य म्हणजे, कुठलंही कायमस्वरूपी मानसिक नुकसान झालं नाही. मेंदूची कुठलीच हानी झाली नाही, पण एक मोठा धडा मात्र मिळाला!
रँडी गार्डनरचा हा प्रयोग आज पुन्हा करायला कोणालाही परवानगी नाही, कारण आता विज्ञानाला कळलंय झोप म्हणजे लक्झरी नाही तर, ती मेंदूची मूलभूत गरज आहे!
“झोपेशिवाय माणूस कदाचित जिवंत राहू शकतो, पण तो माणूस राहू शकत नाही.”
रँडीने संपूर्ण जगाला हा धडा दिला!


