हिमाली मुदखेडकर
भाग – 2
“त्याला जन्म देणं शक्य आहे का?” अनिकेतच्या प्रश्नाने काही क्षण केबिनमध्ये पूर्ण शांतता पसरली. डॉक्टर मृणालिनी पाटील त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी अनेक रुग्ण पाहिले होते. अनेक दुःखं, अनेक संघर्ष पाहिले होते. पण अशी परिस्थिती… असा प्रश्न… याची त्यांनी कल्पना केली नव्हती.
काही क्षणांनी त्या शांतपणे विचारपूर्वक म्हणाल्या,
“वैद्यकीय दृष्ट्या विचाराल तर… हो… म्हणजे तो भ्रूण जिवंत आहे आणि पूर्णपणे सक्षम ही आहे.”
“मग समस्या काय आहे?”
डॉक्टरांनी समोर ठेवलेली फाइल उघडली.
“समस्या कायदेशीर आहे.”
“मला समजलं नाही…”
“मिस्टर पुरंदरे, तुमच्या आणि सानिकाच्या संमतीने हे भ्रूण तयार करण्यात आला होता. त्यावेळच्या परिस्थितीनुसार या बाळाचे रोपण सानिकाच्या गर्भाशयात होणार होते. तशी सहमती असणारी कागदपत्रे तुम्ही दोघांनी प्रक्रियेपूर्वी आम्हाला दिली आहेत. जर काही कारणाने सानिका गर्भधारण करण्यास सक्षम ठरली नसती तर, आपण सरोगसीचा विचार केला असता… पण त्याकरिता तुमच्यासह तिची सहमती सर्वात जास्त महत्त्वाची मानली गेली असती. अर्थात, भविष्यात त्या भ्रूणचा वापर करण्यासाठी दोघांची संमती आवश्यक असते.”
“पण मी इथे आहे ना.”
“हो. पण सानिका आता नाहीत.”
त्या शब्दांनी पुन्हा एकदा त्याच्या छातीत वेदना उठली. तो क्षणभर खाली पाहत राहिला.
“तिला मूल हवं होतं…”
त्याचा आवाज कापत होता, “तिच्याच आग्रहामुळे आम्ही ही प्रक्रिया सुरू केली होती.”
हेही वाचा – संकर्षण… राखेतून उरलेला श्वास
“मला त्याबद्दल शंका नाही,” डॉक्टर मृदू स्वरात म्हणाल्या.
“पण न्यायालयाला भावना नव्हे तर, पुरावे लागतात.”
“म्हणजे?”
“सानिकाने तिच्या मृत्यूनंतर भ्रूण वापरण्याची स्पष्ट लेखी परवानगी दिल्याची आमच्या कागदपत्रात नोंद नाही. त्यामुळे हा विषय कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे.”
“सर्वसाधारणपणे अशा केसमध्ये जेव्हा केव्हा दोघांपैकी एक जोडीदार विशेषतः स्त्री मृत्यू पावते, तेव्हा उर्वरित जोडीदाराच्या सहमतीने भ्रूण नष्ट केले जाते… आणि खरे सांगायचे तर असेच सर्रासपणे होत आलेले मी आजवर पाहिले आहे.”
“अशा केसेसमध्ये मागे राहिलेला जोडीदार आयुष्यात पुढे पडण्यासाठी दुसरा विवाह करतो. त्या विवाहातून त्याला पुढे अपत्य होऊ शकते… तुमच्या लक्षात येतंय ना, मिस्टर पुरंदरे मी काय म्हणतेय ते?”
अनिकेतच्या मनात पुन्हा निराशेची लाट उसळली. दोन वर्षांपूर्वी नियतीने त्याच्याकडून सगळं हिरावून घेतलं होतं. आता कुठेतरी थोडा आशेचा किरण दिसू लागला होता तर, कायदा त्याच्या आड उभा होता.
0000
तो घरी परतला तेव्हा संध्याकाळ झाली होती. घरात नेहमीसारखी शांतता होती. पूर्वी जिवंत वाटणारं हे घर आता फक्त रूक्ष निर्जीव भिंतीचा सांगाडा भासू लागल होतं. आता सोबतीला होत्या फक्त आठवणी…
त्याने कपाटातून सानिकाचा आवडता स्कार्फ काढून हातात घेतला. तिचा लकी चार्म… कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ती तो वापरत असे… IVF प्रक्रियेच्या दिवसांत ती कायम हा स्कार्फ वापरत होती. किती उत्साहाने ती या सगळ्या ट्रीटमेंटला सामोरी जात होती. प्रत्येक व्हिजीटनंतर ती नवीन योजना आखायची.
“यावेळी मुलगा झाला तर नाव काय ठेवायचं?”
“…आणि मुलगी झाली तर?”
“सृष्टीच्या वाढदिवशी दोघांचं एकत्र फोटोशूट करूया.”
तिची स्वप्नं कधीच संपायची नाहीत.
त्याच्या मनाच्या कुरणात आठवणींची हरणं उधळली होती… त्याच्याही नकळत डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर हसू एकाच वेळी होते.
“तू असतीस तर काय केलं असतंस, सानिका? तू हार मानणार्यापैकी नक्कीच नव्हतीस…”
विचारांच्या गोंगाटातच रात्री उशिरा कधीतरी त्याला झोप लागली.
0000
दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या जुन्या मित्राला… समीरला फोन केला.
धबधब्यासारखा तो त्याच्यासमोर व्यक्त होत राहिला…
हे सगळं ऐकून समीर स्तब्ध झाला,
“तुला खरंच लढायचंय यासाठी?”
“माहीत नाही,” अनिकेत म्हणाला, “पण ते भ्रूण नष्ट करायचा विचारही सहन होत नाही.”
“हे बघ अनी, एक मिनिट असा विचार कर, तुझ्याकडे गमावण्यासारखं काय आहे? तसं पाहता काहीच नाही. मग एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?”
हा प्रश्न अनिकेतच्या मनात रेंगाळत राहिला.
“मी क्रिमिनल केसेस हाताळतो, पण माझ्या एक सहकारी वकील विभा शेलार या वैद्यकीय आणि घटनात्मक कायद्यातील तज्ज्ञ आहेत. मी त्यांना तुझा रेफरन्स देतो आणि तुझी त्याच्याशी भेट ठरवून देतो.”
दोन दिवसांनी अनिकेत ॲड. विभा शेलार यांच्या कार्यालयात बसला होता. भिंतीवर कायद्याची पुस्तकं भरलेली होती. विभा मॅडम शांतपणे त्याची कहाणी ऐकत होत्या…
अपघात… सानिका… सृष्टी… IVF… आणि गोठवून ठेवलेले भ्रूण!
सगळं ऐकून झाल्यावर त्यांनी खुर्चीत मागे रेलत दीर्घ श्वास घेतला.
“ही केस फारच वेगळी आहे आणि अवघडही!” त्या म्हणाल्या.
“कायद्यात अशा परिस्थितीबाबत फारसं स्पष्ट मार्गदर्शन नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागेल.”
“काय सिद्ध करायचं? की सानिकाची मूल होण्याची इच्छा होती?”
“ती होती हे मला माहिती आहे,” त्या म्हणाल्या, “पण न्यायालयाला ते कागदोपत्री दाखवावे लागते.”
त्यांनी टेबलावर पेन फिरवत विचारलं, “तिचे ई-मेल्स, मेसेजेस, वैद्यकीय नोंदी, IVF संमतीपत्रं… काही असे पुरावे आहेत का?”
“असतील.”
“मग ते शोधावे लागतील.”
0000
पुढचा एक आठवडा तो जुन्या फाइल्स चाळत राहीला… कपाटं, ड्रॉवर, लॅपटॉप, मोबाइल बॅकअप… सगळं. प्रत्येक फाइलसोबत एक आठवण बाहेर पडत होती.
एका जुन्या ई-मेलमध्ये सानिकाने डॉक्टरांना लिहिलं होतं —
“आम्ही या प्रक्रियेबद्दल खूप आशावादी आहोत. सृष्टीला एक भाऊ किंवा बहीण मिळाली तर, ती खूप आनंदी होईल.”
तो ई-मेल वाचताना त्याचे हात थरथरले.
दुसऱ्या फाइलमध्ये IVF प्रक्रियेचं वेळापत्रक होतं. तिसऱ्या फाइलमध्ये सानिकाने स्वतः लिहिलेल्या काही नोट्स होत्या. प्रत्येक कागद तिच्या स्वप्नाची साक्ष देत होता.
0000
काही दिवसांनी तो पुन्हा ॲड. विभा शेलारांच्या कार्यालयात गेला. सर्व कागदपत्रं त्यांच्या समोर ठेवली. त्या एकेक कागद पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. सगळं तपासून झाल्यावर त्यांनी फाइल बंद केली.
“आपल्याकडे आधार आहे.”
अनिकेतच्या डोळ्यांत आशा चमकली.
“म्हणजे?”
“म्हणजे आपण केस दाखल करू शकतो. पण… पुढे बराच विरोध होईल.”
“कसला?”
“IVF नियामक संस्था, सरकारी विभाग, नैतिक समित्या, कदाचित काही सामाजिक संघटनाही…”
प्रत्येक शब्दासोबत लढाईचं स्वरूप अधिक मोठं होत होतं.
अनिकेत खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. खाली रस्त्यावर गर्दी होती. लोक आपापल्या आयुष्यात मग्न होते. कोणाला त्याच्या लढाईची कल्पनाही नव्हती… पण त्याच्यासाठी ती सर्वस्व होती. त्याने डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेऊन तो मागे वळला.
“केस दाखल करूया.”
“विचार करून निर्णय घेतला आहे?”
“हो.”
हेही वाचा – आम्ही दोघी…
“ही लढाई वर्षानुवर्षे चालू शकते.”
“चालू द्या.”
“तुम्ही थकाल… कंटाळाल किंबहुना आपण केस हरण्याचीही शक्यता आहे.”
अनिकेत हळू आवाजात म्हणाला,
“मी आधीच माझे सर्वस्व हरलो आहे, आता माझ्याकडे हरण्यासारखे काहीही नाही!”
अनिकेतच्या डोळ्यातील ठामपणा विभा मॅडमना जाणवला.
दोन वर्षांपूर्वी त्याचं आयुष्य संपलं होतं. पण कदाचित… आज त्याला जगण्याचं कारण सापडलं होतं.
क्रमश:
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


