सकाळची वेळ…
ती बेडरूममधून उठून बाहेर आली आणि म्हणाली, “अहो, दुधाची पिशवी आत आणता का? मगाशीच बेल वाजली…”
“अरे, बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब… तू नको जाऊस मी घेतो. तुला बरं नाही. तू दोन दिवस अगदी आराम करायचा. हे आपल ठरलं आहे ना… म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळचा चहा… तो काय, मी करीन!” तो एका दमात हे बोलला.
ती आत गेली.
त्याच्या लक्षात आलं आज आपण प्रथमच दूधाची पिशवी आत घेत आहोत, नाहीतर प्रत्येक वेळेस बेल वाजली की, तीच दार उघडते…
हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
पिशवी कापून दूध पातेल्यात ओतताना, कधी सवय नसल्याने, दूध सांडलंच! पटकन त्याने तिथल्या नॅपकिनने ते पुसून घेतलं. ती समोर नव्हती, ते एक बरं!
दूध तापायला ठेऊन तो सोफ्यावर येऊन बसला…
काही वेळाने बायकोने बाहेर येऊन आठवण करून दिली… “अहो, दूध तापलं असेल बघा… नाहीतर तिथे थोडं थांबून तापवून घ्या…”
“बरं बरं…” तो गॅससमोर… जरा वेळातच तो वैतागला अन् मनात म्हणाला… ‘च्यायला, दूध तापायला किती वेळ लागतो? इथे नुसतं बघत उभं राहायचं…’
शेवटी तापलं एकदाच दूध. गॅस बंद करून तो पेपर वाचत बसला.
सकाळी अकराची वेळ…
ती परत बाहेर आली.
“अहो तुमचा दुसरा चहा…”
“आता अजून एकदा दूध तापवायचं?”
“साय चांगली येण्यासाठी मी चारदा दूध तापवते…” ती सहज म्हणाली.
दूध गॅसवर… गॅसची फ्लेम कमी झाली की काय? काय कटकट आहे… उगीच दूधाकडे बघत उभं रहायचं… कुकरला शिट्टी असते तसं काहीतरी हवं होतं…
मग त्याच्या लक्षात आलं आपल्याच चहासाठी दूध तापवणं चाललं आहे… त्यानं चहा केला… चहा पिताना मनात तो म्हणाला…
‘तसा बरा झालाय चहा… जमतयं आपल्याला पण… तिच्यासारखा नाही…’ त्याने मनाशी कबूल केलं… ‘अजून प्रॅक्टिस करायला हवी. ती कसा चहा करते, हे शिकून घ्यायला हवे.’
दुपारी पावणेचारची वेळ…
“माझ्या लक्षात आहे हं… चारला आपल्या दोघांचा चहा करीन तेव्हा दूध तापवतो…” तिने काही बोलायच्या आताच त्यांनी सांगितलं.
ती खुद्कन हसली…
आज त्याला साक्षात्कार झाला की, साधा चहा करायचा म्हटलं तरी बराच व्याप असतो… चहाच भांडं, गाळणं, कप-बशी, चमचा, ते आलं किसायचं… एक कप चहाचा इतका पसारा?… चहा कपात ओतताना तो मनाशी म्हणाला.
झालं संपल बाबा एकदाचं, आजच्या दिवसातलं चहा प्रकरण…
वेळ रात्रीची…
“अहो उद्या दुपारी जेवताना दही लागणार त्यासाठी दूध विरजण लावायच आहे….” तो आत आला.
“दही नुसतं नाही घालायचं. ती दह्याची कवडी चांगली हलवा. मग दूध घाला म्हणजे दही घट्ट लागतं… बास… इतकंच पुरे… सकाळच्या चहाला दूध लागेल…”
तिच्या सूचना सुरू होत्या… आयुष्यात पहिल्यांदाच त्याने दूध विरजण लावलं… हे असं असतं तर… हे त्याला नवीनच कळलं!
“आता फ्रीजमधला तो सायीचा सट घ्या. त्यात साय घाला. पाच दिवसांची साठली आहे. आता उद्या बरं वाटलं तर, त्याचे ताक करते आणि लोणी काढते… तुमचे आवडते बेरी घालून कणकेचे लाडू करीन… आणि ताकाची कढी, गोळे घालून… गरम भाताबरोबर…”
तो बघत राहिला, ती बोलतच होती… आपल्याच तंद्रीत… थोडं स्वतःशी थोडं त्याच्याशी…
तो नुसता उभा!
दुसरा दिवस… वेळ सकाळी साडेसहाची…
“अगं आपला चहा झाला तरी दूध शिल्लकच आहे… आता याचे काय करायचे?”
“आता हे रात्रीसाठी विरजण लावायचे… पण इतक्यात नाही… ताजं दूध आलं की मग! तुम्ही कसं, कोणी आलं की बाहेरूनच ऑर्डर करता – ‘दोन कप कॉफी कर’… म्हणून हे ठेवायचे दूध. घरात दूध नाही, असे नको व्हायला…” ती सांगत होती…
अरे, खरंच की! आपण कधी याचा विचारच केला नाही!! कालपासून आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ दुधाच्या पातेल्याशीच खेळत आहोत… असे त्याला वाटले. अरे देवा…एका दुधाचं इतकं रामायण असतं?
तो विचारात पडला… स्वयंपाकघरात त्याने नजर फिरवली. निरनिराळी भांडी, धान्यांचे डबे, फ्रीज, लोणच्याच्या -मसाल्याच्या बरण्या, सॉसच्या बाटल्या, ताटं, वाट्या… मग या सगळ्या संसारातल्या वस्तूंचं महत्त्व किती असेल?
त्यांचं देवघराकडे लक्ष गेलं. ती आजारी असल्याने आज पूजा झाली नव्हती… त्यामुळे नेहमीसारखं प्रसन्न न वाटता आज तिथं उदास उदास वाटत होतं. ती हे सगळं मॅनेज करते, हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही. आज आजारी असताना देखील तिचं लक्ष स्वयंपाकघरातच आहे.
सारखं काय स्वयंपाकघरात काम असतं गं?… सारखी आत आत काय करत असतेस?…
आपण तिला सहज म्हणत होतो… आज त्याच्यावर वेळ आली, तेव्हा त्याला त्याची जाणीव झाली.
अनेक विचारांनी त्याच्या मनात गर्दी केली… तिने केलेले अनेक रूचकर पदार्थ त्याला आठवायला लागले. आज काय झाले कोण जाणे… त्यांचे मन, डोळे आपसुक भरून आले…
एका दुधाच्या पातेल्यावरून त्याला तिच्या अनेक गोष्टी आठवायला लागल्या… तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, तिची शिस्त… कितीतरी आठवणी आज उफाळून वर आल्या!
ती आत आली…
“अहो, स्वयंपाकघरात इतका वेळ काय करताय…?”
तिच्या जवळ जाऊन तो म्हणाला,
“दिवसभर तू किती आणि काय काय करत असतेस… माझ्या कधी लक्षातच आलं नाही. बायको सॅल्युट आहे तुला!”
तो अगदी मनापासून बोलला…
“इश्श… इतकं काही नाही हं… आम्हा बायकांना सवय असते… तुम्ही बाहेरचं सांभाळता आणि मी घरातलं…”
ती सहज म्हणाली. अचानक त्याने तिचे हात हातात घेतले…
“आजपर्यंत कधी बोललो नाही, पण तू खरचं संसार खूप छान केलास. मुलांना नीट वळण लावून मोठं केलंस, नाती पण सांभाळलीस. याआधी मी कधी गंभीरपणे याकडे बघितलंच नाही. परंपरेने चालत आलेले सणवार रीतीरिवाज तू आनंदाने करत आलीस…”
हेही वाचा – गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…
तो आज काहीतरी वेगळचं बोलत होता… भावूक झाला होता… आवाजही नरम आणि कातर झाला होता… त्याचे एक निराळे रूप ती बघत होती. तो आतून, अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता… अगदी मनापासून!
खूप पूर्वीच आपण हे तिला सांगायला हवं होतं, असं त्याला वाटलं…
ती तर गडबडूनच गेली होती… तो असं कधीही आजपर्यंत बोलला नव्हता! अनपेक्षित अशा सुखांनी ती भारावली होती… आनंदीत झाली होती. त्याच्या हाताचा मायेचा, प्रेमाचा स्पर्श तिला सुखावत होता… त्याच्या नजरेत आज तिला प्रथमच वेगळे भाव दिसत होते. जीवनाचं सार्थक झालं, भरून पावलो, धन्य झालो… असं मनोमन तिला वाटलं…
ते दोन जीव हातात हात घेऊन तृप्त मनाने एकमेकांकडे बघत होते…
त्याचे डोळे भरून आले होते अन् तिचेही… आता शब्दही मुके झाले होते…


