हल्ली ते तिघे सारखे एकत्रच असायचे. आई-बाबा आणि त्यांची एकुलतीएक पियू! लग्न आठवड्यावर आलं होतं. उद्या पियूची आत्या येणार होती आणि त्यानंतर बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकांची रीघ लागणार होती. कुटुंबातलं पहिलं-वहिलं आणि ते देखील लाडक्या पियूचं लग्न! उत्साहाला उधाण आलं होतं. सगळी तयारी झाली होती. हॉल, कॅटरर, ब्युटीशिअन, मेहंदी, खरेदी… सगळं अगदी काटेकोरपणे जय्यत होतं.
पियू कुठे दूर जाणार नव्हती, गावातल्या गावातच तिचं सासर होतं. तरीही मन असं का उचकलं होतं; तिला कळत नव्हतं. मुलगी लग्न करून जाणार म्हटल्यावर अशी अनामिक हुरहूर दाटून येत असणार! पण तिच्या ममतेच्या चाणाक्ष नजरेला काहीतरी विपरीत जाणवत होतं.
मुलगा देखणा, कर्तबगार, उच्यशिक्षित… कुटुंब पण मर्यादाशील, सौजन्यपूर्ण! पियूच्या पसंतीनेच लग्न ठरलं होतं. थाटात एंगेजमेंट झाली होती. तेव्हा मुलाकडचा सगळा परिवार पण सुसंस्कृत वाटला होता. पण हळूहळू पियू काजळी धरलेल्या वातीसारखी दिसायला लागली. आपल्याच विचारात असायची… कधी कधी बोलण्याकडे लक्षच नसायचं, मैत्रिणींपासून तुटायला लागली होती… हसणं विसरली होती. तिचं खळखळून हसणं तर एखाद्या निर्झरासारखं होतं… एकाच वेळी नादमधुर आणि थंडावा देणारं प्रसन्न! आई-बाबा दोघांनाही हा बदल विपरीत वाटत होता. तिने खोदून खोदून विचारलं, तर पियूला रडूच यायचं, “तुम्हाला सोडून जायचं ना… का असं मुलींना लग्न करून परक्या घरी, परक्या माणसांत पाठवतात गं!” ती हुंदके देऊन विचारायची. बहुतेक लग्नाचा, आईबाबांना सोडून जायचा ताण आला असेल; तिने मनाची समजूत घातली.
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
उद्यापासून घरात गडबड सुरू होणार, बोलायला पण वेळ मिळणार नाही, मग एकमेकांचा सहवास तर दूरच. तिघेही, जुन्या, हळव्या आठवणी काढत बसले होते, इतक्यात पियूचा फोन वाजला. वरचं नाव बघून ती बोलणं अर्धवटच टाकून, गच्चीत गेली. दोघांनाही हसू आलं, त्यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं.
“इश्श! साडेबारा वाजले, ही काय फोन करायची वेळ आहे का? आज संध्याकाळीच तर भेटलेत दोघे!”
“झोप येत नसणार गं त्याला; आतुर झाला असणार!” तो मिश्किलपणे म्हणाला.
थोड्या वेळाने ती गच्चीत बघायला गेली. पियूच्या कानाला फोन होता. ती नुसती ऐकत होती, बोलत काहीच नव्हती.
“काय हा वेडेपणा! अहो एक वाजला. अशी जागरणं केली तर, तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं येतील; ॲसिडिटी होईल. तुम्ही सांगा बघू, बस करा म्हणावं, उद्या बोला काय ते!” ती रूममध्ये येऊन नवऱ्याला म्हणाली. पण तो कधीच गाढ झोपला होता. तिलाही झोप लागली.
मधेच कधीतरी तिला जाग आली. चार वाजले होते. पियू बेडवर नव्हती. काळजीने, धडपडतच ती बाहेर आली. गच्चीचं दार सताड उघडं होतं. पियू झोपाळ्यावर गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. हमसून हमसून रडत होती. तिने तिच्याकडे धाव घेतली, पियूला कुशीत घेतलं. आईच्या कुशीत शिरल्यावर सगळा बांध कोसळून तिने टाहो फोडला, “आई, त्याला माझं काहीच आवडत नाही गं! माझे केस, माझे कपडे… सगळ्यावरून नावं ठेवतो. म्हणतो, मी खूप बडबडते. जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा मला ओरडतच असतो. काल तर आधी माझ्यावर हात उगारला आणि नंतर सणसणीत चिमटा काढला. हे बघ कसं काळंनीळं झालंय.” तिने दंड दाखवला. आईचे डोळे पण आता वाहायला लागले होते.
“आत्ता मला तासभर झापत होता. आज त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा म्हणे मी मोठ्याने हसले, चहा करायला त्याच्या आईच्या आधी किचनमध्ये पोहोचले नाही… मला भीती वाटतेय गं आई, खूप खूप भीती वाटतेय. एखाद्या दिवशी रागाच्या भरात तो मला जाळून तर…”
“पियू…!” कळवळून तिने पियूच्या तोंडावर हात ठेवला.
“पियू, त्याला फोन लाव!” दोघींनीही दचकून पाहिलं. पियूचा बाबा तिथे उभा होता. त्याने सगळं ऐकलं होतं. “पियू फोन लाव…”
“अहो, सकाळपर्यंत थांबूया! विचार करूया, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलूया…”
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
“पियू, त्याला फोन लाव आणि सांग, हे लग्न मोडलं! तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये, हे आत्ता सांग त्याला.”
“अहो, काय करताय हे! पत्रिका वाटून झाल्यात, उद्यापासून पाहुणे यायला सुरुवात होणार… लोक काय म्हणतील…”
“पियू, फोन लाव… हे काम तूच करायचंय, पुढचं काय करायचं ते मी बघेन, पण त्याला नाही म्हणण्याचा हक्क, अधिकार तुझाच आहे. फोन कर!”
पियूने फोन करून थरथरत्या आवाजात त्याला आपला नकार सांगितला. तो काहीतरी जोरजोरात ओरडत होता.
“आता फोन स्वीच ऑफ कर पियू. झोपूया आता. आपल्याला विश्रांती हवी आहे. उद्या बरीच कामं करायची आहेत. सगळी बुकिंग कॅन्सल करायचीत, पाहुण्यांना न येण्याबद्दल कळवायचंय!”
“चल पियू, झोपायचा प्रयत्न करूया!” तिला एकाहाताने जवळ घेऊन, तिला थोपटत त्याने गच्चीचा दरवाजा बंद केला.


