अध्याय तेरावा
आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नांव पंडुसुता । चेतना येथें ॥134॥ जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥135॥ मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं । प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥136॥ जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥137॥ पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥138॥ नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥139॥ अगा मुखमेळेंविण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥140॥ पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥141॥ मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना । आतां धृतिविवंचना । भेदु आइक ॥142॥ तरी तत्त्वां परस्परें । उघड जातिस्वभाववैरें । नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ॥143॥ नीरातें आटी तेज । तेजा वायूसि जुंझ । आणि गगन तंव सहज । वायू भक्षी ॥144॥ तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें ॥145॥ ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें । कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती ॥146॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरी स्पर्शु आणि शब्दु, रूप रस गंधु
अर्थ
अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामधे जी सत्ता आहे, तिला येथे चेतना हे नाव आहे. ॥134॥ जी (पायांच्या) नखापासून तो (मस्तकाच्या) केसांपर्यंत शरीरामध्ये नेहेमी खडखडीत जागत असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही, ॥135॥ मन, बुद्धि वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहेमी प्रकृति – (शरीर) रूपी वनाचा वसंत ऋतु आहे, ॥136॥ जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना, चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही. ॥137॥ आपला लवाजमा वगैरे किती आहे जे राजास ठाऊक नसतांनाही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते, अथवा पूर्ण चंद्राच्या उदयाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली, हे जसे चंद्रास माहीत नसते) ॥138॥ अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास हालचाल करावयास लावते अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करावयला लावते, ॥139॥ अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते ॥140॥ अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगति ही जडाला चेतनदशेला आणते. ॥141॥ याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशा आणिल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना’ असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक. ॥142॥ तर पंचमहाभूतांमधे एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय ? ॥143॥ पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाचे आणि वायूचे वैर आहे आणि आकाश तर स्वभावत:च वायूला नाहीसे करते. ॥144॥ त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमधे शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपत: अलग असते ते हे आकाश होय. ॥145॥ अशी पाचही महाभूते एकमेकांना सहन करीत नाहीत, असे त्यांचे स्वभावत: वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रकट होतात. ॥146॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी


