अध्याय तेरावा
हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना । प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥160॥ क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार । म्हणोनि आतां उदार । ज्ञान आइक ॥161॥ जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥162॥ न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगाऐसें दुवाड । हेळसिती ॥163॥ तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥164॥ नाना भजनमार्गी । धांवत उघडां आंगीं । एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥165॥ ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥166॥ देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा । जन्माचा सांडोवा । टाकित जे ॥167॥ जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी । जीवाआत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥168॥ जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥169॥ द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये । जया ज्ञानाची सोये । ऐसें करी ॥170॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन
अर्थ
अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे (अध्याय 14 मध्ये) सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो ॥160॥ क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक ॥161॥ ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात. (म्हणजे मूर्ध्निआकाशाचा लय करतात). ॥162॥ (ज्या ज्ञानाकरता योगी) सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करीत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. ॥163॥ (ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक) तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधि यज्ञाच्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापलथ करून (आचरण करून) त्याचा त्याग करतात. ॥164॥ अथवा (ज्या ज्ञानाकरिता) कित्येक उघड्या अंगांनी (अंतर्बाह्य परिग्रह टाकून) भजनमार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात. ॥165॥ याप्रमाणे मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरिता वेदरूपी झाडाचे पान न् पान हिंडतात (म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात) ॥166॥ अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल, या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात. ॥167॥ ज्या ज्ञानाचा प्रवेश अविद्या नाहीशी करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो, ॥168॥ जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते ॥169॥ द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र सम बुद्धीच्या बांधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते ॥170॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा


