नीलिमा विजय खडतकर
आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडत असताना छान गरम गरम खाण्याची इच्छा होते. तेव्हा आपण कांदा भजी, समोसे यासारखे चटपटीत पदार्थ करतो. कच्च्या केळ्याचे समोसे देखील केले जातात. हे समोसे नेहमीच्या समोशांपेक्षा वेगळे आणि पौष्टिक देखील आहेत. कच्च्या केळ्याचे सारण आणि रव्याचे आवरण असलेले हे मिनी समोसे अतिशय खुसखुशीत होतात आणि बराच वेळ तसेच खुसखुशीत राहतात.
सारणासाठी साहित्य
- कच्ची केळी – तीन मध्यम आकाराची
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप
- आल्याचा तुकडा – एक इंच
- हिरव्या मिरच्या – चार-पाच
- जिरे – अर्धा टी-स्पून
- खसखस – अर्धा टी-स्पून
- हळद – अर्धा टी-स्पून
- बडीशेप – अर्धा टी-स्पून
- साखर – एक टी-स्पून
- चाट मसाला – एक टी-स्पून
- लाल तिखट – एक टेबल स्पून
- जिरे पावडर – एक टी-स्पून
- धणे पावडर – एक टी-स्पून
- मीठ – चवीनुसार
- अर्ध्या लिंबाचा रस
- कढीपत्ता – 4-5 पाने
- भाजलेल्या चण्याचे पीठ (फुटाणे किंवा डाळवा) – एक टेबल स्पून
हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
पारीसाठी (आवरणासाठी) साहित्य
- बारीक रवा – पाऊण कप
- ओवा – अर्धा टी-स्पून
- कडकडीत तेलाचे मोहन – दोन टी-स्पून
- मीठ – चिमूटभर
कृती
- प्रथम रव्यामध्ये दोन टी-स्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे.
- नंतर अर्धा टी-स्पून ओवा, चिमूटभर मीठ, अर्धा टी-स्पून त्यात घालावे आणि छान मिक्स करून घ्यावे.
- थोडे थोडे पाणी घालून रवा घट्ट भिजवून घ्यावा आणि पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवावा.
- सारणासाठी प्रथम केळीची साले काढून केळी किसून घ्यावीत.
- कढईत फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, बडीशेप, कढीपत्ता, मिरची आणि आल्याची जाडसर पेस्ट घालावी आणि ही पेस्ट छान परतून घ्यावी.
- नंतर एक टेबलस्पून लाल तिखट (आवडीनुसार कमी जास्त) हळद, धणे- जिरे पावडर, खसखस घालून फोडणी छान परतून त्यात केळ्यांचा किस घालावा.
- हे मिश्रण थोडे परतून घेतल्यानंतर त्यात चाट मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, साखर, चवीनुसार मीठ घालून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
- त्यानंतर भाजलेल्या चण्याचे (फुटाणे किंवा डाळवा) पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि छान मिक्स करून घ्यावे.
- मंद आचेवर हे सारण पाच मिनिटे कोरडे होईपर्यंत छान परतून घ्यावे आणि नंतर थंड करायला ठेवावे.
- आता समोसे करण्यासाठी भिजवलेल्या रव्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. साधारण 15 गोळे होतात.
- प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून, पुरीचे दोन भाग करावेत. प्रत्येक अर्ध्या भागाला त्रिकोणी समोशाचा आकार द्यावा.
- साधारण दोन टी-स्पून सारण प्रत्येक समोश्यात दाबून भरावे आणि पाणी लावून कडा छान चिटकवून घ्याव्यात (नेहमी समोसे बनवण्याच्या कृती प्रमाणे).
- सर्व समोसे भरून झाल्यावर मध्यम आचेवर ते छान लालसर तळून घ्यावेत.
- सर्व्ह करताना समोशासोबत कैरीची चटणी किंवा टोमॅटो सॉस द्यावा.
हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो
टीप्स
- कच्च्या केळाचे हे सारण कोरडे असल्यामुळे आपण जास्त बनवून दोन-तीन दिवस ठेवू शकतो.
- या सारणाचे समोसे न करता कचोऱ्या, करंज्या आणि पराठे देखील करू शकतो.
- समोसे तळायचे नसतील तर बेकही करू शकतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर


