अध्याय तेरावा
तरि भूतलें आठवे । कां बोलें कानु झांकवे । ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती ॥122॥ इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच वेगें उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥123॥ जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें । न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥124॥ जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥125॥ आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥ आतां यावरी सुख । तें एवंविध देख । जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु ॥127॥ मना वाचे काये । जें आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडित जें ये ॥128॥ जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥129॥ कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचां एकांतीं । थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ॥130॥ किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥131॥ आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था । जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥132॥ तें मनोरथसंगें नव्हे । एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥133॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नीळिमा अंबरीं, कां मृगतृष्णालहरी
अर्थ
तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसऱ्यांच्या मुखांतून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अथवा शब्द कानावर येऊन पडतांच जी वृत्ति जागी होते ॥122॥ इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ति वेगाने उठते ॥123॥ जी वृत्ति उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात, ॥124॥ ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा (असे तू समज) ॥125॥ आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ति, तिला द्वेष असे म्हणतात ॥126॥ आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो ॥127॥ जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, (व्यापार बंद करते) आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते, ॥128॥ जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा (शांत) होतो व सात्विक वृत्ति पूर्वीपेक्षा दुपटीच्या वर वाढते, ॥129॥ आणि अर्जुना, जे सर्व इंद्रियवृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थोपटून गाढ निद्रा आणते ॥130॥ फार काय सांगावे? जीवाला आत्म्याचा लाभ (ऐक्य) ज्यावेळी प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते त्य़ा स्थितीला सुख हे नाव आहे. ॥131॥ आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज ॥132॥ ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी (मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की) ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय (मनाची स्थिरता व मनाची चंचलता) सुखदुखाला कारणीभूत आहेत ॥133॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरी स्पर्शु आणि शब्दु, रूप रस गंधु


